कोकणचं सौंदर्य परदेशात

मुश्ताक खान

आपल्या जादुई कुंचल्यातून नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं कोकण थेट परदेशात पोहोचवलंय ते प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांनी. नुकतंच त्यांच्या कलाकृतींचं एक प्रदर्शन विजयदुर्ग इथं भरवण्यात आलं. कोकणातल्या प्रत्येक प्रसिद्ध आणि जनतेला माहिती नसलेल्या अशाही ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन सगर यांनी ही चित्रं काढली आहेत.

 

Kokan Paiting 1कोकणाच्या कलाकृतींना परदेशात विशेष मागणी

एखाद्या प्रदर्शनात आपण फोटो बघून भारावून जातो. पण, हेच फोटो जर आपल्याला प्रत्यक्ष कोकणाची आठवण करून देणारे असतील तर... अशाच काहीशा चित्रांनी कोकणवासीयांची मनं जिंकली. गेल्या 18 वर्षांपासून राज्यभरात आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवणाऱ्या भास्कर सगर यांनी शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत आपल्या पेंटिंग्जची २५ प्रदर्शनं भरवली आहेत. गेली १८ वर्षं ते कलेची सेवा करून त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

 

कुंचल्यातून अवतरलं कोकण

प्रदर्शन म्हटलं की एखादी थीम आलीच. दरवर्षी राज्यातली मंदिरं, किल्ले, गुंफा, ऐतिहासिक वास्तू आदी विषय निवडून ते प्रदर्शन भरवत आले आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी कोकण हा विषय निवडला आहे. कोकणातील प्रसिद्ध आणि माहिती नसलेले किनारे, इथली प्राचीन मंदिरं, किल्ले, नारळ-पोफळीच्या बागा त्यांनी हुबेहूब साकारल्या आहेत. आतापर्यंतच्या प्रदर्शनात कोकणवरील त्यांच्या प्रदर्शनाला सर्वाधिक पसंती मिळाली, असं भास्कर सगर यांनी सांगितलं.

 Kokan Paiting 3

कोकणची महती जगभर पोहोचावी यासाठी भास्कर सगर यांनी काढलेली सर्व मूळ चित्रं आधीच ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये पोहोचली आहेत. विदेशात सगर यांच्या कलाकृतींना ५० हजारांवर किंमत मिळते.

 

कमीत कमी किमतीत चित्र उपलब्ध

भारतातल्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडंही त्यांची चित्रं असावीत, यासाठी सगर यांनी ही चित्र ३०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून दिली आहेत. त्याचबरोबर ५० रुपयांमध्ये त्यांनी आपल्या १२ चित्रांचं कॅलेंडरही सामान्यांसाठी उपलब्ध करून दिलंय. त्यांच्या या कलाकृतींना विजयदुर्गसारख्या छोट्याशा खेड्यात भरभरून दाद मिळाली.

 

Kokan Paiting 9कोकणचं प्रतिबिंब खऱ्या अर्थानं भास्कर सगर यांच्या कलाकृतींमधून दिसून येतं, अशी प्रतिक्रिया इथं येणाऱ्या कलारसिकांनी दिली. कोकणात राहणाऱ्या व्यक्तींनीही भास्कर सगर यांच्या माध्यमातून कोकणातल्या न फिरलेल्या ठिकाणांचं दर्शन झालं, अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्या प्रियजनांना, मित्रांना भेट म्हणून देण्यासाठी सगर यांची पेंटिंग्ज उत्तम आहेत, असा सूरही इथं उमटला.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.