दादांची 'विच्छा' पुन्हा रंगभूमीवर - भाग 1

सुखदा खांडगे

ठाणे - शाहीर दादा कोंडके यांचं विच्छा माझी पुरी करा' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरलंय. वसंत सबनीसांनी जो 'छपरी पलंगाचा वग' लिहिला होता, त्याचीच रंगावृत्ती म्हणजे 'विच्छा माझी पुरी करा'. दादांनी आपल्या हजरजबाबी, तल्लख आणि धारदार शब्दफेकीतून या वगाची रंगत उत्तरोत्तर वाढवत ठेवली. तीच लज्जत आताही चाखायला मिळतेय.


 

vicha mazi2

सर्वप्रथम हे नाटक १९६६ मध्ये रंगमंचावर आलं. त्यानंतर तब्बल चार दशकांनंतर म्हणजे २०११ मध्ये ते पुन्हा रंगमंचावर आलं. त्यानंतर दोन वर्षांनी ठाण्याच्या 'गडकरी रंगायतन'मध्ये त्याचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच पार पडला. लेखक वसंत सबनीसांनी खास दादांसाठी हे ग्रामीण बाज असलेलं मनोरंजनात्मक वगनाट्य लिहिलं. दादांनंतर आता नाटकातले नवकलाकार त्याचा ठसकेबाजपणा कायम ठेवत मनोरंजन करत असतानाच दादांप्रमाणंच विनोदाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर आसूड ओढतायत. नाटकाचा पारंपरिक रांगडा बाज कायम ठेवत खराब रस्ते, टोल नाका, लवासा, भ्रष्टाचार इत्यादी सध्याच्या ऐरणीवर असलेल्या विषयांवर हे नाटक भाष्य करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं.
   

मनोरंजनातून सामाजिक भान

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित हे नाटक पुन्हा एकदा रसिकांसाठी 'सुयोग' या नाट्यसंस्थेनं आणलंय. दादांनंतर  मालवणी रंगभूमीवरील विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासह गणेश मयेकर, मनोज टाकणे, सुनील अष्टेकर,, संजय मोहिते आणि नवतारका धनश्री दळवी असे कलाकार यात आहेत. सद्य स्थितीतील विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारं हे लोकनाट्य मुळात रचलं होतं ते लोकांच्या मनातील आक्रोश बाहेर आणण्यासाठी. दादांसारखा जातिवंत कलाकार समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवून असायचा आणि मग या सामाजिक प्रश्नांना आपल्या अंगभूत विनोदी शैलीत आणि मर्मभेदक टोमण्यांतून वाचा फोडायचा. हा कोंडके बाज हरवणार नाही, याची काळजी दिग्दर्शकानं घेतलीय.

लावणी नर्तकी मैनावतीच्या प्रेमात पडलेला फौजदार मैनावतीशी लग्न करण्यासाठी त्याला येणाऱ्या अनंत अडचणींतून कसा मार्ग काढण्यासाठी केलेल्या खटपटींतून हे नाटक पुढं सरकत जातं. या प्रेमकथेत येणाऱ्या प्रसंगांतून समाजामध्ये सुरू असलेल्या वाईट घडामोडींवर मोठ्या खुबीनं टीका करण्यात आलीये. त्यामुळं हे नाटक  जनसामान्यांच्या संवेदना अचूकपणं हेरण्यात यशस्वी ठरलंय.


vichha mazi 3विनोद आणि शृंगारही

दादा कोंडकेंची 'विच्छा...'तील कोतवालाची भूमिका निभावण्याचं शिवधनुष्य मालवणी कलाकार दिगंबर नाईक यांनी उचललंय. या नाटकाविषयी सांगताना दिगंबर म्हणतो की, सहकुटुंब बघावं असं हे नाटक आहे आणि म्हणूनच यात द्वयअर्थी शब्दांचा वापर कटाक्षानं टाळलाय. नव्या पिढीनं समाजातील विविध विषयांना उजाळा देत आणि हे विषय हळुवार हाताळत हे वगनाटय विनोदासह शृंगारानंही परिपूर्ण नटवलंय. विच्छा...च्याच धर्तीवर उषा बॅनर्जी यांनी हिंदीत हे नाटक 'सैंया भाये कोतवाल' या नावानं रंगभूमीवर आणलंय. समाजातील समस्यांवर भाष्य करण्याची ताकद लोककलांमध्ये आहे. त्यात तमाशा आघाडीवर आहे. हे तमाशाप्रधान नाटक पाहताना हेच जाणवतं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.