लोकसंगीताला रिमिक्सचा साजसुखदा खांडगे मराठी लोकांसोबतच देशी,परदेशी लोकांना ठेका धरायला लावणाऱ्या 'वाट बघतोय रिक्षावाला','नाखवा बोटीनं फिरवाल का?' गाण्यांची गायिका रेश्मा सोनावणे. डीजे, लग्न समारोह किंवा कोणताही कार्यक्रम असो 'वाट बघतोय रिक्षावाला', 'नाखवा बोटीनं फिरवाल का?', 'मला लगीन कराव पाहिजे' या गाण्यांवर मराठी लोकच नाही तर देशी, परदेशी लोकही ठेका धरतात. पण हे गाणं जिनं गायलंय ती कोण? हे बहुतेकांना माहिती नसेल. ही हिट गाणी गाणारी तरुणी आहे रेश्मा सोनावणे. ती मात्र या ग्लॅमर जगापासून दूरच आहे. रेश्मा मुळची कर्जतची. ती एक आंबेडकरी कव्वाली गायिका आहे. तिनं वयाच्या 14 व्या वर्षी बघतोय रिक्षावाला हे गाणं गायलं. तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की, हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल. त्यानंतर 'बोटीनं फिरवाल का?', 'मला लगीन कराव पाहिजे' ही गाणी तिनं गायली. या सर्व गाण्यांचं आता रिमिक्स झालंय, सगळी गाणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत. पण ही गाणी गाणाऱ्या रेश्माला खरंच प्रसिद्धी मिळाली का? तिला तो मान-सन्मान मिळाला का? हा प्रश्न तसाच आहे. कारण मुळ लोककलाकर आणि गायकांकडं आपल्याकडं नेहमीच दुर्लक्ष होतं. तसंच दुर्लक्ष रेश्माकडंही झालंय. रेश्मासारखेच असे इतरही अनेक कलाकार आहेत की त्यांची गाणी हिट झालीत. पण हे कलाकार मात्र कुठल्या तरी कोपऱ्यात पडलेत. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर येऊन या खऱ्याखुऱ्या कलाकारांनी आपल्या हिट गाण्यांचा फॉर्म्युला सांगितला आणि खंतही व्यक्त केली. यात एक नाव आहे, 'नवरी नटली'वाले गोंधळी छगन चौघुले... नवरी नटली हे गाणं मुळात बनलं ते पारंपरिक जागरणासाठी. रिमिक्समधून या गाण्यानं अगदी धुमाकूळ घातला. गावो-गावी लग्न समारंभाला किंवा कोणत्याही शुभप्रसंगी जागरण आणि गोंधळ करण्याची एक परंपरा आहे. या परंपरेतूनच छगन चौघुले यांचा आवाज लोकांपर्यंत पोहचवला. नवरी नटली या गाण्यानं छगन चौघुलेंना घराघरांत पोचवलं. छगन चौघुलेंच्या घरातच गोंधळाची परंपरा. त्यामुळं गोंधळ त्यांच्या रक्तातच. जागरणाचा एक भाग असलेल्या खंडोबाचं लग्न रंगवण्यासाठी छगनरावांनी 'नवरी नटली' रचलं आणि ते तुफान हिट झालं. 15 वर्षांपूर्वी रचलेल्या या गाण्यानं खेडोपाड्यातच नव्हे तर शहरा शहरांत धिंगाणा घातला. 'पिंट्याची हंडी'फेम प्रा. गणेश चंदनशिवे आता सर्वांना माहीत झालेत. या गाण्यानेच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मागील वर्षीच रिलीज झालेल्या 'शैतान' सिनेमातलं 'पिंट्याची हंडी' हे गाणं गाजलं, ते गायक चंदनशिवेंच्या पहाडी आवाजामुळं. तमाशाची वडिलोपार्जित परंपरा लाभलेले गणेश चंदनशिवे मुळचे जालना जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावचे. आपल्या पहाडी आवाजानं साऱ्या महाराष्ट्राला त्यांनी मंत्रमुग्ध केलं. नुसतं लोकगीतकार न राहता त्यांनी लोककलेतील नवी पिढी घडवत परंपरेला रिमिक्सची झालर देऊन लोकगीत सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणजे 'पिंट्याची हंडी' हे गाणं. या गाण्यासोबत अनेक पारंपरिक गण त्यांनी नव्या स्टाइलनं सीडीसाठी गायली आहेत. Tags |
||
Comments
|