लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कडकलक्ष्मी उपाशी

रोहिणी गोसावी

देऊळवाले जमातीची कथा आणि व्यथा रोहिणी गोसावी, वीर, पुणे आज लक्ष्मीपूजन.. सर्वत्र रोषणाई, फटाके, गोडधोड जेवण... अशी दिवाळी साजरी होतेय. पण डोक्यावर लक्ष्मी घेऊन गावोगाव फिरणारे, लोकांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करणारे, त्यासाठी पाठीवर सटासट आसूड मारुन घेणारे कडकलक्ष्मी मात्र एक वेळेच्या जेवणासाठी अजूनही दारोदार फिरतायत.


उघड्या पाठीवर सटासट्आसूड मारुन घेणारा माणूस...डोक्यावर देऊळ घेऊन गुबू-गुबू वाजवणारी त्याची बायडी...आणि चेहऱ्यावर आर्जव घेऊन बघ्यांकडं पैशासाठी याचना करणारी त्यांची चिमुरडी...आपण वैतागतो...झटकून टाकतोन् सल्ला देतो, ‘भिका काय मागताय, काही कामधाम करा...’असे सल्ले त्यांना दिवसभरात सारखे मिळतात. पण तो माणूस काही अंगावर आसूड मारुन घेण्याचं थांबवत नाही. त्याची पोरं लोकांसमोरहात पसरायचं काही थांबत नाहीत. अखेर हे लोक हे सगळं सोडून का देत नाहीत?असा प्रश्न आपल्याला कधीच का पडत नाही? तो पडायला पाहिजे. हा प्रश्न आम्हाल पडला. त्याचं उत्तर शोधायला आम्ही पोहोचलो पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या वीर गावात. गावाबाहेर दोन किलोमीटरवर या लोकांची अर्थात ‘देऊळवाल्या’समाजाची वस्ती आहे. देऊळवाले हा भटक्या विमुक्तांमधला एक समाज आहे. त्यांना गावात राहायाला कोणी जागा देत नाही, म्हणून त्यांनी हे माळरान गाठलं. कडकलक्ष्मीचं रुप घेऊन आयुष्यभर गावोगाव फिरण्याचा उबग आल्यानंया समाजातल्या काही कुटुंबांनी इथं तळ ठोकला. त्याला 20 वर्षे झाली. पण त्याचं हे ठाणं काही पक्कं नाही. कारण गाववाल्यांनी हुसकावलं तर त्यांना ही जागा सोडावीच लागणार आहे. वस्तीवर जातानाच रस्त्याच्या बाजूला जवळपास पन्नास कुटुंबांची ५० पालं दिसली. आणि एका पालात या सगळ्यांची एकत्र झाकून ठेवलेली देवळं..!देऊळवाल्यांच्या कित्येक पिढ्या हे देऊळ डोक्यावर घेऊन गावोगाव फिरल्यात.पण नव्या पिढीनं आता ही देवळं डोक्यावर घ्यायला नकार दिलाय. कारण ती काही आता त्यांचं पोट भरू शकत नाहीत. त्यापेक्षा मोलमजुरी बरी, असं त्यांचं मत बनलंय. वस्तीभोवती घाणीचं साम्राज्य, उघडी-वाघडी फिरणारी पोरं...सारं चित्र मन उदास करणारं... सुगीच्या हंगामानंतर आईबाप देऊळ डोक्यावर घेऊन बाहेर पडतात तेव्हा ही पोरं त्यांच्या कडेखांद्यावर असतातच. मग कुठली आलीय शाळा न् कुठलं आलंय पाटी पुस्तक! शिक्षण नसल्यानं तरुणांना मोलमजुरीशिवाय पर्याय नाही आणि मिळणाऱ्या मजुरीत काही पोट भरत नाही. घर चालत नाही. त्यात कमवणारा एक आणि खाणारी तोंडं दहा अशी परिस्थिती. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण घर बांधतो. पण या भटक्यांचं घर म्हणजे ताडपत्रीचं पाल. हिवाळ्यात कुडकुडायचं, पावसाळ्यात पाऊस आणि उन्हाळ्यात ऊन झेलायचं. या देऊळवाल्यांच्या कितीतरी पिढ्या हे सारं सोसतायत. त्यांना अजूनही स्वत:चं हक्काचं पक्कं घर मिळायचंय. अशी वाऱ्यावर वरात असणारे हे लोक. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून त्यांना कुठलेही अधिकार मिळालेले नाहीत. भारतीय नागरिक असल्याचा एकही पुरावा त्यांच्याकडं नाही. ना मतदान कार्ड, ना रेशन कार्ड. बरं गावोगाव भटकणारे हे देऊळवाले कोणत्याच पक्षाची व्होटबँक नाहीत. त्यामुळं कोणतेच पुढारी, नेते, पक्ष त्यांच्याकडं फिरकतही नाहीत. त्यामुळं ज्याच्यापुढं गाऱ्हाणं मांडावं असा माणूस त्यांना अजून भेटायचाय. तोपर्यंत त्यांचं पाठीवर बिऱ्हाड आणि वाऱ्यावरची वरात सुरूच राहणार आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या कडकलक्ष्मीच्या पुजाऱ्यांची लक्ष्मी मात्र त्यांच्यावर मेहेरबान झालेली नाही. दिवाळीत आपण गोडधोड जेवण करत असताना, फटाके फोडत असताना या कडकलक्ष्मी एक वेळेच्या जेवणासाठी धडपडत असतील, जगण्याशी झगडत असतील. अजून किती दिवस त्यांना हा संघर्ष करावा लागेल हे त्यांच्या डोक्यावरचा देवच जाणे!

Tags

   

Comments (1)

  • Guest (sambhaji bhagat)

    rohini you r great reporter yalokannche dukkh veshivar tangales.khup helaun gelo.tyanchya sangitacha ani geetancha vapar adhik karata aala asata.ya jamatichya mahila uttam ovya gatat.aso.great work

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.