आकाश कवेत घेतलेला कंदील!

नाशिक जगातील सर्वात मोठा आकाश कंदील नाशिकमध्ये साकारलाय. दिवाळी हा दिव्यांचा सण. अंधारावर मात करून प्रकाशमान व्हा... असा जणू संदेश देणाऱ्या दीपावलीत त्यामुळेच आकाश कंदिलाला पहिला मान असतो. सध्या घराघरांसमोर विविध आकारांचे आणि प्रकारांचे रंगीबेरंगी आकाश कंदील उजळलेत. परंतु नाशकातील आकाश कंदील सर्वांच्याच कुतूहलाचा विषय बनलाय. जगातील सर्वात मोठा आकाश कंदील म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालीय. आता गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रसाद पवार या एका ध्येयवेड्या तरुणानं हा आकाश कंदील साकारलाय. यातून नाशिकची वेगळी ओळख जगासमोर यावी हा त्याचा उद्देश आहे. 2009 मध्ये 2.8 एमएम एवढ्या सूक्ष्म आकाराचा आकाश कंदील तयार करून त्यानं लक्ष वेधलं होतं. आताचा आकाश कंदील तब्बल 108 फूट उंच आणि 40 फूट रुंद आहे. हा कंदील खास 110 टन क्षमतेच्या इटालियन क्रेनच्या मदतीनं नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात 150 फूट उंचीवर उभारण्यात आलाय. महाकाय आकाश कंदील तयार करण्यासाठी 40 कारागीर दहा दिवसांपासून अथक परिश्रम घेत होते. यासाठी 500 किलो लोखंड, 770 मीटर वेगवेगळ्या रंगांचे कापड आणि 120 किलो लाकडाचा वापर झालाय. तो इकोफ्रेंडलीही आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हा आकाश कंदील प्रज्वलित व्हावा यासाठी यात खास लाईटिंगही बसविण्यात आलीय. 15 नोव्हेंबरपर्यंत हा विश्वविक्रमी आकाश कंदील सर्वांना पाहता येणार आहे.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.