आदिवासींना विकासाशी सांधणारं ‘साकव’

रोहिणी गोसावी

रोहिणी गोसावी, रायगड गाण्याच्या सोबतीनं कामात दंग झालेल्या महिला आणि ताल धरून धानाची झोपडणी करण्यात दंग शेतकरी, असं चित्र सध्या पोबळ खोऱ्यात बघायला मिळतंय. इथल्या आदिवासींना आशेचा नवा किरण मिळालाय. त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचं काम गेली 23 वर्ष 'साकव' ही संस्था करतेय. आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी अरूण शिवकर यांनी 1989 मध्ये 'साकव'ची स्थापना केली. साकवचा अर्थच मुळात दोन टोकांना जोडणारा दुवा असा होतो. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात 'साकव'चं काम प्रामुख्यानं काम सुरू आहे. इथले बर्डा आणि आमटेम गावाचा त्यांनी कायापालट केलाय. पोबळच्या खोऱ्यात वर्षानुवर्ष राहणारा आदिवासी समाज वर्षातून एकदा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती करायचा. त्यानंतर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी किंवा शहरात जाऊन मोलमजुरी करायची असंच त्यांचं जगणं होतं. पण साकवची स्थापना झाली आणि या आदिवासींचं स्थलांतर थांबलं. आपल्याच शेतात पिकं घ्यायची, राहिलेल्या वेळात बचत गटामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवायचे आणि पैसे कमवायचे असं त्यांचं नविन आयुष्य सुरू झालं. आदिवासींच्या जीवनातली सगळ्यात मोठी क्रांती झाली ती सेंद्रीय शेतीतून. कारण शहरांच्या आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावापासून इथला आदिवासीही वाचला नाही. शेतीसाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला. पण रासायनिक खतांचा वापर न करता आपल्या पारंपरिक पद्धतीनंच शेती करायला 'साकव'नं आदिवासींना प्रोत्साहन दिलं. पारंपारिक शेतीच्या पद्धतीत थोडा बदल करुन चांगली आणि फायद्याची शेती आदिवासींना करुन दाखवली. त्यामुळं आता हा आदिवासी शेतकरी त्याच्या शेतात दोन पिकं घेतो. स्वत: बाजारात चांगल्या भावनं ते विकतो आणि पैसा कमावतो. 'साकव'च्या प्रयत्नांमुळं दरवर्षी स्थलांतरित होणारे हे आदिवासी आता त्यांच्या गावात स्थिरावलेत. 'साकव'च्या मदतीनं आदिवासी गावातला रस्ता स्वत:च बनवतात. तांदुळ हे पारंपारीक पीक सोडून शेतमळ्याच्या रुपानं हे लोक भाजीपाला पिकवतात. एका शेतमळ्यात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला एकाच वेळी घेतला जातो. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाजीपाल्यामुळं त्याला भावही चांगला मिळतोय. शेती व्यतिरिक्त आदिवासींचं स्थलांतर थांबल्यामुळं गावांमधील शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आदिवासी मुलं रोज शाळेत येवू लागले. मुळात आदिवासी लहान मुलांसाठी आंगणवाडी सुरू करूनच 'साकव'नं आपल्या कामाची 23 वर्षांपूर्वी सुरूवात केली होती. गावातला पैसा गावात ही नविन संकल्पना 'साकव'नं सुरु केली. त्यातून सावकारशाही नष्ट झाली. आदिवासी महिलांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण सुरू झालं. एकूणच काय तर 'साकव'नं आदिवासी लोकांचा, त्यांच्या गावाचा कायापालट करून त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी केलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.