लोकसंगीताला रिमिक्सचा साज

सुखदा खांडगे

'वाट बघतोय रिक्षावाला', 'बोटीनं फिरवाल का?', 'मला लगीन कराव पायजे...' ही हिट गाणी कुणी गायलीत, माहितेय? तिचं नाव रेश्मा सोनावणे. ती आहे कर्जतची. आंबेडकरी कव्वाली गाणारी ही गायिका अजून उपेक्षितच राहिलीय. सध्या सगळ्यात हिट गाणं कुठलं हे कुणालाही विचारा...सांगतील, 'रिक्षावाला'! गावातल्या लग्नाच्या वरातीपासून ते फाईव्हस्टार पार्टीतल्या धमाल डीजे डान्सपर्यंत 'रिक्षावाला' लावल्याशिवाय अंगात वारंच घुसत नाही. या गाण्याचे अनेक मिक्स झाले, रिमिक्स झाले. पण हे गाणं गाणारी मूळ गायिका कोण, कुठली? माहितेय? तिचं नाव रेश्मा सोनावणे. ती आहे कर्जतची. या गाण्याचे रिमिक्स करणाऱ्यांनी लाखो रुपये कमावले. पण आंबेडकरी कव्वाली गाणारी ही गायिका अजून उपेक्षितच राहिलीय. तीच गोष्ट 'नवरी नटली' गाणारे छगन चौघुले असोत की 'पिंट्याची हंडी'फेम प्रा. गणेश चंदनशिवे! यांची ग्लॅमर दुनियेच्या पलिकडं राहून हे लोक खऱ्या अर्थानं लोकसंगीताची सेवा करतायत. रेश्मानं वयाच्या १४व्या वर्षी 'वाट बघतोय रिक्षावाला' हे गाणं गायलं. तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की, हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल. त्यानंतर 'बोटीनं फिरवाल का?', 'मला लगीन कराव पाहिजे' ही गाणी तिनं गायली. या सर्व गाण्यांचं आता रिमिक्स झालंय, सगळी गाणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत. पण ही गाणी गाणाऱ्या रेश्माला खरंच प्रसिद्धी मिळाली का? तिला तो मान-सन्मान मिळाला का? हा प्रश्न तसाच आहे. कारण मुळ लोककलाकर आणि गायकांकडं आपल्याकडं नेहमीच दुर्लक्ष होतं. तसंच दुर्लक्ष रेश्माकडंही झालंय. रेश्मासारखेच असे इतरही अनेक कलाकार आहेत की त्यांची गाणी हिट झालीत. पण हे कलाकार मात्र कुठल्या तरी कोपऱ्यात पडलेत. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर येऊन या खऱ्याखुऱ्या कलाकारांनी आपल्या हिट गाण्यांचा फॉर्म्युला सांगितला आणि खंतही व्यक्त केली. यात एक नाव आहे, 'नवरी नटली'वाले गोंधळी छगन चौघुले... नवरी नटली हे गाणं मुळात बनलं ते पारंपरिक जागरणासाठी. रिमिक्समधून या गाण्यानं अगदी धुमाकूळ घातला. गावो-गावी लग्न समारंभाला किंवा कोणत्याही शुभप्रसंगी जागरण आणि गोंधळ करण्याची एक परंपरा आहे. या परंपरेतूनच छगन चौघुले यांचा आवाज लोकांपर्यंत पोहचवला. नवरी नटली या गाण्यानं छगन चौघुलेंना घराघरांत पोचवलं. छगन चौघुलेंच्या घरातच गोंधळाची परंपरा. त्यामुळं गोंधळ त्यांच्या रक्तातच. जागरणाचा एक भाग असलेल्या खंडोबाचं लग्न रंगवण्यासाठी छगनरावांनी 'नवरी नटली' रचलं आणि ते तुफान हिट झालं. 15 वर्षांपूर्वी रचलेल्या या गाण्यानं खेडोपाड्यातच नव्हे तर शहरा शहरांत धिंगाणा घातला. 'पिंट्याची हंडी'फेम प्रा. गणेश चंदनशिवे आता सर्वांना माहीत झालेत. या गाण्यानेच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मागील वर्षीच रिलीज झालेल्या 'शैतान' सिनेमातलं 'पिंट्याची हंडी' हे गाणं गाजलं, ते गायक चंदनशिवेंच्या पहाडी आवाजामुळं. तमाशाची वडिलोपार्जित परंपरा लाभलेले गणेश चंदनशिवे मुळचे जालना जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावचे. आपल्या पहाडी आवाजानं साऱ्या महाराष्ट्राला त्यांनी मंत्रमुग्ध केलं. नुसतं लोकगीतकार न राहता त्यांनी लोककलेतील नवी पिढी घडवत परंपरेला रिमिक्सची झालर देऊन लोकगीत सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणजे 'पिंट्याची हंडी' हे गाणं. या गाण्यासोबत अनेक पारंपरिक गण त्यांनी नव्या स्टाइलनं सीडीसाठी गायली आहेत.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.