आदिवासींच्या विकासासाठी झटणारी 'आयुश'

राहुल रणसुभे

राहुल रणसुभे

ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आदिवासींच्या विकासासाठी `आयुश` ही स्वयंसेवी संस्था काम करते. या संस्थेचे प्रमुख सचिन सातवी यांच्याशी राहुल रणसुभे यांनी केलेली बातचीत.

आयुशची संकल्पना तुम्हाला कशी सुचली?

माणसावर संस्कार त्याच्या बालपणातच होत असतात. मी तलासरी येथे शाळेत होतो त्यावेळी माझ्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. लहानपणापासून समाजासाठी काही करावं आणि आपल्या ज्ञानकौशल्याचा आपल्या समाजासाठी उपयोग व्हावा, असं मला नेहमी वाटायचं. अभियांत्रिकी शिक्षणासाठी मुंबईत असताना आदिवासी विद्यार्थ्यांची शहरातील धडपड पाहिली. शहरात गेलेली बहुतेक उच्चशिक्षित पिढी आधुनिकतेच्या नावाखाली आपली आदिवासी संस्कृती विसरत चाललेली होती. त्यांच्या ज्ञान आणि कौशल्याचा गावातील तरुणांना व विद्यार्थ्यांना उपयोग होत नाहीये हे सर्व पाहून माझं मन अस्वस्थ होई. या सुशिक्षित नोकरी-व्यवसाय़ करणाऱ्या आदिवासी तरुणांना एकत्र आणून, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत गावातल्या गरजूंना त्यांचं मार्गदर्शन मिऴावं या हेतूनं गावात स्वयंपूर्ण ग्रुप तयार करावे आणि त्यासाठी सोशल नेटवर्किंगची मदत घ्यायचं ठरलं. मग आदिवासी पिढीला लक्ष्य करत युवक-युवतींचा ग्रुप तयार केला आणि या ग्रुपला नाव दिलं `आदिवासी युवा शक्ती`.  

आयुशच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जातात?

तरुण वर्गात सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करून स्वतःहून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, यासाठी आयुशचे कार्यक्रम तयार केलेले आहेत. आयुशकडे उत्पनाचं साधन नसल्यामुळं सध्या तरी सगळे कार्यक्रम आर्थिक सहकार्यावर अवलंबून आहेत.

सोशल नेटवर्किंगद्वारे पुढील कार्यक्रम घेतले जातात.

1)शैक्षणिक आणि व्यवसाय मार्गदर्शन, 2) संस्कृती आणि कला, परंपरा याचं जतन, ३) सामाजिक एकोपा आणि सामाजिक जबाबदारीची भावना, ४) आरोग्य व नैसर्गिक संपत्तीचं जतन, ५) तंत्रज्ञान व सामाजिक विकासाबद्दल जागरूकता, ६) आदिवासी सशक्तीकरण व जागरूकता.

आदिवासी समाजातील संस्कृती जपण्यासाठी आयुश कसं कार्य करते?

आदिवासी संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो, मानवाच्या जीवनशैलीत या संस्कृतीचा मोलाचा वाटा आहे. ती निसर्ग आणि ज्ञानावर आधारित असल्यानं निसर्गाचं संतुलन राखून नैसर्गिक संपत्तीचं जतन करायचं असल्यास तिचं संवर्धन होणं आवश्यक आहे, याची जाणीव तरुण आदिवासी पिढीला करून देण्याकरता विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

त्यापैकी काही पुढे दिले आहेत.-

१) सांस्कृतिक माहितीचं डॉक्युमेंटेशन, २) पारंपरिक सण-उत्सव यांविषयीची माहिती सोशल नेटवर्कवर देणं.  ३) सामाजिक एकोपा वाढविण्याकरता एकत्र येऊन सण साजरे करण्याकरता जागरूकता निर्माण करणं, ४) पारंपरिक नृत्य स्पर्धा आणि त्यांची चलतचित्रं इंटरनेटवर प्रसारित करणं, ५) आपले पारंपरिक उत्सव व संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न, ६) पारंपरिक कलेबाबत मार्गदर्शन (वारली चित्रकला), ७) आदिवासी सशक्तीकरण संस्था व विद्यापीठ उभारणीसाठी प्रयत्न.

आदिवासी समाज जीवन तसंच आदिवासी भाषा यांच्या संवर्धनासाठी कोणकोणते प्रयोग केले आहेत?

आदिवासी जमातींची ओळख म्हणजे त्यांची बोलीभाषा आहे, तिचं जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आदिवासी बोलीभाषेवर अभ्यासू संशोधन होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत. संभाषण करताना, कार्यक्रमपत्रिका, शुभेच्छा पत्रं इत्यादी बनवताना आदिवासी भाषेचा वापर करणं. असे विविध कार्यक्रम घेतले जातात.

उदा. १) आदिवासी भाषेतला ऑनलाईन भाषाकोश बनवणं, २) आदिवासी शब्द संवादात वापरणं, ३) आदिवासी बोलीभाषेतील लिखाण प्रकाशित करणं ४) आदिवासी बोलीभाषेत निबंध स्पर्धा अयोजित करणं, ५) सोशल नेटवर्किंगवर आदिवासी बोलीभाषेचा उपयोग करणं. आज आयुशचे ६,५०० पेक्षा जास्त ऑनलाईन सदस्य आहेत. त्यापैकी ८० टक्कॆ वर्ग तरुण आहे.

आदिवासी शिक्षण व व्यवसायामध्ये आयुशचं कार्य?

आदिवासी भागात शिक्षणाचा अभाव नेहमीच आढळून येतो. याला गरिबीबरोबरच अन्य कारणंही जबाबदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव. आयुशनं शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य व त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण व व्यवसाय निवडण्यासाठी मार्गदर्शन शिबिरं आयोजित करायला सुरुवात केलीय. शिवाय ज्यांना शिबिरांमध्ये सहभागी होता येत नाही, अशा तरुणांसाठी फेसबुकवर माहिती प्रसारित केली जाते. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागातील  विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे वा प्रत्यक्ष भेटीतून मार्गदर्शन करण्यात येतं. आदिवासी तरुणांचे लेख प्रसिद्ध केले जातात. स्त्रियांना शैक्षणिक पातळीवर व इतर गोष्टीत पुढे आणण्यासाठी आयुशने २००८ साली `आदिकन्या` नावाचा खास आदिवासी मुलींचा ग्रुप स्थापन केला. आज त्याच्या ७०० पेक्षा जास्त ऑनलाईन सदस्य आहेत. आयुशतर्फे तयार करण्यात आलेला कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवडला गेला आहे.

कला व संस्कृती जपताना आयुशचा दृष्टिकोन कसा असतो?

तरुण पिढीला नेहमीच नव्याचं आकर्षण असतं, म्हणूनच ती आज जुनं विसरून आधुनिकतेकडे जाताना दिसते. परंतु यामुळं आपली संस्कृती ऱ्हास पावू नये म्हणून तरुण पिढीमध्ये आपली कला, नृत्य, सण यांची आवड निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठी जुनेच सण नव्या पद्धतीनं साजरं करणं. पारंपरिक वारली चित्रकला, नृत्यामध्ये आधुनिकतेची जोड दिल्यास ती तरुण पिढीला मॉडर्न वाटेल. त्यामुळं युवा वर्ग त्यात रस घेऊ लागेल. तारपा व अन्य आदिवासी नृत्यंसुद्धा तरुणांमध्ये गरबा व दांडियाइतकीच लोकप्रिय होतील. अशा प्रकारे परंपराही जपल्या जातील व त्यातील नावीन्यही कायम राहील.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.