रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3

अपर्णा देशपांडे


शेतकरी कलावंत, व्यावसायिक रंगभूमी आणि 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे हाऊसफुल्ल नाटक, या सर्वांची सांगड घातली अभिनेते नंदू माधव यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण, खरेखुरे शिवराय समजावून सांगण्याचं काम जालन्यातल्या शेतकरी कलावंतांनी केलंय. या नाटकावरचाच अपर्णा देशपांडेचा हा स्पेशल रिपोर्ट... 

Shivaji Underground in bhimnagar mohalla bharat4india.com 3आपली मराठी रंगभूमी अतिशय प्रगल्भ आहे. आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापासून दूर आणि दुर्लक्षित असलेले शेतकरी, कामगार आता रंगभूमी गाजवू लागलेत. 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात तरुण शेतकरी कलावंतांच्या सळसळत्या वावरामुळं मराठी नाटकांच्या शहरी सुरात ग्रामीण सूर मिसळलाय. या नाटकातल्या कलावंतांचा आवाज इतका अस्सल आहे, की यातून खरेखुरे शिवाजी महाराज कसे होते. त्यांचे विचार, त्यांची धोरणं काय होती आणि आपल्याला माहीत असलेला इतिहास तो काय? याचा पुन्हा विचार करायला लावणारं हे नाटक आहे.

Shivaji Underground in bhimnagar mohalla bharat4india.com 5.png'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात इंद्रदेव यमाला शिवाजी महाराजांना त्यांच्या विचारांसह स्वर्गलोकी आणण्याचा आदेश देतात. यम महाराजांना आणतो. पण आपले विचार सोबत नसल्याचं सांगून महाराज यमाच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. मग इंद्रलोकातून सस्पेंड झालेला यम शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी पोहोचतो भीमनगर मोहल्ल्यात. शिवजयंती उत्सवानिमित्त तिथे 'धर्मा' आणि 'मिलिंद कांबळे' या शाहिरांमध्ये जुगलबंदी रंगते आणि हे दोघंही आपआपला शिवाजी त्यांच्या कवनातून मांडतात. धर्मा शाहिराचा शिवाजी हा जिजाऊंना देवीचा दृष्टांत होऊन जन्मलेला अवतारी पुरुष आहे, तर मिलिंद कांबळेचा शिवाजी हा जात-धर्म-रूढी न मानणारा, रयतेच्या हितासाठी नवनवीन धोरणं राबवणारा, स्त्रियांचं रक्षण करणारा असा सर्वसामान्यांचा राजा आहे. शिवाजी महाराजांनी जीवा महाल या नाभिकाच्या हाती तलवार दिली. शत्रू पक्षाच्या किल्लेदाराच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या आपल्या मराठा सरदाराचे डोळे फोडले. अफझलखानाचा अंगरक्षक कृष्णाजी कुलकर्णीला कंठस्नान घातलं, तर दुसरीकडं महाराजांनी जाती-धर्माचा भेद न बाळगता आपल्या सैन्यात 35 टक्के मुसलमानांना भरती केलं. महाराजांचे 11 अंगरक्षक हे मुसलमान होते. हा सर्व इतिहास अतिशय निर्भीडपणे सांगण्याचा धाडसी प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. 

Shivaji Underground in bhimnagar mohalla bharat4india.com 2.pngशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून या नाटकाची निर्मिती झालीय. या नाटकाचा आत्माच मुळी शाहिरीत आहे. आपल्या गावरान भाषेत अगदी सकसपणे राजकुमार तांगडे या लेखकानं आपलं म्हणणं या नाटकात मांडलंय. महाराजांच्या विचारांच्या शोधात निघालेला यम धर्मा-मिलिंदच्या जुगलबंदीनंतर नाटकाच्या शेवटी इंद्राला फोन करतो आणि सांगतो, ``स्पेशल यमदूत पाठवूनसुद्धा शिवाजी महाराजांना त्यांच्या विचारांसह पकडता येणार नाही. कारण त्यांचे विचार कुण्या एका माणसात नसून अनेक व्यक्तींमध्ये, चळवळींमध्ये आहेत.`` या नाटकाचा प्रयोग यशस्वी करण्यामागं प्रत्येक कलाकाराची मेहनत दिसून येते. यातला प्रत्येक कलावंत तोडीसतोड आहे. मग 'आक्का'चं काम करणारी आशा भालेकर असो किंवा 'यमा'चं काम करणारा प्रवीण डाळिंबकर. संभाजी तांगडे यानं 'धर्मा'ची आणि कैलाश वाघमारेनं 'मिलिंद कांबळे'ची भूमिकाही अगदी व्यवस्थित पार पाडलीय. तर राजू सावंतचा 'पाशा', याचं काय करायचं? असं म्हणत 'गोट्या' आणि 'लोट्या'ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

एकूणच काय तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दिग्दर्शक नंदू माधवनं अस्सल ग्रामीण कलावंतांसोबत मिळून सादर केलेलं 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारं आहे. 

अपर्णा देशपांडे, मुंबई

 

Tags

   

Comments (1)

  • Guest (nandu madhav)

    अपर्णा छान एडिट केलं आहेस आणि कव्हर पण मस्त . तुला आणि साइटला शुभेच्छा !

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.