डोंबिवलीत `आमचो कोकण`

ब्युरो रिपोर्ट

मालवणी महोत्सव म्हटला की, मत्स्याहार आणि मालवणी सामिष भोजन. यात मिळते उत्तम जातींची मासळी. भात आणि माशाच्या सागुतीची मेजवानी.


कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे प्रसिद्ध आहेत, विविधतेनं नटलेले समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि तिथं मिळणारे चविष्ट मासे यांसाठी. याशिवाय इथले काजू, नारळ आणि नारळापासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तू प्रसिद्ध आहेत. इथल्या हापूस-पायरीच्या आंब्याला तर जगातून मोठी मागणी आहे. आंबापोळी, आंबावडी, आमरस हे आंब्यापासून बनवले जाणारे पदार्थ, तसंच फणस, करवंद, कोकम, आवळा इत्यादींपासून बनवले जाणारे विविध पदार्थ, शिवाय विविध सरबतं प्रसिद्ध आहेत. 

कोकणातला हा मेवा मुंबईकरांना चाखायला मिळावा आणि कोकणातल्या लघुउद्योगांना चालना मिळावी व्यासपीठ मिळावं, यासाठी डोंबिववलीतील लोकसेवा समितीतर्फे हा कोकणी महोत्सव आयोजित करण्यात येतो. गेल्या 17 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांत हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. ग्रामीण भाग शहरी भागाशी जोडणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजक सांगतात. महोत्सवाचं डोंबिवलीतील हे चौथं वर्ष आहे.

या महोत्सवात डोंबिवलीकरांना पापलेट, सुरमई, कोंबडीवडे, बांगडा, खेकडा फ्राय, खेकडा मसाला, खिमापाव, सोलकढी, कोकम सरबत, शेवेचे लाडू यांची मेजवानी मिळाली. याशिवाय विविध कोकणी मसाले, मालवणी मसाले, सुकवलेले मासे, बोंबिल आदी विविध पदार्थांचे स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले होते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला डोंबिवलीकरांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील अनेक खवय्यांनी आवर्जून भेट दिली. या महोत्सवाचं वैशिष्ट्य सोलकढी आणि मच्छीफ्राय.

इथं भेट देणारा प्रत्येक जण या महोत्सवातील विविध पदार्थांचा फडशा पाडून तृप्त होऊनच बाहेर पडत होता.

- प्रदीप भणगे, नवनाथ कोंडेकर, मुंबई.

 

   

Comments (2)

  • Guest (Pradip bhanage)

    In reply to: # 144

    Thanks

  • Guest (Prashant)

    चागला उपक्रम. आणि ह्या साईट प्रथमच कमेन्ट देत आहे. देवनागरी वापरता येते ह्याचा फार आनंद झाला.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.