लोककलेतील युवा पिढी

सुखदा खांडगे

सुखदा खांडगे, मुंबई -

लोककला ही गावागावांतील, त्या प्रदेशातील जीवन दर्शवणारा एक आरसा आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनावर लोककलेचा मोठा प्रभाव आहे. वगनाट्य, पोवाडे, तमाशा, गण, गवळण, बतावणी, भारूड इत्यादी पारंपरिक लोककलेची परंपरा आजच्या आधुनिक संगीताच्या जमान्यात हरवून जातील की काय, अशी परिस्थिती आहे. पण आधुनिक रिमिक्सच्या जमान्यात ही कला हरवून जाण्याची अजिबात भीती नाही. उलट या कलांना नक्कीच चांगले दिवस येतील, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे युवक आपल्या वडिलोपार्जित कलेचं जतन आणि संवर्धन करत आहेत.

युवा पिढीवरील पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव म्हणा वा नवनवीन करियर जरी भुरळ पाडत असलं, तरी या चंदेरी करियरच्या मोहात न पडता महाराष्ट्रातील बरेच युवा कलावंत आपली पारंपरिक लोककला जोपासण्याचा ध्यास घेऊन आहेत.

औरंगाबादच्या योगेश चिकटगावकरनं तर पारंपरिक लोककलेबाबत जनसामान्यांमध्ये प्रबोधन करण्याचा ध्यास घेतला आहे. लोककलेचं पुढील शिक्षण घेण्यासाठी तो मुंबईला आलाय. योगेश भारूड आपल्या वडिलांकडूनच शिकलाय आणि आता लोककला अॅकॅडमीमध्ये गण, गवळण, बतावणी, भारूड इत्यादी लोककलेचे प्रकार नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम करत आहे. असे हे पारंपरिक लोककलेचं जतन करण्याच्या ध्यासानं प्रेरित झालेले युवक रिमिक्सच्या या युगात आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणं कार्य करत आहेत आणि हे कार्य पुढेही सुरू ठेवण्याचं स्वप्न मनात बाळगून आहेत.

औरंगाबादचा यशवंत जाधव हा एक कलावंत. त्याला रांगड्या, महाराष्ट्राची मर्दानी अभिव्यक्ती सादर करणाऱ्या पोवाड्याची ओढ लागली, ती आपल्या वडिलांकडून, शाहीर सुरेश जाधवांकडून. पारंपरिक पोवाडे म्हणता म्हणता तो या कलेच्या प्रेमात पडला. कॉलेजमधून कला माध्यमाचं शिक्षण घेत असतानाच तो आणि त्याचा मित्रवर्ग वडिलांकडून पोवाड्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत.

घरातूनच वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेला असाच दुसरा कलावंत म्हणजे, आंबेगावचा विकास कोकाटे. महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांची या युवकाला विशेष आवड. आजच्या पिढीतील पर्कशनिस्ट वाद्यांच्या बरोबरीनं ताल धरून दिमडी, संबळ, ढोलकी, पखवाज अशा वाद्यांचा नाद तो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत घुमवत आहे. घरातूनच त्याला पखवाजाचं शिक्षण लाभलं. कीर्तनामध्ये तो वडील, काका यांच्याबरोबर पखवाज वाजवतो. याशिवाय तमाशामध्ये किंवा गोंधळामध्ये वापरली जाणारी संबळ हे वाद्यही वाजवण्याचं शिक्षण त्यानं घेतलंय. त्याचं पुढचं ध्येय आहे ते संबळ या वाद्याचा युवा पिढीमध्ये प्रसार करणं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.