चौधरीवाडीचा खंडू झाला श्रावणबाळ

अविनाश पवार

पुणे - वृद्ध आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवणारा गोष्टीतला श्रावणबाळ आपणाला माहीत आहे. सध्या आपल्या आसपास 'श्रावणबाळ' पाहायला मिळणं दुर्मिळच. पण आईवडिलांची सेवा करणारा श्रावणबाळ पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या चौधरीवाडीत. त्याचं नाव खंडू चौधरी. त्यानं आई-वडिलांना चक्क कावडीत बसवलं आणी ती खांद्यावर घेऊन पायी आळंदीची तीर्थयात्रा घडवली...

सध्याच्या वाहनांच्या युगात कावडयात्रा करणं म्हणजे वेडेपणाच. पण म्हणतात ना...कुणाला कशाचं वेड लागेल ते काही सांगता येत नाही.., खंडूनं लहानपणी श्रावणबाळाची कथा ऐकली होती. तेव्हापासू्न 'श्रावणबाळ' त्याच्या मनात घर करून होता. अलीकडंच त्यानं निश्चय केला, कावडीत आई-वडिलांना बसवलं आणि आळंदीची वाट चालू लागला. चौधरीवाडी ते आळंदी हे ४८ किलोमीटर अंतर आहे. हे अंतर कापून पुत्रदा एकादशीच्या दिवशी तो आळंदीत माऊलींच्या चरणी दाखल झाला. येणारे जाणारे हा 'आधुनिक श्रावणबाळ' कोण आला म्हणून उत्सुकतेनं त्याच्याकडं पाहत होते. 

आता तर पंचक्रोशीत 'श्रावणबाळ' अशीच त्याची ओळख आहे. पंढरीची आषाढी वारीही त्यानं आई-वडिलांना अशीच घडवली.     

खंडूचे वडील लक्ष्मण चौधरी हे ८५, तर सावत्र आई शेवंताबाई ७८ वर्षांच्या आहेत. मुलगा ज्या तळमळीनं तीर्थयात्रा घडवतो, त्याचा त्यांनाही अभिमान आहे. नाहीतर खंडूकडं बघितल्यावर आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या हायटेक बाळांचीही आठवण होतेच. म्हणूनच हा भोळाभाबडा 'श्रावणबाळ' सर्वांनाच भावतोय. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.