त्यांच्या जगण्याला फुटतेय 'पालवी'...

यशवंत यादव

सोलापूर – कटू सत्य आहे, पण एचआयव्हीची बाधा झालेल्या व्यक्तींना आपल्याकडं सहानुभूतीनं वागवलं जात नाही. ज्यांचा काहीही अपराध नाही अशा एचआयव्हीग्रस्त बालकांच्याही नशिबात घोर उपेक्षा येते. अशा बालकांना मायेची ऊब देऊन त्यांचं जीवन उभं करण्याचं काम पंढरपुरातील पालवी ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून करते आहे. सध्या 'पालवी'त 54 एचआयव्हीबाधित मुलं आनंदानं वाढताहेत. 


बालकांचे मूलभूत हक्क  एचआयव्हीबाधित बालकांनाही मिळावेत, म्हणून पालवी धडपडतेय. प्रभा-हिरा प्रतिष्ठानतर्फे पालवीचं कामकाज चालतं. इथं मुलांना पोषक आहार, प्राथमिक शिक्षण व आरोग्य सुविधा दिल्या जातात. शिवाय चांगलं मूल्यशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पालवीमध्ये समाजानं नाकारलेल्या मुलांचा संभाळ केला जातो, त्यांचं पुनर्वसन केलं जातं. म्हणून पालवी या मुलांचं हक्काचं आणि प्रेमाचं घर आहे. 

या मुलांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिध्द करण्यासाठी त्यांना संधी हवी आहे. त्यांची लढाई ते लढतच आहेत. त्यांच्यामधील ऊर्जा टिकवण्यासाठी गरज आहे, थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. या मुलांचं जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आनंद देण्यासाठी आपणही आपला मोलाचा खारीचा वाटा उचलायला हवा. 

पालवीच्या आगामी योजना

पालवीला अजूनही हजारो बालकांपर्यंत पोचायचं आहे. सध्याची इमारत अपुरी पडू लागल्यानं 500 बालकांचा निवासी प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे. शाळेची आधुनिक इमारत आणि सभागृह बांधण्याची योजना आहे. औषधी वनस्पतींची लागवड, फळं आणि भाजीपाल्यांची लागवड, कर्मचारी वसाहत, सुसज्ज रुग्णालय, पर्यावरणाशी सुसंगत उत्पादनांच्या निर्मितीचा कारखाना या आगामी योजना आहेत. त्यासाठी सर्वांनी मदत करावी, असं आवाहन संस्थेनं केलंय. 

मृत्यूशी लपंडाव 

हो मृत्यू, मी तुझ्यापासून दूर जातोय

असं समजू नकोस

मी तुला चुकवतोय असंही समजू नकोस

मी एचआयव्हीसहित जगणारा एक बालक!

फक्त थोडी गंमत करतोय तुझ्याबरोबर,

कारण गमतीनंही खेळायला कोणी आजकाल

माझ्याबरोबर येतच नाही.

मृत्यू, तू येणार हे जेव्हा मला कळलं

तेव्हा ठरवलं तुझ्याबरोबर थोडी

लपाछपी खेळायची.

तूही थोडी गंमत म्हणून,

धरायला थोडासाच उशीर कर

तेवढीच जगण्यातली गंमत चाखेन!

- सौ. मंगलताई शहा (संस्थापक, पालवी) 

 

'पालवी'ला करा संपर्क...

पालवी, प्रभा-हिरा प्रतिष्ठान, कोर्टी कराड रोड, गॅस गोडाऊनमागे, पंढरपूर, जि. सोलापूर, महाराष्ट्र. फोन नं. 02186223350. बेबसाईट- www.palawi.org, ईमेल- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it., This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

- यशवंत यादव

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.