'शिवपुत्र शंभूराजे' आता भव्य रंगमंचावर

राहुल विळदकर

अहमदनगर – शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी 'जाणता राजा' या भव्य महानाट्याद्वारे शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र अतिभव्य सेटवर उभं करून शिवसृष्टी उभारली. याच महानाट्याच्या धर्तीवर पातशाहीपुढं मान न तुकवता वीरमरण स्वीकारणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित 'शिवपुत्र शंभूराजे' हे महानाट्य रंगभूमीवर येत आहे. शिवसेनेनं या महानाट्याचं आयोजन केलंय. 


अहमदनगरमध्ये हे महानाट्य सहा दिवस रोज एक शो याप्रमाणं रंगणार आहे. यात डॉ. अमोल कोल्हे संभाजीच्या भूमिकेत आहेत, तर ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन हे औरंगजेबाची भूमिका साकारणार आहेत. यासाठी 70-80 फुटांचा भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. या रंगमंचावर जवळजवळ 175 कलावंत आपला अभिनय साकारणार आहेत. त्यांच्यासोबत अर्धा ते पाऊण डझन घोडे, हत्ती, उंट आणि सजवलेल्या बैलगाड्याही आहेत. 
शंभू राजांची जंजिरा मोहीम दाखवण्यासाठी खास बोटींचा वापर आणि समुद्राचा जिवंत देखावा उभारण्यात आलाय. याचबरोबर सेटवर हलणारे बुरुज पाहणं हे नगरकरांना खास आकर्षण आहे.  विशेष म्हणजे रोज एका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फ्री पासही देण्यात आले आहेत. त्यामुळं बच्चेकंपनी खुशीत आहे. त्यातच स्टेजजवळ थेट जिवंत हत्ती-घोडे दिसतायत म्हटल्यावर, तो जिवंतपणा अनुभवण्यातही वेगळीच गंमत आहे.
काही इतिहासकारांनी संभाजी राजांवर लावलेला कलंक पुसून टाकावा आणि त्यांच्यातील लढवय्या महायोद्ध्याचा इतिहास लोकांसमोर आणावा, यासाठीच या महानाट्याची निर्मिती केल्याचं पुण्याच्या शिवस्वराज्य प्रतिष्ठाननं म्हटलंय. 
"वयाच्या १४व्या वर्षीच ग्रंथनिर्मिती करणारा शिवपुत्र संभाजी वीरयोद्धा होता. मग तो स्त्रीलंपट किंवा कपटी कसा असू शकतो? पत्नी येसूबाईला बरोबरीचं स्थान देणारा संभाजी हा खरा महारुद्र होता. त्यानं मराठी माणसाला मरणही कसं अभिमानानं स्वीकारावं हे शिकवलं. यासाठीच या महानाट्याचं लेखन-दिग्दर्शन केलंय,” अशी प्रतिक्रिया महेंद्र महाडिक यांनी दिलीय.
एकंदरीतच कडाक्याच्या थंडीतही जोरदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चाखणाऱ्या रसिक नगरकरांच्या पोतडीत आता शंभूराजे हे महानाट्यही दिमाखात सामील झालंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.