आगळं-वेगळं सून संमेलन

विवेक राजूरकर

औरंगाबाद - आजच्या प्रगत समाजातही सासू-सून नात्यांचा गुंता कायम आहे. औरंगाबाद इथं नुकतंच राज्यस्तरीय आगळवेगळं सून संमेलन पार पडलं. 


 

कधी आईसारखं नाजूक, हळुवार, तर कधी राक्षसनीसारखं जीवघेणं बनणारं हे नातं औत्सुक्याचा विषय आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन इथल्या विचारमंथनातून निघालेलं बोधामृत सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारं आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संमेलनात चंदाबेन जरीवाला, प्राचार्या डॉ. मनोरमा शर्मा, मंगल खिंवसरा आदींनी घरात एकत्र कुटुंबात सासू आणि सुनांची बाजू मांडली. या कार्यक्रमात सहभागी महिलांनी सासू-सून यांच्या नातेसंबंधांवर आधारित नाटकाचं सादरीकरण केलं. सासू-सुनेच्या गोड संवादातूनच, समन्वयातूनच संसाराची प्रगती होऊ शकते, असा संदेश यातून देण्यात आला.

गटचर्चांमधून अनेकींनी सासू आणि सुनांच्या जबाबदारींना ओळखून त्याप्रमाणं वागण्याचा संकल्प केला. अनेक वेळा घरात कुरबुरी असूनही दोघांनाही एकमेकांच्या मायेची ऊब आवश्यक असते, याची खात्रीच उपस्थित महिलांना पटली.

 अनेक सुनांनी आपल्याला सासू नसल्याची खंतही बोलून दाखवली. लहान-मुलांना संस्कारांची शिदोरी घरातील वयस्कर मंडळीच देऊ शकतात. तसंच सासू-सुनांत प्रेमाचं नातं असल्यास, त्या कुटुंबात सौख्य नांदत असतं, असंही मत व्यक्त केलं. संमेलनात शहरातील अनेक महिला उद्योजक, महिला डॉक्टर, वकील, पोलिस अधिकारी, घरेलू कामगार, मजूर महिला अशा अनेक सासू आणि सुनांनी सहभाग नोंदविला.

उद्घाटनपर भाषणात प्रसिद्ध विचारवंत विद्या बाळ यांनी सासू-सुनांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा, असं आग्रही प्रतिपादन केलं. तर सुनेला तिच्या पद्धतीनं संसार करू द्यावा. सासूनं मुलाच्या आणि सुनेच्या संसारात ढवळाढवळ करू नये, असं प्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंग यांनी समारोपात सांगितलं.

सासू-सुनेच्या संबंधावर संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य अवलंबून असतं. या नात्यातील गुंतागुंत समजून घेणं आणि त्यावर मात कशी करता येईल, यासाठीचा प्रयत्न म्हणजे हे सून संमेलन होतं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.