नगरमधील स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसादअपर्णा देशपांडे अहमदनगर - मुलांची धमाल... रंगपटात उडालेली बच्चे कंपनीची धांदल आणि धावपळ करणारे नेपथ्यकार... नगरमध्ये कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेतलं हे दृश्य. जवळपास राज्यभरातले २५ संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत. स्पर्धेचं हे १५वं वर्ष आहे. विशेष म्हणजे एकांकिकांच्या विषयातही कमालीचं वैविध्य विद्यार्थ्यांनी दाखवलंय. कुठं अपंग आणि गतिमंद मुलांच्या शाळेतल्या समस्यांची मांडणी, तर कुठं शिक्षणाची आबाळ, कधी हरवत चाललेली कुटुंबपद्धती, तर कधी आई-बाबांच्या भांडणामुळं उद्ध्वस्त होणारी मुलांची मानसिकता आणि घर, धीटपणानं आणि समर्थपणं ही मुलं रंगमंचावर सादर करतात. अर्थातच, पालकांचा पाठिंबा असला तरी, परफॉर्मन्स या पॅरामीटरवर हीच मुलं खरी तयारी दाखवतायत. नगरमध्ये अनेक वर्षांपासून बालरंगभूमीसाठी झटणारी सप्तरंग थिएटर्स ही संस्था यंदाही तयारीनं या स्पर्धेत उतरलीय. त्याचबरोबर पुणे, सोलापूर, बीड, बारामती अशा राज्यभरातून आलेल्या बालचमूंचीही जोरदार तयारी आहे. त्यातही शेवगावसारख्या ग्रामीण भागातून बालरंगभूमी जिवंत ठेवणाऱ्या आणि धडाडीनं या क्षेत्रात काम करणारा घेवरीकरांसारखा दिग्दर्शकही मोठ्या आशावादानं या स्पर्धेत आपला चमू घेऊन उतरलाय. एकूणच बच्चे कंपनी अजिबात भीती न बाळगता एकच वाक्य बोलतेय... हल्लाबोल! Tags |
||
Comments
|