प्रदर्शन... 'रुरल टॅलेंट'चं

शशिकांत कोरे

सातारा - रयत शिक्षण संस्थेतर्फे इथं पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील, अशी उपकरणं सादर केली. ग्रामीण शहाणपणातून साकारलेल्या या उपकरणांमुळं नजीकच्या काळात जगणं आणखी सुसह्य होण्यास हातभार लागणार आहे. 

सलाईन संपलं की बेल

वैद्यकीय क्षे़त्रात सिटी स्कॅन, एक्स-रे आदी सुविधा उपलब्ध झाल्यात. पण पेशंटला सलाईन लावल्यानंतर ते कधी संपणार याकडं लक्ष देत नातेवाईकांना थांबावं लागतं. पाटण तालुक्यातील बलमेवाडी येथील नाईकबा विदयालयातील सिद्धेश्वर चोरगे आणि मदन भोरे यांनी सलाईन संपलं, की बेल वाजणारं उपकरण तयार केलंय. केवळ दीडशे रुपयात हे उपकरण तयार होतं.

विजेशिवाय पाणीउपसा 

राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाई आहे, तर जिथं पाणी आहे तिथं भारनियमनाचा फटका बसतोय. ही अडचण लक्षात घेऊन खेड बुद्रुक येथील बाबुजी रामराव विद्यालयातील सर्वेश मस्कर यानं सायकलच्या चाकाचा आणि रबरी बुचांचा वापर करून उंचीवरून पाणी उपसण्याचं उपकरण सादर केलं होतं. यामुळं विहिरीतील पाणी कमी खर्चात शेतीसाठी, तर शहरातील उंच इमारतीमध्ये पाणी पोहोचवता येतं. याच तंत्राचा वापर करून पाणी मिळाल्यानंतर केशाकर्षण पद्धतीनं झाडांना कमीत कमी पाणी कसं द्यावं, हा प्रयोगही त्यानं सादर केला.

साध्या बदलातून उत्तम पेरणी

शेतीतील राबणूक कमी झाली पाहिजे, हा विचारही ग्रामीण भागातील मुलांच्या मनात घर करून असतो. त्याचं प्रतिबिंब प्रदर्शनात उमटलं नसतं तरच नवल!  कोरेगाव तालुक्यातील तासगाव येथील संजय भैरवनाथ काळे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पेरणीच्या पद्धतीत थोडासा बदल करून ती नव्यानं शेतकऱ्यांसमोर आणलीय. पूर्वीच्या काळात शेतकरी वर्ग पाईपच्या सहाय्यानं बीजारोपण करत होते. या विद्यार्थ्यांनी पाईपऐवजी भंगारातील कॉटच्या पाईपचा वापर करायचा सल्ला दिला. यामुळं पेरणी  अगदी सहजपणं तीन इंच खोल होते.  त्यामुळं बीज उगवण्याची क्षमताही दुप्पट वाढते. 

आता कळालं, 'रुरल टॅलेंट' उगीच म्हणत नाहीत काय...!

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.