कोशीश करके देख ले...

प्रदिप भणगे

ठाणे - 'ऋणानुबंध- अंध उन्नती केंद्र' ही डोंबिवलीची संस्था 'अंध लोकांनी अंध लोकांसाठी चालवलेली संस्था' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतेय. बाहेरून कोणी आपल्याला मदत करील याची वाट न बघता आपणच आपली मदत करायची या हेतूनं ही संस्था काम करते. नुकताचं या संस्थेतील अंध कलाकारांनी ऑर्केस्ट्रा सादर करून डोळस लोकांची वाहव्वा मिळवली. 


संस्थेच्या कामाला गती मिळावी यासाठी नुकताच 'ऋणानुबंध' आणि 'चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्ट'च्यावतीनं अंध मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात विविध सांस्कृतिक, तसंच चर्चात्मक कार्यक्रम सादर झाले. यात अंधांनी विविध गाणी सादर केली आणि योगासनांचीही प्रात्यक्षिकं करुन दाखवली. ''कोशीश करके देख ले...'' किंवा ''श्याम तेरी बन्सी पुकारे राधा-श्याम''यासारख्या गीतांनी उपस्थितांना अंतर्मुख करायला लावले.

डोंबिवली आणि परिसरातील अंध व्यक्तींच्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्याच परिसरातील रहिवासी अंध व्यक्तींनी पुढाकार घेत अंधांसाठी ही संस्था निर्माण केलीय. आतापर्यंत परिसरातल्या जवळपास 600 अंध व्यक्तींची नावं या संस्थेत नोंदवण्यात आलीय. 

शालेय अंध विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ट्रेनिंग देणं, स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रशिक्षण देणं, त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेणं, इत्यादी उपक्रमांनी संस्थेनं कामाची सुरुवात केलीय. पाटकर ट्रस्टच्या इमारतीच्या जागेत नॅबच्या सहकार्यानं शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य मार्गदर्शन वर्ग; तसंच बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरु झालेत. 

संस्थेचा जास्तीत जास्त विकलांग व्यक्तींना उपयोग व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीत बांधकाम केल्या गेलेल्या इमारतीत जागा मिळावी, अशी या संस्थेची मागणी आहे. 

 

 

 

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.