स्पेशल रिपोर्ट

उसानंतर आता दूध...

ब्युरो रिपोर्ट

राज्यात ऊसदरावरून आंदोलनाचा आगडोंब उसळलाय. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टींची 'जात' काढलीय. त्यामुळं एरवी परिपक्व, समन्वयाचं पुरोगामी राजकारण करणाऱ्या पवारसाहेबांना ऊसदराचं वारं का झोंबलं? असा प्रश्न विचारला जातोय. 

तर दुसरीकडं राजकीय साठमाऱ्या कितीही करा, पण आता फक्त `ऊसदराचं काय तेवढं बोला,` अशी भूमिका ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी घेतलीय. 

शेट्टींचं इंदापुरात आंदोलन

यंदाच्या हंगामात उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रान पेटवलं. दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केलं. त्यानंतर हा प्रश्न चिघळणार अशी चिन्हं दिसू लागली. राजू शेट्टी यांच्या या अगोदरच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाची जाणीव असल्यानं सरकारचं धाबं दणाणलं. मात्र हा प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारात येत नाही, असं सांगून सत्ताधाऱ्यांनी यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण  त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी जास्तच संतप्त झाले.

आगडोंब उसळला

रविवारी 11 नोव्हेंबरला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली. त्यात  पहिली उचल दोन हजार ३०० रुपये देण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर लगेच शेट्टी यांनी `चक्का जाम` आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला. दगडफेक, जाळपोळीचं सत्र सुरू झालं. त्यातच सांगली जिल्ह्यातील वसगडे येथे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चंद्रकांत नलावडे हा तरुण ठार झाला.  इंदापुरात ट्रकची हवा सोडताना झालेल्या स्फोटात आणखी एकाचा मृत्यू झाल्यानं आंदोलनाची तीव्रता वाढतच गेली. 

शेट्टींची रवानगी तुरुंगात

राजू शेट्टी आणि इतर नेत्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता ते येरवडा तुरुंगात आहेत. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन सुरूच ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आंदोलनात दोघांचा गेलेला बळी लक्षात घेता परिस्थिती आणखी स्फोटक बनू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.  केंद्राशी चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. त्यामुळं आंदोलक शेतकऱ्यांनी शांततेचा मार्ग अवलंबला आहे. तरीही पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर झाल्याशिवाय उसाचं एक कांडंही देणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी जाहीर केलीय. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि शेट्टी पुढे काय आदेश देणार, याची आंदोलक वाट पाहतायत.  

उसानंतर दूध...

उसाचा हा प्रश्न समन्वयाने निकालात निघाल्यानंतर दूधदराच्या प्रश्नावरून रान पेटणार आहे. 'दोन दिवस धारा काढू नका', असं शेट्टींनी म्हटल्यानं येत्या काही दिवसात दूधदराचा प्रश्नही सरकारला निकालात काढावाच लागेल. तसं झाल्यास ऊस आणि दुधातून बळीराजाला दोन पैसे जादा मिळतील. त्याच्या दारातही दिवाळी साजरी होईल.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.