स्पेशल रिपोर्ट

शेतकऱ्यांनी दूध ओतलं रस्त्यावर

ब्युरो रिपोर्ट

उस्मानाबाद-

उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. त्याची धग वाढतेच आहे. त्यातच आता दुधाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध नोंदवला. 

पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ करावी, परराज्यातून येणाऱ्या दुधावर गोव्याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारावं आणि तो निधी सहकारी दूध संस्थांना अनुदान स्वरूपात द्यावा, अशा मागण्या राज्य सहकारी दूध संघ कृती समितीनं शासनाकडे केल्या आहेत. समितीचे अध्यक्ष विनायक पाटील आणि उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या उपस्थितीत पुण्यात अलीकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 

दूध खरेदीचे भाव का पडले ?

दूधधंद्यात खासगी क्षेत्राचं वर्चस्व आहे. त्यामुळे दूध खरेदीचे भाव पाडले जात असल्याचा आरोप आहे. कधी आयातबंदी तर कधी निर्यातबंदीमुळे दूध पावडर निर्मिती करणाऱ्या  उद्योगांपुढेही संकट उभं राहत आहे. शेतकऱ्यांकडील दूध न स्वीकारण्याचा पर्याय डेअरी मालकांनी खुला ठेवला आहे. त्यामुळे 'खाडा' पद्धत ठराविक दिवशी असेल. याचा फटका थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

एका बाजूला दुधाचा `खाडा` ही समस्या समोर असताना दुसऱ्या बाजूला चाराटंचाई, पशुखाद्यांचे वाढलेले दर आणि दुधाच्या १७ रुपयांवरून १६ रुपयांवर आलेल्या दरानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत आहेत. एक तर दुधाचा भाव कमी होतोय. त्याचवेळी त्यांची दुधाची बिलंसुद्धा नियमित मिळत नाहीत. दूध संकलन होताना पुरेसं लक्ष देत नसल्यानं फॅट आणि एसएनएफ हे गुणवत्तेचे निकष कमी दाखवून दुधाचा दर घटवला जात असल्याचं शेतकरी आंदोलनातील नेत्यांचं म्हणणं आहे.  

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.