स्पेशल रिपोर्ट

म्हसवडमध्ये उरलाय एकच हातमाग

रोहिणी गोसावी

सातारा - उघड्या माळरानावरही ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करणारी लोकरीची घोंगडी...एकेकाळी सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये या घोंगड्यांचं सर्वात जास्त उत्पादन होत होतं. पण गेल्या काही वर्षात इथले हातमाग बंद होत गेले आणि उत्पादन झपाट्यानं कमी झालं

आता म्हसवडमध्ये उरलाय फक्त एकच हातमागआणि तोही आता शेवटच्या घटका मोजतोय

मेंढ्या पाळणारा आणि लोकर तयार करणारा धनगर समाज आणि ती लोकर विकत घेऊन त्याची घोंगडी बनवणारा सणगर समाज... धनगरांचा लोकर काढण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय अजून सुरू असला तरी अनेक कारणांमुळं सणगर समाजाचा पारंपरिक हातमागाचा व्यवसाय मात्र आता बंद होत आलाय. हातमागावर घोंगडी तयार करायला लागणारे कष्ट, जाणारा वेळ, महाग झालेली लोकर आणि एवढं करूनही त्यातून मिळणारं अल्प उत्पन्न यामुळं सणगर समाजातला तरुण या व्यवसायाकडं दुर्लक्ष करतोय. घरी हातमागावर घोंगडी तयार करण्यापेक्षा यंत्रांवर तयार केलेल्या घोंगड्या होलसेलमध्ये घेऊन त्या विकण्याचा व्यवसाय काही तरुण करतायेत. हातमागावर तयार झालेल्या घोंगड्यांची किंमत ७००-८०० रुपये असते, त्याउलट फॅक्टरीतल्या मशीनवर तयार होणाऱ्या घोंगड्यांची किंमत ही २००-३०० रुपये असते. त्यामुळं या हातमागावर तयार केलेल्या घोंगड्यांकडं सध्या ग्राहकही फिरकत नाही. त्यामुळं काही वर्षांपूर्वी इथल्या प्रत्येक घरात असलेले हातमाग आता त्यांच्या अडगळीतही सापडत नाहीयेत.  

 १५-२० वर्षांपूर्वी म्हसवडमधल्या लोकरीच्या घोंगड्यांना कोकणातून प्रचंड मागणी होती. ट्रक भरभरून घोंगड्या कोकणात जात होत्या. पण आता केवळ दत्तात्रय त्रिगुणे हेच हातमागावर काम करतात, कारण हातमागाशिवाय त्यांना दुसरा काही व्यवसाय करणं शक्य नाहीये. कदाचित त्यामुळंच या शेवटच्या हातमागाची घरघर अजूनही इथं ऎकायला मिळतेय.

तसं बघायला गेलं तर म्हसवडमधील ही वस्तुस्थिती प्रतीकात्मक आहे. यांत्रिकीकरणामुळं उत्पादन सुलभ झाल्यामुळं पारंपरिक पद्धती लोप पावल्यायत. घोंगडी व्यवसायही त्याला अपवाद नाही. पुणे जिल्ह्यातील शिरूर, सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ आदी घोंगडी उत्पादक तालुक्यांमध्ये हातमाग नाहीसे झालेत. काही ठिकाणी बचत गटांनी पुढाकार घेत मशीनवर तयार होणारे घोंगडी उत्पादन आणि विक्रीमध्ये आघाडी घेतलीय. बदललेल्या काळाचं भान ठेवून उत्पादन केल्यास आणि मार्केटिंगची नवनवीन तंत्र वापरल्यास मराठमोळा बाज असलेल्या घोंगडी व्यवसायाला पुन्हा तेजीचे दिवस येतील, असा या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे.  


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.