स्पेशल रिपोर्ट

आदिवासींच्या विकासासाठी झटणारी 'आयुश'

राहुल रणसुभे

ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आदिवासींच्या विकासासाठी `आयुश` ही स्वयंसेवी संस्था काम करते. यासंस्थेचे प्रमुख सचिन सातवी यांच्याशी राहुल रणसुभे यांनी केलेली बातचीत.

आयुशची संकल्पना तुम्हाला कशी सुचली?

माणसावर संस्कार त्याच्या बालपणातच होत असतात. मी तलासरी येथे शाळेत होतो त्यावेळी माझ्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. लहानपणापासून समाजासाठी काही करावं आणि आपल्या ज्ञानकौशल्याचा आपल्या समाजासाठी उपयोग व्हावा, असं मला नेहमी वाटायचं. अभियांत्रिकी शिक्षणासाठी मुंबईत असताना आदिवासी विद्यार्थ्यांची शहरातील धडपड पाहिली. शहरात गेलेली बहुतेक उच्चशिक्षित पिढी आधुनिकतेच्या नावाखाली आपली आदिवासी संस्कृती विसरत चाललेली होती. त्यांच्या ज्ञान आणि कौशल्याचा गावातील तरुणांना व विद्यार्थ्यांना उपयोग होत नाहीये हे सर्व पाहून माझं मन अस्वस्थ होई. या सुशिक्षित नोकरी-व्यवसाय़ करणाऱ्या आदिवासी तरुणांना एकत्र आणून, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत गावातल्या गरजूंना त्यांचं मार्गदर्शन मिऴावं या हेतूनं गावात स्वयंपूर्ण ग्रुप तयार करावे आणि त्यासाठी सोशल नेटवर्किंगची मदत घ्यायचं ठरलं. मग आदिवासी पिढीला लक्ष्य करत युवक-युवतींचा ग्रुप तयार केला आणि या ग्रुपला नाव दिलं `आदिवासी युवा शक्ती`. 

 

आयुशच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जातात?

तरुण वर्गात सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करून स्वतःहून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, यासाठी आयुशचे कार्यक्रम तयार केलेले आहेत. आयुशकडे उत्पनाचं साधन नसल्यामुळं सध्या तरी सगळे कार्यक्रम आर्थिक सहकार्यावर अवलंबून आहेत.

सोशल नेटवर्किंगद्वारे पुढील कार्यक्रम घेतले जातात.

1)शैक्षणिक आणि व्यवसाय मार्गदर्शन, 2) संस्कृती आणि कला, परंपरा याचं जतन, ३) सामाजिक एकोपा आणि सामाजिक जबाबदारीची भावना, ४) आरोग्य व नैसर्गिक संपत्तीचं जतन, ५) तंत्रज्ञान व सामाजिक विकासाबद्दल जागरूकता, ६) आदिवासी सशक्तीकरण व जागरूकता.

आदिवासी समाजातील संस्कृती जपण्यासाठी आयुश कसं कार्य करते?

आदिवासी संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो, मानवाच्या जीवनशैलीत या संस्कृतीचा मोलाचा वाटा आहे. ती निसर्ग आणि ज्ञानावर आधारित असल्यानं निसर्गाचं संतुलन राखून नैसर्गिक संपत्तीचं जतन करायचं असल्यास तिचं संवर्धन होणं आवश्यक आहे, याची जाणीव तरुण आदिवासी पिढीला करून देण्याकरता विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यापैकी काही पुढे दिले आहेत.- १) सांस्कृतिक माहितीचं डॉक्युमेंटेशन, २) पारंपरिक सण-उत्सव यांविषयीची माहिती सोशल नेटवर्कवर देणं. ३) सामाजिक एकोपा वाढविण्याकरता एकत्र येऊन सण साजरे करण्याकरता जागरूकता निर्माण करणं, ४) पारंपरिक नृत्य स्पर्धा आणि त्यांची चलतचित्रं इंटरनेटवर प्रसारित करणं, ५) आपले पारंपरिक उत्सव व संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न, ६) पारंपरिक कलेबाबत मार्गदर्शन (वारली चित्रकला), ७) आदिवासी सशक्तीकरण संस्था व विद्यापीठ उभारणीसाठी प्रयत्न.

आदिवासी समाज जीवन तसंच आदिवासी भाषा यांच्या संवर्धनासाठी कोणकोणते प्रयोग केले आहेत?

आदिवासी जमातींची ओळख म्हणजे त्यांची बोलीभाषा आहे, तिचं जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आदिवासी बोलीभाषेवर अभ्यासू संशोधन होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत. संभाषण करताना, कार्यक्रमपत्रिका, शुभेच्छा पत्रं इत्यादी बनवताना आदिवासी भाषेचा वापर करणं. असे विविध कार्यक्रम घेतले जातात. उदा. १) आदिवासी भाषेतला ऑनलाईन भाषाकोश बनवणं, २) आदिवासी शब्द संवादात वापरणं, ३) आदिवासी बोलीभाषेतील लिखाण प्रकाशित करणं

४) आदिवासी बोलीभाषेत निबंध स्पर्धा अयोजित करणं, ५) सोशल नेटवर्किंगवर आदिवासी बोलीभाषेचा उपयोग करणं. आज आयुशचे ६,५०० पेक्षा जास्त ऑनलाईन सदस्य आहेत. त्यापैकी ८० टक्कॆ वर्ग तरुण आहे.

आदिवासी शिक्षण व व्यवसायामध्ये आयुशचं कार्य?

आदिवासी भागात शिक्षणाचा अभाव नेहमीच आढळून येतो. याला गरिबीबरोबरच अन्य कारणंही जबाबदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव. आयुशनं शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य व त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण व व्यवसाय निवडण्यासाठी मार्गदर्शन शिबिरं आयोजित करायला सुरुवात केलीय. शिवाय ज्यांना शिबिरांमध्ये सहभागी होता येत नाही, अशा तरुणांसाठी फेसबुकवर माहिती प्रसारित केली जाते. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे वा प्रत्यक्ष भेटीतून मार्गदर्शन करण्यात येतं. आदिवासी तरुणांचे लेख प्रसिद्ध केले जातात. स्त्रियांना शैक्षणिक पातळीवर व इतर गोष्टीत पुढे आणण्यासाठी आयुशने २००८ साली `आदिकन्या` नावाचा खास आदिवासी मुलींचा ग्रुप स्थापन केला. आज त्याच्या ७०० पेक्षा जास्त ऑनलाईन सदस्य आहेत. आयुशतर्फे तयार करण्यात आलेला कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवडला गेला आहे.

कला व संस्कृती जपताना आयुशचा दृष्टिकोन कसा असतो?

तरुण पिढीला नेहमीच नव्याचं आकर्षण असतं, म्हणूनच ती आज जुनं विसरून आधुनिकतेकडे जाताना दिसते. परंतु यामुळं आपली संस्कृती ऱ्हास पावू नये म्हणून तरुण पिढीमध्ये आपली कला, नृत्य, सण यांची आवड निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठी जुनेच सण नव्या पद्धतीनं साजरं करणं. पारंपरिक वारली चित्रकला, नृत्यामध्ये आधुनिकतेची जोड दिल्यास ती तरुण पिढीला मॉडर्न वाटेल. त्यामुळं युवा वर्ग त्यात रस घेऊ लागेल. तारपा व अन्य आदिवासी नृत्यंसुद्धा तरुणांमध्ये गरबा व दांडियाइतकीच लोकप्रिय होतील. अशा प्रकारे परंपराही जपल्या जातील व त्यातील नावीन्यही कायम राहील.

आदिवासी पर्यटन म्हणजे काय? आणि तुम्ही हा उपक्रम कसा राबवता?

आदिवासी पर्यटन हा आयुशच्या उपक्रमातील एक मुख्य भाग आहे. यासाठी दरवर्षी विविध पर्यटन स्थळांची निवड करून तेथे सर्व सदस्यांना एकत्र करून चर्चासत्र आयोजित करतं; काही निवडक कार्यक्रम पुढीलप्रमाणं आहेत- अ) आदिवासी कला पर्यटन-१) वारली चित्रकला २) सोहंग / मुखवटे बनवणं ३) बांबूच्या वस्तू बनवणं ४) लाकडाच्या वस्तू बनवणं, ब) आदिवासी संस्कृती पर्यटन-१) आदिवासी उत्सव दर्शन २) पारंपरिक चालीरीती दर्शन ३) आदिवासी बोलीभाषा अभ्यास दौरा ४) आदिवासी जीवनशैली अभ्यास दौरा ५) पारंपरिक आदिवासी नृत्यदर्शन ६) आदिवासी वेशभूषा दर्शन, क) आदिवासी खाद्य संस्कृती पर्यटन-१) आदिवासी पारंपरिक खाद्य पदार्थ २) आदिवासी वनौषधी दर्शन ३) आदिवासी पारंपरिक पेय दर्शन (आंबील, पेज, ताडी, मोहाची दारू, इ.), ड) आदिवासी पारंपरिक शेती आणि ग्रामीण पर्यटन इ) गड आणि टेकडीची ठिकाणं (जव्हार, महालक्ष्मी, अशेरी, गंभीरगड, बारडाचा डोंगर, कणेरी इ. ) ई) तलाव आणि धरण दर्शन(धामनी, कवडास, भीमबांध, कुर्झे, साखरे, इ.) फ) स्थानक पर्यटन -१) डहाणू दर्शन २) जव्हार दर्शन ३) तलासरी दर्शन ४) पालघर दर्शन ५) विक्रमगड दर्शन.

आदिवासी युवक आयुशच्या ऑनलाईन चळवळीशी कशा प्रकारे जोडले जातात?

इंटरनेट म्हणजे जणू तरुण पिढीचीच मक्तेदारी आहे. म्हणूनच तरुण पिढीपर्यंत पोचण्यासाठी आम्ही इंटरनेटचा वापर करायचं ठरवलं. वेळेअभावी सर्व आदिवासी भागात प्रत्यक्ष जाऊन काम करण्यावर मला काही मर्यादा येतात. म्हणून आयुशमार्फत आम्ही आमच्या विविध भागांतील ऑनलाईन सदस्यांना आपापल्या भागात आयुशचं कार्य करण्याचं आवाहन व प्रोत्साहन देतो. जेणेकरून आयुशचं कार्य प्रत्येक आदिवासी भागात पोचेल. आज आयुशचे सुमारे ६५००च्या आसपास सदस्य आहेत व त्यांचा उपयोग समाजासाठी होत आहे.

आदिवासींना आरोग्याबाबत जागृत करण्यासाठी कोणकोणते कार्यक्रम राबवले आहेत?

आरोग्यविषयक जागृतीसाठी विविध उपक्रम राबववले आहेत. संपर्कात असलेल्या वैद्यकीय पदाधिकाऱ्यांच्या साह्याने जागृती कार्यक्रम घेणे इत्यादी. आदिवासी पारंपरिक औषधींवर शासकीय संशोधन करून औषध निर्मिती आणि जागृती करण्याकरता कार्यक्रम केले गेले आहेत. भविष्यात संशोधन केंद्र उभारून आदिवासी पारंपरिक औषध निर्मिती विकसित करण्याचा आयुशचा मानस आहे. आदिवासी समाजातील डॉक्टरांना जोडून आपण एक ग्रुप बनवत आहोत, लवकरच एक दिवस समाजासाठी आरोग्यसेवा देणार आहोत.

माध्यमामध्ये आदिवासींच्या समस्यांना मिळणारे स्थान याबाबत तुम्हाला काय वाटते ? माध्यमांनी कशा प्रकारे आदिवासीच्या प्रश्नांना कवरेज द्यावे ?

आजही प्रसारमाध्यमात आदिवासी समाजाबद्दल जेवढी जाणीव असायला हवी तेवढी दिसत नाही.

खरं पाहता आज आदिवासींची सर्वच स्तरांवर पिळवणूक होत असतानाही माध्यमं म्हणावं त्याप्रमाणं हा प्रश्न उचलून धरत नाहीत. आदिवासींच्या विकासासाठी आखल्या जाणाऱ्या योजनांची नीट अंमलबजावणी होतेय की नाही याकडे माध्यमांनी लक्ष द्यायला पाहिजे.

भारतात राहणारा आदिवासी समाज तुम्ही इंडियाशी कशा प्रकारे जोडत आहात?

आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना जागृत व सक्षम बनवणं गरजेचं आहे. यासाठी आयुश ऑनलाईन मोहीम राबवत आहे. सरकारच्या योजना व सवलती यांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी विविध प्रयत्न केले जातात. आमच्या संकेत स्थळावर त्यादृष्टीने वेळोवेळी माहिती दिली जाते. 

 


Comments (4)

 • Guest (शिवाजी काम्बले , लातूर)

  राहुल तुमचे आर्टिकल/ रिपोर्ट वाचनीय आहे . मीडियातुन सामाजिक विषयांची advocasy करने ही आज गरज आहे. बाकि मुंबई के मनते? माजत न?

 • Guest (Dadarao dubhalkar)

  Keep it up...very nice

 • Guest (AYUSH | adivasi yuva shakti)

  Hello sir, Thanks for your interest. Please visit out home page for more information. www.adiyuva.in & facebook page for regular updates

 • Guest (Jagdish D Khamikar)

  i read your report i likt it please continue do this

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.