स्पेशल रिपोर्ट

या चिमण्यांनो परत फिरा रे...

ब्युरो रिपोर्ट

 

हरवलेली मुलं सापडेनात

दिवाळी आली आणि गेली...मात्र देशातील अनेक कुटुंबं गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळी सोडाच, पण कुठलाही सण साजरा करू शकलेली नाहीत. पण यामागची कारणं महागाई किंवा गरिबी नाही...या कुटुंबांमधली मुलं बेपत्ता झालीत. ती अजून सापडलेली नाहीत. आपल्या चिमुकल्यांचा आणि त्यांची वाट पाहणाऱ्या पालकांचा हा स्पेशल रिपोर्ट.

पुण्यातील वडगाव धायरी भागात राहणाऱ्या किरणे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय. कारण त्यांचा एकुलता एक मुलगा अजिंक्य गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. अजिंक्यची आई मंजुश्री यांना अजूनही आशा आहे, की तो कधीतरी घरी येईल. अजिंक्य १० वीची परीक्षा फर्स्टक्लासमध्ये पास झाला आणि निकाल आणण्यासाठी शाळेत गेला, तो आजपर्यंत कधी घरी परतलाच नाही.

तीन वर्षांची पायपीट व्यर्थ 

किरणे कुटुंब गेल्या तीन वर्षांपासून अजिंक्यचा डोळ्यात तेल ओतून शोध घेत आहे. पोलीस, मंत्री यापासून ते मांत्रिकापर्यंत सर्व प्रकार झालेत, मात्र अजूनही त्याचा थांगपत्ता लागलेला नाहीये. अजिंक्यचा मोबाईल फोन घरातच आहे. त्याच्या वाटेकडं डोळे लावून बसलेल्या आईवडिलांना भाबडी आशा वाटते, की त्याचा कधीतरी फोन येईल, म्हणून ते गेल्या तीन वर्षांपासून काही वापर नसतानाही मोबाईलचं बिल भरतायत.  

अनेक मुलं बेपत्ता  

ही फक्त एकट्या किरणे कुटुंबाची कहाणी नाही तर पुण्यातील पिंपरीत राहणाऱ्या इनामदार कुटुंबाचीही हीच अवस्था आहे. त्यांचा मुलगा विशाल. १३ मार्च २०१० ला कॉलेजला जातो म्हणून घरून निघाला, मात्र आजपर्यंत घरी परतला नाही. मुलगा सापडेल या आशेनं इनामदार कुटुंब देशभर भटकलं. सरकारी यंत्रणांकडे हेलपाटे मारले. मात्र अजूनही त्यांचा विशाल त्यांना सापडलेला नाही. विशालचे बाबा विश्वास इनामदार रोज वृत्तपत्रात हरवलेल्या व्यक्तींची माहिती देणारी कात्रणं जपून ठेवतात व त्याचा पाठपुरावा करतात. मात्र त्यांच्याही पदरी निराशाच आहे. 

महाराष्ट्र आघाडीवर 

हरवलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशात सर्वात जास्त मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी मोठ्या शहरांतून मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय. एकट्या राजधानी दिल्लीत रोज किमान ११ ते १२ मुलं बेपत्ता होतायत, तर देशभरात हे प्रमाण मिनिटाला एक एवढं आहे. 

पोलीस खातं गंभीर नाही 

हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात पोलीस खातं अजिबातच गंभीर नसल्याचं पीडित कुटुंबियांचं म्हणणं आहे. जुजबी केस दाखल करून घेण्यापलीकडं पोलीस काहीच करत नाहीत. इतर गुन्हे आणि बेपत्ता प्रकरणाला असलेली संवेदनशीलता पोलीस लक्षातच घेत नाहीत. काळजाचा तुकडा हरवलाय, पण त्याची व्यथा कुणाकडं मांडायची आणि कोण आपल्याला न्याय देईल, हा प्रश्न पीडित कुटुंबांना सतावतोय.

धक्कादायक आकडेवारी 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती- 

- पुणे, पिंपरी चिंचवडमधून- गेल्या दोन वर्षात ९०० हून अधिक व्यक्ती बेपत्ता. 

- हरवणाऱ्यांमध्ये लहान मुलं आणि मुलींची संख्या सर्वाधिक.

काय म्हणतायत पालक... 

‘‘आज न उद्या हा मोबाईल सुरू होईल, तो संपर्क साधेल... आजपर्यंत बिल भरतोय... आशा आहे... मुलगा खरंच गुणी आहे. अजिंक्य लवकर घरी ये ना रे !’’ 

- मंजुश्री किरणे, अजिंक्यची आई

‘‘आम्ही २००९ पासून पोलिसांच्या संपर्कात आहोत. मात्र पोलिसांकडून कधीच अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यांना आमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नरही नाही. पोलिसांनाही मुलं आहेत... त्यांच्या घरात अशी घटना घडली तर काय करतील ?’’

- अभय किरणे, अजिंक्यचे वडील

‘‘एवढे हरवलेले जातात कुठं. या लोकांचं काय होतं, याचं उत्तर मला पाहिजे. वडील मुलाची वाट बघताहेत... दिवाळी आलीय, पण दिवाळी कशी साजरी करायची. याच भान पोलिसांना नाही. त्यांना बापाचं प्रेम कसं कळेल. मात्र मी शेवटपर्यंत लढा देईन.’’ 

- विश्वास इनामदार, विशालचे वडील 

पोलीस म्हणतायत...

याबाबत काहीच करू शकत नाही. कालच पेपरमध्ये मी वाचलं, वडील मुलाला म्हणाले टीव्ही बघू नकोस. मुलगा घरून निघून गेला त्याला आम्ही काय करू शकतो? 

गुलाबराव पोळ, पोलीस आयुक्त, पुणे

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.