स्पेशल रिपोर्ट

शेतकरी मरतोय, सरकार फक्त बघतंय

अविनाश पवार

इंदापूर-

आंदोलन... मग ते कोणतंही असो. कार्यकर्त्यांचा जोशच आंदोलनातील विचार पुढे नेत असतो. रस्त्यावर आलेलं आंदोलन धगधगत राहतं ते कार्यकर्त्यांच्या जोशामुळंच. बऱ्याच वेळा हा जोशच कार्यकर्त्यांच्या जीवावर उठतो. मागचा-पुढचा विचार न करता `जय` म्हणत भावनातिरेकापोटी केल्या जाणाऱ्या कृत्यांना विचारांची जोड दिल्यास कार्यकर्त्यांचे जाणारे हकनाक बळी टळू शकतील. नुकत्याच झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात इंदापूरमधल्या नरूटवाडीतल्या कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याचा दिवाळीच्या पूर्वसंध्येला असाच बळी गेला आणि सर्वांच्याच मनाला चटका लागून राहिला.

शेतकरी संघटनेच्या आंदोलनात कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुतीही दिलीय. पण सरकारच्या काळजाला पाझर फुटत नाहीये. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधल्या कर्मयोगी कारखान्यासमोर शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात १० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. कुंडलिक कोकाटेच्या घरची साडेचार एकर उसाची शेती आहे. ती कसत असताना ऊस उत्पादनाचा वाढता खर्च पाहता हाती काही येत नाही, हा त्याला अनुभव होताच. शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू झालं आणि त्याच्या खदखदणाऱ्या असंतोषाला वाट मिळाली. त्यानं आंदोलनात स्वतःला झोकून दिलं. शेतकऱ्याच्या न्याय्य्य हक्कासाठी मी लढणार, असा बाणा असणारा कुंडलिक मागे फिरलाच नाही. 

12 नोव्हेंबरला शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना अटक झाल्याचं कळताच हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन इंदापूर बंदची हाक दिली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी मोर्चा सोलापूर महामार्गाकडं वळवला. इथून जाणाऱ्या वाहनांना त्यांनी आपलं लक्ष्य केलं. त्यावेळी कुंडलिकनं वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवलं आणि टायरमधील हवा सोडण्याचा प्रयत्न तो करू लागला. ट्रकचालकानं त्याला असं करू नको, अशी विनंती करून त्यामुळं कदाचित टायर फुटून गंभीर इजा होण्याचा धोकाही त्याच्या लक्षात आणून दिला. पण... जोशात असलेल्या कुंडलिकला होश नव्हता. `शेतकरी संघटनेचा विजय असो...` अशा घोषणा देत तो टायरमधील हवा सोडू लागला आणि काही सेकंदांतच टायर फुटला. हवेचा प्रचंड दाब असलेल्या या टायरचं फुटणं म्हणजे छोटा स्फोटच होता. त्यात कुंडलिकला गंभीर इजा झाली. उपचारासाठी उसंतही मिळाली नाही. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. 

कुंडलिक हा घरातला कर्ता तरुण होता. त्याच्या जाण्यानं आता कोकाटे कुटुंबाचा आधारच नाहीसा झालाय. संवेदनाहीन सरकारला त्याच्या कुटुंबीयांची साधी विचारपूसही करावीशी वाटलेली नाही. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि काही प्रमुख नेत्यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला, पण आता पुढं कसं होणार, या प्रश्नाचं उत्तर अजून तरी कोकाटे कुटुंबीयांना मिळालेलं नाहीये. उचंबळून येणाऱ्या भावनांना आवर घालताना त्यांनाही त्याचं असं जोशात जाणं जीवाला चटका लावून जातं. 

...आणि आपसूकच त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात, `कुंडलिकनं होश ठेवायला पाहिजे होता.` 


Comments (1)

  • Guest (balaji bansode)

    mast

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.