स्पेशल रिपोर्ट

परभणी पोलिसांचं थकलं डिझेलचं बिल

ब्युरो रिपोर्ट

परभणी

येथील जिल्हा पोलीस विभागाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाला डिझेल पुरवणाऱ्या पंप चालकाने इंधन देणंच बंद केलंय. कारण त्याचं लाखो रुपयाचं बील थकलंय. त्यामुळे जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातील गाड्या जागेवरच उभ्या आहेत. तर पोलीस अधिकारी स्वत:च्या खिशाला कात्री लावून डिझेल टाकून रोजचा गाडा चालवत आहेत.  

थकबाकी लाखोंची

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वाहनांना शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या निखिल पेट्रोलिअम या पंपातून डिझेल पुरवठा केला जातो. परंतु पोलीस प्रशासनाची या पंपाकडे 15 ते 18 लाखांची थकबाकी  आहे. पोलिसांकडे हे देणं चुकतं करण्यासाठी पैसेच नाहीत. पेमेंट आज येईल, उद्या येईल, असं पोलीस प्रशासनान सांगत होतं. अखेर डिझेल पंप चालकानं कंटाळून पोलिसांच्या गाड्यांचा डिझेल पुरवठा बंद केलाय. त्यासाठी एक रीतसर नोटीसच पेट्रोलपंप मालकाकडून पोलीस प्रशासनाला बजावण्यात आलीय. मात्र या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक अनंत रोकडे यांनी या संदर्भात काही बोलण्यास नकार दिला.

पॅट्रोलिंग थांबलं

परभणी जिल्हा पोलीस दलात एकूण १६ पोलीस ठाणी आहेत. सर्व पोलीस प्रशासन यंत्रणा चालवण्यासाठी एकूण १२० जीप, मोठ्या व्हॅन इतर वाहनं आहेत. तर एकूण ७२ मोटारसायकल्स आहेत. हा सर्व गाडा चालविण्यासाठी महिन्याकाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला तीन लाख रुपयांचे डिझेल तर एक लाखांचे पेट्रोल लागते. म्हणजेच प्रती महिना एकूण चार ते पाच लाख रुपयांचे डिझेल आणि पेट्रोल लागते. आतापर्यंत पोलिसांनी तीन ते चार पंप चालक बदललेत. कारण प्रशासनाला थकलेले पैसेच चुकवता आलेले नाहीत. शेवटचा पंप होता, जिंतूर रस्त्यावरील निखिल पेट्रोलीयम. पण त्यांचीही तब्बल १५ ते १८ लाख रुपये  बाकी थकली. अखेर त्यांनीही इंधन देणं बंद केलं. 

कायदा, सुव्यवस्थेला धोका 

पेट्रोलपंप मालकाच्या या निर्णयामुळे बहुतांश पोलीस गाड्या पोलीस ठाण्यातच उभ्या आहेत. काही पोलीस स्वखर्चाने आपली वाहने चालवतात. पण याचा परिमाण पोलीसदलाच्या एकूण कामावर झाला आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्य़े एखाद्या घटनेसाठी कुणीही फोन केला तर त्याला 'आमच्या गाडीत इंधन नसल्याने आम्ही गाडी पाठवू शकत नाही', असे बेधडक सांगण्यात येते. यामुळे पोलिसांचं पेट्रोलिंग बंद झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.