स्पेशल रिपोर्ट

जवळे गावात आली पहिली बस

विवेक राजूरकर

औरंगाबाद – स्वातंत्र्यानंतर गावात प्रथमच एस.टी. बस धावली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी खुर्दच्या ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. 'गाव तेथे एस.टी.' हे महामंडळाचे धोरण असले तरी औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ३० खेडेगावात अजून एस.टी. बस जात नाही. येथील ग्रामस्थदेखील आपल्या गावात एस.टी. कधी येणार, याची डोळ्यात प्राण आणू्न वाट पाहताहेत.

गावात एस.टी. यावी यासाठी गेली अनेक वर्ष गावकरी पाठपुरावा करत होते. जवळी खुर्द आणि जवळच असलेल्या जवळी बुद्रुक, पळसखेडा आणि बाभुळखेडा येथील ग्रामस्थांना एस.टी. बसअभावी अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असे. वयोवृद्ध मंडळी, विद्यार्थी, महिलांना तालुक्याला जाण्यासाठी दररोज पाच किलोमीटरची पायपीट करुन जवळी फाट्यापर्यंत यावं लागे. अनेक मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. अनेकांना बसअभावी कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं. त्यामुळं एसटी महामंडळाने बस सुरू करुन  दिवाळीची जणू गोड भेटच दिली, असचं गावक-यांना वाटू लागलयं. आता गावात एस.टी.ची सोय झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली, आबालवृद्धांना तालुक्याला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

एस.टी. बस प्रथमच घेऊन आलेल्या चालक आणि वाहकांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. फटाके फोडून मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. गावात एस.टी. आली याचं श्रेय गावातील तरूणांना द्यायला हवे. महामंडळानं गावात रस्ता चांगला नसल्याचं कारण पुढं केलं होतं. मात्र, तरूणांनी एकत्र येऊन चार ते पाच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यात येणारी दुतर्फा  झाडांची तोड केली. श्रमदानातून रस्त्यात मुरूम आणि खडक टाकून रस्ता एस.टी.साठी योग्य केला. यापुढंही श्रमदानातून एसटीसाठी रस्ता आणखी चांगला करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केलाय. बसच्या फेऱ्या अशाच कायम राहाव्यात, यासाठी अनेकांनी देवाला साकडसुद्धा घातलंय. एस.टी. महामंडळ काही दिवसांनी उत्पन्न न मिळाल्याचं कारण पुढं करुन बस बंद करण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ३० खेडेगावात एसटी धावत नाही. राज्यातील अनेक गावखेड्यांची अशीच स्थिती आहे. या तमाम खेडुतांचा भारत 'इंडिया'शी केव्हा जोडला जाणार, याचीच सर्वजण वाट पाहतायत.

 


Comments (3)

  • छान स्टोरी आहे.

  • Guest (Sandeep padhye)

    ST has always driven the rural economy and it has been the key instrumental factor in linking rural and urban India. Will Maharashtra follow the successful model of AP and Karnataka.

  • Guest (mushtaq Khan)

    very nice story... S.t. Gava gavat geli pahije... Saglyanni prayatna kele pahijet...

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.