स्पेशल रिपोर्ट

आडगावकरांनी घालून दिला आदर्श

विवेक राजूरकर

औरंगाबाद - वर्षभर शेतात राबराब राबणं, काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी गावोगाव भटकणं हे त्याचं जीवनच झालं होतं. पण दोन वर्षांपूर्वीच आडगाव भोसले या गावात त्याला सालगड्याचं काम मिळालं आणि त्याच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी मिटला. तो एका पत्र्याच्या २० बाय ३० च्या घरात बायको आणि चार मुलांसोबत आनंदात जीवन कंठत होता... आणि अचानक त्याची आडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. जीवनाला मिळालेल्या या कलाटणीनं त्याचा जगण्याचा दृष्टिकोनच बदललाय.

अशोक समिंद्रे याची ही कथा... सध्या दिल्ली ते गल्लीत पैशांचं राजकारण केल्याशिवाय निवडणुकीत यश मिळवता येत नाही. मात्र, आडगाव येथील ग्रामस्थांनी अशा खालच्या पातळीवरील राजकारणाला फाटा दिला. त्यामुळंच आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना अशोक समिंद्रे जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी  विराजमान झाले. त्याचबरोबर या समितीच्या उपाध्यक्षपदी आरोग्यसेविकेचं काम करणाऱ्या सुरेखा शेलार यांची निवड केली. या निवडणुकीमुळं खऱ्या लोकशाहीचा परिपाठ कसा असावा याचा आदर्शच घालून दिला. 

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील शाळांवर पालकांचं विशेष लक्ष असावं या हेतूनं; तसंच शिक्षक आणि पालकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळं शाळेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक चांगल्याप्रकारे विकास होईल, या दृष्टीनं शासनानं पालकांचा शालेय व्यवस्थापनात समावेश करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची तरतूद केली. ती शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार सर्व विनाअनुदानित शाळांमध्ये उदयास आली. पाहता पाहता या समितीला स्थानिक स्वराज्य संस्थेचं स्वरूप प्राप्त झालं. या समितीच्या निवडीसाठी मतदान होऊ लागलं आणि निवडून येण्यासाठी पालकांमध्येच चक्क हाणामाऱ्याही होऊ लागल्यात. 

आडगावकरांचा आदर्श

या पार्श्वभूमीवर आडगावातील ग्रामस्थांनी समिंद्रे यांची केलेली निवड आदर्शवत आहे.  जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीत चौदा जणांची निवड ही चिठ्या टाकूनच केली. या सर्व प्रकियेत ग्रामस्थांनीसुद्धा कोणत्याही बुरसटलेल्या राजकारणाला थारा न देता सहभाग घेतला. निवड झालेल्या समिंद्रे यांच्यासाठी हे एक आव्हानच होतं. तरीही या आव्हानास सामोरं जात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून आपल्या परिसरातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, मुलांच्या शाळेतील अडीअडचणी सोडविणं, त्यांना शिक्षणासाठी उपलब्ध संधी मिळवून देण्याची जबाबदारी योग्य प्रकारे हाताळण्यास सुरुवात केली. 

अध्यक्ष घालतोय झाडांना पाणी

या नवनिर्वाचित अध्यक्षानं सुरुवातीचं पाऊल म्हणून एक पण केला... निवड झाल्यापासून हा सालगडी अध्यक्ष या शाळेच्या आवारातील झाडांना स्वतः डोक्यावरून हंडे नेऊन पाणी घालत आहे. `झाडे जगवा, झाडे वाचवा` असं म्हणत... मुलांना पर्यावरणाचे धडे देण्याची सुरुवातच या सालगड्यानं आपल्या कृतीनं केली आहे. 

विवेक राजूरकर, औरंगाबाद


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.