स्पेशल रिपोर्ट

तुटपुंजा पगार आणि आजारांचा विळखा

विवेक राजूरकर

औरंगाबाद – प्रवाशांच्या सोयीसाठी असं बिरुद मिरवणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांकडे अजून कुणाचंच लक्ष गेलेलं नाही. आजच्या महागाईच्या तुलनेत त्यांना मिळणारा पगार आणि भत्ता अत्यंत तुटपुंजा आहे. यामुळे कातावलेला वाहक-चालक आता आरोग्याच्या समस्यांच्या फेऱ्यात सापडलाय.

 

एस.टी.च्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार हा ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. वाहक आणि चालकांना मिळणारं वेतन आणि सेवा म्हणजे 'आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया' असंच म्हणावं लागेल. त्यांना मिळणाऱ्या सेवा पाहा... अनेक ठिकाणच्या एस.टी. स्थानकांमध्ये विश्रांतीगृहाची अवस्था अतिशय वाईट आहे. कित्येक तासांचा प्रवास करून थकल्यानंतर त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते संडास-बाथरूमचीही व्यवस्था नसते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची तर जास्तच कुचंबणा होते.

अनेकदा वाहक-चालकांची अवस्था ही 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी होते. अनेक गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती ठीक नसते. अशा गाड्या ज्यावेळी चालकांच्या माथी मारल्या जातात आणि त्या गाडीत काही बिघाड झाल्यास त्याचा भुर्दंड मात्र कर्मचाऱ्यांनाच भोगावा लागतो. तांत्रिक कारण पुढे करून बस नेण्यास नकार दिल्यास त्याचा परिणाम त्या कर्मचाऱ्याला लवकरच भोगावा लागतो. गाडीला स्पीडलॉक असल्यामुळं अनेकदा प्रवांशाचं बोलणं वाहकालाच ऐकावं लागतं. बऱ्याचदा ओव्हरटेक करताना अनेकदा अडचणी निर्माण होतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते, हा खरं तर हास्यास्पद विषयच म्हणावा लागेल. त्यांचे भत्ते पाहा...

रात्र वाहतूक भत्ता - 8 रु.

रात्रपाळी भत्ता-7 रु. ते 9.50 रु.

धुलाई भत्ता दरमहा 10 रु.

खोळंबा आणि अधिक काळ मुक्कामासाठी रात्रवस्ती भत्ता- 8रु. ते 10.50 रु. तेही स्थानकाप्रमाणे वेगवेगळे.

पार्सल आणि टपाल भत्ता- 3 रु.

गणवेशाच्या शिलाईसाठी दर जोडास. 20 रु.

कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची अवस्था तर यापेक्षाही अतिशय वाईट आहे.

रात्रपाळीच्या सेवा, तसंच तासनतास एकाच ठिकाणी बसावं लागणं, तसंच सोयीनं नैसर्गिक विधीसाठी गाडी थांबवता येत नसल्यानं आरोग्याचे प्रश्नही भेङसावतात. आज जवळपास 90 टक्के एसटी चालक-वाहकांना मूळव्याध आणि मूतखड्यासारख्या व्याधींनी ग्रासलंय. यात कहर म्हणजे त्यांना मिळणारा मेडिकल भत्ता दरमहा फक्त 35 रुपये एवढाच आहे.

आता तुम्हीच सांगा त्यांनी कसं जगायचं ते...!

- विवेक राजूरकर, औरंगाबाद


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.