स्पेशल रिपोर्ट

विलासरावांच्या निधनानंतरची परिस्थिती

ब्युरो रिपोर्ट

लातूर – विलासराव देशमुख आणि लातूरचं नातं भावनिक तसंच अर्थकारणाशी जोडलेलं होतं.  विलासराव मंत्रिपदावर आहेत म्हटल्यावर लातूरचा भाव एकदम वधारत असे; तसेच पायउतार झाल्यास भावही खाडकन उतरत असे.  आता तर विलासरावच नाहीत. त्यांच्या जाण्यानं लातूरकरांच्या मनाला घरं पडलीत आणि जमिनीचे भाव चाळीस टक्क्यांनी घसरलेत.

त्यांच्या करिष्म्यामुळं येथील जमिनीचे भाव पुण्या-मुंबईच्या तोडीचे होते.  त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीतून बाहेर पडत असताना या आर्थिक संकटातून कसं बाहेर पडायचं, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय.  

लातूर हे महाराष्ट्रात अल्पावधीतच नावारूपाला आलेलं शहर. त्याचं सर्व श्रेय विलासरावांनाच जातं. त्यांच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच लातूरकरांना कशासाठीही आंदोलन करावं लागलं नाही.  मागण्यांच्या आगोदरच सर्व काही मिळालेलं असे. लातूरने शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण केला. यामुळे शिक्षण घेण्यासाठी लातूरकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला. त्यामुळे रोजगारातही वाढ झाली. वाढणारा आर्थिक स्तर लक्षात घेऊन बिल्डरांनीही मोठ्या प्रमाणात बांधकामं हाती घेतली आणि बघता बघता जमिनीचे भाव पुणे-मुंबईच्या बरोबरीने वाढत राहिले. विलासरावांमुळे लातूरच्या प्रगतीचा वेग वाढता राहणार याची खात्री असल्यानं सर्व क्षेत्रांत गुंतवणूक झाली. वन बीएचके फ्लॅट 25 लाख रुपयांवर गेला होता, तर सहारालगत असलेल्या मोकळ्या जमिनी १० हजार रुपये प्रती स्केवर फूट दराने विकल्या जात असत. मुळात शहराभोवतीच्या १८ गावांमधील जमिनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विलासरावांनी अधिग्रहित केल्या होत्या, यामुळे या सर्व जमिनी सामान्यांना खरेदी करणं सामान्य माणसाला शक्य नव्हतं.

विलासरावांच्या अकाली निधनामुळे लातूरचा विकास थांबला. आता नवीन प्रकल्प, योजना येणार नाहीत, असा लोकांचा समज झाल्याने त्याचा फटका अर्थकारणाला बसू लागला आहे. त्याचीच परिणती जमिनीच्या किमती कमी होण्यात झाली. आज वन बीएचके फ्लॅट साधारण १५ ते १६ लाखात मिळतो. त्यामुळं जमिनीचे भावही बसले आहेत.


Comments (1)

  • एखद्या मंदिरातील देव निघून गेल्या नंतेर जी अवस्था त्या देवलाची होते ,सध्या अशी अवस्था लातूर ची झाली आहे..... :(

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.