स्पेशल रिपोर्ट

एलबीटीमुळं आवक मंदावली, अडत्यांचं आंदोलन

प्रवीण मनोहर

अमरावती - विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतमालावरील एलबीटी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यास सुरवात केलीय. त्यामुळं शेतकरी शेतमाल बाहेर काढेनासे झाले आहेत. 

त्याचा विपरीत परिणाम सोयाबीनच्या आवकवर झालायं. त्यातच एलबीटी ही अडतदारांकडून वसूल केली जाणार असल्याच्या चर्चेनं अडत्यांनी शेतमाल एलबीटीतून वगळण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचं शस्त्र उगारलय.

जकात कर प्रणाली असतांना प्रत्येक क्विंटल मागे म्हणजेच एका पोत्याला दोन रुपये एवढा जकात द्यावा लागत होता. मात्र, एलबीटी कर प्रणाली ही मूल्यावर आधारीत असल्यानं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटलमागे दोन टक्के कर द्यावा लागणार आहे. जर सोयाबीनचा भाव 3000 रुपये असेल तर शेतकऱ्याचे 60रुपये एलबीटीसाठी जातील. जे यापूर्वी एका क्विंटलमागे फक्त 2रुपये जायचे. या एलबीटीसोबतच शेतकऱ्याला अडतदारास 1.75 टक्के द्यावे लागतात. असे एकून एका क्विंटलमागे 3.75टक्के शेतमालाच्या विक्रीवर जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, अमरावती व्यतिरिक्त बाजार समितीत कृषी उत्पादनावर एलबीटी लागत नाही.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे वैशिष्ठ असे, की शेतकऱ्याला त्याच दिवशी पैसे मिळतात. दुसऱ्या बाजार समीतीत पैसे मिळण्यास आठ ते दहा दिवस लागतात. मात्र, एलबीटीमुळं शेतकरी थबकला आहे. 

यावर्षी सोयाबीनचा बाजार 1नोव्हेंबरला सुरु झाला 1ते10नोव्हेंबर दरम्यान 1लक्ष72हजार745 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. दिवाळीनिमित्त बाजार 15 नोव्हेंबरपर्यंत बंद होता. त्यानंतर बाजार सुरु होण्याआधी एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या हालचाली सुरु झाल्यानं व्यापाऱ्यांनी एलबीटी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यास सुरवात केलीय. त्यामुळं शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव इतर बाजार समत्यांपेक्षा 60 रुपयांनी कमी मिळत आहे. परिणामी शेतकरी दुसरीकडं शेतमाल नेऊ लागल्यानं बाजारसमितीची आवक घटलीय. 15 ते 24 नोव्हेंबरपर्यंत 81हजार337 क्विंटलच आवक झालीय, जी सुरवातीच्या आवकपेक्षा निम्मी आहे.

ही परिस्थिती पाहू्न अडतदार चांगलेच हबकलेत. कापूस अडतदारांनी तर सोमवारपासून बंदची हाक दिली असून त्याला सोयाबीन अडतदारांनी पाठिंबा दिलाय.

व्यापाऱ्याचा बंद, बाजार समीतीत शुकशुकाट

पालिकेनं कृषी उत्पादनावर लावलेल्या एलबीटी विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय. या बंदला सोयाबीन व्यापाऱ्यांनी समर्थन दिल्यानं सोमवारी सोयाबीन मार्केट कडकडीत बंद होतं. या बंदमुळं शेतकरी आपला माल तालुक्याच्या बाजार समितीत नेत आहेत. मात्र, चुकाऱ्यासाठी  शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस थांबाव लागत आहे. व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरुच राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  

अमरावती सोयाबीन मार्केटची वैशिष्ट्ये-

नागपूरनंतर विदर्भातील दुसरं मोठ सोयाबीन मार्केट

राज्यातल्या पहिल्या दहा मार्केटमध्ये नाव

शेतकऱ्यांचे चुकारे त्याच दिवशी मिळतात

गेल्या हंगामातील एकूण सोयाबीन आवक- 17 लाख 12 हजार 789 क्विंटल

गेल्या दोन महिन्यातील आवक- 6 लाख 49 हजार 82 क्विंटल

एलबीटी कर लागू झालेलं राज्यातील एकमेव मार्केट

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.