स्पेशल रिपोर्ट

दादाजी खोब्रागडेंच्या नशिबी मजुरीच

ब्युरो रिपोर्ट

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणाऱ्या ७२ वर्षाच्या दादाजी खोब्रागडे यांची ओळख वेगळीच आहे. दादाजींना संपूर्ण राज्यात एचएमटी या प्रसिध्द तांदळाचे जनक म्हणून ओळखलं जातं. 1982 मध्ये त्यांनी एचएमटी तांदळाचं वाण विकसित केलं. मात्र 30 वर्षांनंतरही या संशोधनानं दादाजींच्या आयुष्यात काहीच फरक पडला नाहीये. एचएमटीचा तांदूळ जगभरात जरी मोठ्या चवीनं खाल्ला जात असला तरी हे वाण विकसित करणारे दादाजी खोब्रागडे आजही उपेक्षिताचं जीणं जगत आहेत. हे अल्पभूधारक शेतकरी आजही दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. सरकारकडून त्यांच्या वाटेला आलीय ती केवळ उपेक्षाच...

संशोधनासाठी जमीन नाही

संशोधन सुरू राहावं म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतर्फे खोब्रागडेंना 10 एकर जमीन देण्याची घोषणा केली खरी, मात्र प्रत्यक्षात केवळ पाच एकर शेतीच त्यांना दिली गेली. त्यातही दोन एकर जमीन नापीक निघाली. त्यामुळे या प्रयोगशील शेतकऱ्यापुढं मुलीच्या दीड एकर शेतीत संधोधन करण्याशिवाय पर्याय उरला नाही. राज्य सरकार आणि देशानं बेदखल करूनही जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकानं दखल घेतलेले कृषी संशोधक आणि `एचएमटी` या लोकप्रिय भाताच्या वाणाचे निर्माते दादाजी खोब्रागडे यांचं वय झालं तरी जिद्द तरुण आहे.

फोर्ब्स ने घेतली दखल

घरी अठराविश्वं दारिद्र्य असलेल्या दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकानं अवघ्या दीड एकर जमिनीत तांदळाची तब्बल नऊ वाणं विकसित केली आहेत. त्यांच्या या संशोधनाकडं राज्य सरकारनं पाठ फिरवली, मात्र जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकानं या कृषी संशोधकाची दखल घेतली. त्यानंतर देशाला चंद्रपूर जिल्ह्यातील खेड्यात राहणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांची दखल घ्यावी लागली. गेल्या वर्षी फोर्ब्सनं जगभरातील ग्रामीण उद्योजकांची एक यादी प्रसिद्ध केलीत्या दादाजी खोब्रागडे यांचा समावेश करण्यात आला.

एचएमटी तांदूळ

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणारे ७२ वर्षांचे दादाजी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. प्रथम १९८2मध्ये त्यांनी तांदळाचं एक नवीन वाण विकसित केलं. `हे वाण वापरून बघा, भरपूर पीक येईल,` सं त्यांनी गावातील अनेक शेतकऱ्यांना सांगितलं; पण कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. अपवाद फक्त त्याच गावातील भीमराव शिंदे या शेतकऱ्याचात्यांनी मात्र दादाजींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. शिंदे यांनी हे वाण चार एकरात पेरलं. गंमत म्हणजे पहिल्याच वर्षी शिंदेंना ९० क्विंटल तांदळाचं उत्पन्न मिळालं आणि दादाजींच्या एचएमटी तांदळाच्या वाणाची कीर्ती सर्वदूर पसरली.

एचएमटी घड्याळावरून नाव

त्यावेळी एचएमटीची घड्याळं खूप प्रसिद्ध होती. या घड्याळांच्या नावावरून दादाजींनी आपल्या वाणालाही`एचएमटी` सं नाव दिलं. पुढे या तांदळाची महती नांदेडपासून दहा किमी अंतरावर असलेल्या तळोधी बाळापूरच्या बाजारात पसरली. तिथल्या व्यापाऱ्यांनी दादाजींना यासाठी प्रोत्साहन दिलं. पुढं संपूर्ण विदर्भात या वाणाचा प्रसार झाला.

दादाजी खोब्रागडेंची फसवणूक

पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी हे वाण तपासण्यासाठी घेतलंविद्यापीठातील संशोधकांना दादाजी खोब्रागडेंच्या या संशोधनातील महत्त्व जाणवलं. त्यांनी तर मोठीच हुशारी केली. संशोधनाचं श्रेय दादाजींना देण्याऐवजी विद्यापीठानंच या वाणाचं पेटंट घेतलं. त्याचं नावही `पीकेव्ही एचएमटी` असं बदलून हे वाण बाजारात विक्रीसाठी आणलं. आपल्याला फसवून आपल्या संशोधनाचा उपयोग स्वार्थी हेतूनं झाल्याचं पाहून दादाजींनी त्याचा जाब विचारायचं ठरवलं. तेव्हापासून त्यांचाया विद्यापीठाशी संघर्ष चालू आहे.

केवळ दीड एकरमध्ये नऊ वाणं

दादाजींनी पुढे विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चिन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी, व डीआरके सुगंधी अशी तब्बल नऊ वाणं विकसित केलीतीही केवळ दीड एकर शेतजमिनीतया सर्व वाणांना केवळ विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उचलून धरलं. या महत्त्वाच्या संशोधनाकडं देशातल्या कोणत्याही कृषी विद्यापीठानं गांभीर्यानं पाहिलं नाही. परंतु फोर्ब्स मासिकानं मात्र याची दखल घेतल्यावर सगळ्यांना या संशोधनाचं महत्त्व जाणवू लागलंय.

अजूनही सरकार दरबारी उपेक्षा

दादाजी यांच्या या संशोधनाची दखल घेतली गुजरात सरकारनं. दादाजींना संशोधनाबद्दल चार पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारनं त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव केला, सुवर्णपदकही दिलं. मात्र तेही बनावट निघालं, अखेर अब्रूच्या भीतीनं राज्य सरकारनं पदक परत घेतलं. मधल्या काळात मुलाच्या आजारपणात त्यांना त्यांची चार एकर शेती विकावी लागली होती. त्यामुळे ते आता मुलीच्या दीड एकर शेतीत वाण विकसित करण्याचे प्रयोग करीत असतात. रोज मजुरी करून चार पैसे कमवायचे आणि हंगामाच्या काळात संशोधन करायचंअसा त्यांचा दिनक्रम चालू असतोअशा या संशोधक शेतकऱ्याच्या संशोधनाची दखल घेऊन सरकारनं त्यांना न्याय द्यावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे. पण सरकारी पातळीवरचा हलगर्जीपणा आणि लालफितीत अडकलेली सरकारी यंत्रणा याची दखल घेईल का?

 


Comments (1)

  • Guest (खुपच चांगली बातमी आहे ही.)

    वाचक

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.