स्पेशल रिपोर्ट

महर्षी कर्वेंचं मुरूडमधील घर भग्नावस्थेत

मुश्ताक खान

मुश्ताक खान, मुरूड -

स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर झटलेले भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मूळ गावी मुरूडमध्ये असलेलं त्यांचं घर आजही भग्नावस्थेत आहे. येथे स्मारक उभारण्यासाठी सरकारनं निधी मंजूर केलाय खरा, पण गावातच दोन समित्या स्थापन झाल्यानं निधी द्यायचा कोणाकडं हा पेच काही गेली सात वर्षं सुटत नाही आणि स्मारक काही होत नाहीये. 

सध्या महर्षींच्या या घराचा वापर जळाऊ लाकडं ठेवण्यासाठी केला जातोय.

महर्षी कर्वेंनी 1914 मध्ये हे घर जोशींना विकलं. सध्या या घराचा ताबा प्रकाश जोशी यांच्याकडे आहे. या घराचंच रूपांतर त्यांच्या स्मारकात करावं, अशी अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. पण गावातच स्मारक उभारण्याबाबत वाद उभा राहिला आहे. स्मारक उभारण्यासाठी दोन समित्या स्थापन झाल्या आहेत. या समित्यांमधील वाद सोडवण्यासाठी सरकार पुढाकार घेत नाही. आमचीच स्मारक समिती अधिकृत आहे, अशी प्रतिक्रिया मुरूडचे बाळ बेलोसेंनी दिली आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी सरकारने पैसे मंजूर केले त्याच दिवशी दुसरी समिती स्थापन झाली, असा आरोपही त्यांनी केला आहे. तर गावच्या सरपंच प्रेरणा भोसले यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावत ग्रामस्थांनी स्थापन केलेली समितीच अधिकृत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. बाळ बेलोसेंमुळेच पालगड इथून साने गुरुजीचं स्मारक माणगावमध्ये हलवण्यात आलं, असा आरोपही सरपंचांनी केला आहे. जोपर्यंत इथल्या लोकांमध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत हा विषय अधांतरीच राहील अशीच सध्याची स्थिती आहे.

वझे कुटुंबीयांकडून प्रयत्न

महर्षी कर्वेच्या मूळ घरात स्मारक उभारण्याचा विषय लटकला असतानाच दुसरीकडं वझे कुटुंबीयांनी मात्र महर्षी कर्वेंच्या आठवणी जपण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्वत:च्या घरात महर्षींचं स्मारक उभारलंय. यात कर्वेंचा कोट, त्यांची भांडी, टेबलखुर्ची आणि काही दुर्मिळ फोटो त्यांनी मिळवलेत. त्याचबरोबर प्रसिद्ध शिल्पकार साठे यांनी साकारलेला पुतळाही आपल्याला इथं बघायला मिळतो. 

इथल्या फोटोबद्दलच्या आठवणीही सागरिका वझे अगदी रमून आपल्याला सांगतात... तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महर्षी कर्वेंना भारतरत्न देऊन गौरवलं. त्यावेळी कर्वे १०० वर्षांचे होते. यावेळी राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडून पायऱ्यांपर्यंत येऊन त्यांना सन्मानित केलं. ही त्यावेळची ठळक बातमी बनली होती. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि महर्षी कर्वे यांच्या भेटीचा फोटो सगळ्यांना आकर्षित करतो. अल्बर्ट आईन्स्टाईनही महर्षी कर्वेंचं कार्य आणि जोश पाहून भारावून गेले होते, आदी आठवणी त्या भारावून सांगतात. त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येकाला महर्षींच्या कार्याची थोडी का होईना, आठवण येते.


Comments (3)

  • shashi u r right...this should be done...

  • Guest (दिपक भागवत)

    खरोखरच अप्रतिम विषय आणि योग्य बातमी !

  • Guest (शशि kore)

    दोन्ही समित्यानी दोन स्मारके बांधावीत, कुणाचे स्मारक चांगले होते बघुया.जमत नसेल तर जो पहिले बांधेल त्याला मतदान करणार असं जमतेने जाहीर करावे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.