स्पेशल रिपोर्ट

इंदापूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा

अविनाश पवार

इंदापूर - फिकट हिरवा रंग, छोट्या सफरचंदाएवढा आकार आणि चवीलाही काहीसं सफरचंदाप्रमाणं असलेल्या या जम्बो 'अॅपल' बोराची रविवारी पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पहिल्यांदाच आवक झाली. इंदापूर इथून विक्रीस आलेली ही बोरं ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. यातील एका अॅपल बोराचं वजन सुमारे दीडशे ग्रॅम एवढं आहे.  

इंदापूरमधील गलांडवाडी नं.१ येथील शेतकरी सोमनाथ फलफले यांनी पश्चिम बंगालमधून ही कलमं आणली.  महत्त्वाचं म्हणजे या बोरांचं मूळ स्थान थायलंडमध्ये आहे.  फलफले यांनी पावणेदोन एकरात सातशे झाडांची बारा बाय आठ अशी बोरांची शेती फुलविली.  ही झाडं पाच ते सहा फूट उंचीची असून अवघ्या आठव्या महिन्यांतच फळांनी लगडली आहेत. त्यातील साडेतीन क्विंटल बोरं त्यांनी विक्रीस आणली होती. 

बोरांची वाढ झाल्यानंतर त्यांची चव काहीशी सफरचंदासारखीच लागते. या झाडांना वर्षातून दोन वेळा फळधारणा होते. त्यासाठी वेळोवेळी झाडाची छाटणी करणं गरजेचं असतं. या झाडांचं आयुष्य वीस वर्षं आहे. यंदा पहिलंच वर्ष असल्यानं सुमारे पंधरा टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.  शिवाय पुढील एक ते दोन महिने हे उत्पादन सुरू राहील, असं फलफले यांनी सांगितलं.

यंदा बोराच्या लागवडीचं पहिलंच वर्ष आहे. त्यामुळं पावणेदोन एकरात केलेल्या लागवडीसाठी खतं, औषध फवारणी, सिंचन आणि मजुरी यावर सुमारे एक लाख रुपये खर्च आला. परंतु बागेत ज्वाला जातीच्या मिरचीचं आंतरपीक घेतल्यामुळं चारच महिन्यांत त्यापासून दीड लाख रुपये उत्पन्न मिळाल्यानं बागेचा खर्च वसूल झाला असून पन्नास हजार रुपये शिल्लक राहिले आहेत.  या बोरांच्या लागवडीचा एकूण खर्च दीड लाख रुपये झाला असून खर्चवजा करता एकरी दीड लाख रुपये मिळतील, असा अंदाज फलफले यांनी व्यक्त केलाय.


Comments (3)

  • सफरचंद नको बोरे खा...

  • Guest (शशि kore)

    बेस्ट.पाण्याची पद्धधत कशी देतात.

  • Guest (राजन Gupte)

    छान इन्फोर्मतिवे विडियो आहे.ही बोर लगेच विकत घ्याविशी वाटली..

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.