स्पेशल रिपोर्ट

हिरड्याला मिळावा आधार

अविनाश पवार

आदिवासींना हवाय योग्य भाव

अविनाश पवार

भीमाशंकर - हिरडा! एक आयुर्वेदिक औषध म्हणून आपल्याला माहीत असतो. हा हिरडा येतो सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम जंगलातल्या झाडांना. हा हिरडा गोळा करतात, आदिवासी. तोच त्यांच्या जगण्याचा आधार. हा आधार बळकट करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले खरे. पण हे प्रयत्न तोकडेच पडतायत. कारण या हिरड्याला योग्य असा भावच मिळत नाहीये. तसंच हिरड्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही उभे राहिलेले नाहीत.

 बाजारात मागणी

रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील भीमाशंकरच्या जंगलात ही हिरड्याची झाडं विपुल आहेत. औषधी गुणधर्मामुळं त्याला बाजारात चांगली मागणी आहे. हिरड्याच्या माध्यमातून आदिवासींना शाश्वत उत्पन्न मिळावं म्हणून राज्य सरकारनं या हिरडा खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी अदिवासी विकास महामंडळाची स्थापना केली. याद्वारे हिरड्याची खरेदी होऊ लागली. पण आमच्या हिरड्याला वाढीव आणि हमी भाव द्या, अशी मागणी आदिवासी बांधव गेली कित्येक वर्षं करतायत. पण सरकारनं याकडं कधीही गांभीर्यानं पाहिलेलं नाही. कातडी कमावण्यासारख्या तसंच इतर रासायनिक उद्योगांमध्येही हिरड्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळं हा हिरडा आदिवासींना स्वयंपूर्ण बनवू शकतो. त्यासाठी आदिवासी भागातच जर हिरडा प्रक्रिया उद्योग निर्माण झाले, तर निश्चितच आदिवासी विकासासाठी त्याचा मोठा उपयोग होईल. 

सध्या हा हिरडा गोळा करण्याचं काम सुरू आहे. आज सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असणारी जंगलसंपत्ती दिवसेंदिवस नष्ट होताना दिसतेय. यातच हिरड्याच्या वृक्षाचाही समावेश आहे. एकीकडं `झाडं लावा, झाडं जगवा` असा संदेश सरकार देतंय, तर दुसरीकडं हेच सरकार या हजारो वर्षांपूर्वीच्या अनमोल झाडांची कत्तल रोखण्यात मात्र अपयशी ठरत आहे. पण या वनराजीच्या छायेत वाढलेला अदिवासी शेतकरी मात्र या जंगलाचं आजही जतन करण्याचा प्रयत्न करत आहे.

मुळात या शेतकऱ्याचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. त्याचं मुख्य पीक आहे धान. ते आहे, पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून. पण पाऊस नसला की, करण्यासारखं काहीच उरत नाही. मग या आदिवासींना आधार मिळतो जंगल संपत्तीचा. जंगलातून मिळणारा मध, वेगवेगळी फळफळावळ आणि वृक्षवेलींपासून मिळणाऱ्या वनौषधींच्या विक्रीतून त्यांच्या हाती पोटापुरते पैसे येतात. 

पोखरी गावातले चंदर कोळप हे आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या हिरडा गोळा करून विकतात. त्यांच्या वाट्याला अवघी एक एकर शेती आहे. त्यात होणाऱ्या धान पिकानंतर त्यांना आधार तो या हिरड्याचाच. त्यांची या डोंगरात एकूण ५० झाडं आहेत. मार्च महिन्यात या हिरड्याच्या झाडाला बहर येतो. दोन महिन्यांनंतर हे हिरड्याचं फळ परिपक्व होतं. त्यानंतर या हिरड्याची झोडणी सुरू होते. त्यांच्या कुटुंबातले तीन सदस्य सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात. तरीही त्यांना हा हिरडा गोळा करण्याकरिता १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. झाडावर उंच चढून जीव धोक्यात घालून हे झोडणीचं कठीण काम करावं लागतं.

हा हिरडा गोळा करून तो वाळण्याकरिता पसरवून ठेवला जातो. झाडावरून निघालेला हिरडा अधिक असला तरीही वाळल्यानंतर तो निम्म्यानं कमी होतो. यातला बाळ हिरडा औषधी आहे आणि भादवा हिरडा रंगकामासाठी वापरला जातो. सध्या बाळ हिरड्याला ४५ रुपये, तर भादव्या हिरड्याला १२ रुपये असा भाव मिळतोय.

या व्यवसायास सरकारी पातळीवरून योग्य चालना मिळाल्यास आदिवासी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पण हे सर्वस्वी अवलंबून आहे ते सरकारच्या आदिवासी विकास धोरणावर...


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.