स्पेशल रिपोर्ट

आडत्यांचा बंद, बाजार समित्यांतील कामकाज विस्कळीत

ब्युरो रिपोर्ट

 मुंबई - सहा टक्के `आडत` आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आडत्यांनी बंद पुकारल्यानं राज्यभरातील बाजार समित्यांमधील कामकाज विस्कळीत झालंय. यामुळं शेतमालाचं मोठं नुकसान होत असून 'माळव्याचं करायचं काय', असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आ वासून उभा राहिलाय. फळांचाही उठाव होत नसल्यानं फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय.  

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालावर आकारण्यात येणारी आडत ही सहा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असा आदेश राज्य पणन संचालकांनी काढलाय. वास्तविक पाहता, हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. मात्र, आडत्यांनी तीव्र विरोध दर्शवत बंदचं हत्यार उपसलंय. सध्या फळं व भाजीपाल्यावर आठ टक्के `आडत` आकारण्यात येत असून शेतमालाच्या प्रकारानुसार आडत वेगवेगळ्या प्रकारे आकारली जाते. सध्याच्या शेतमालाच्या प्रचलित आडतीमध्ये दोन टक्के वाढ करावी, अशीही आडते असोसिएशनची मागणी आहे. यामुळं आडतीचा प्रश्न अधिकच चिघळला आहे.

राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तोडगा न निघता बाजार सुरू झाले आहेत, तर काही ठिकाणी तोडगा निघून व्यवहार सुरू झाले आहेत. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक पातळीवर आडत व्यापारी, बाजार समिती प्रशासनाशी चर्चा होऊन कालपासून व्यवहार सुरू झाले आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत्यांनी कालपासून व्यवहार बंद ठेवलेत. मात्र, नाशिकमध्ये बाजार समिती प्रशासनानं कारवाईचा इशारा देऊनही आडत्यांनी व्यवहार बंदच ठेवले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही आडत्याचा बंद सुरूच आहे. चाकण, पंढरपूर, सोलापूर बाजार समितीचे व्यवहारही बंद आहेत. सांगली, कोल्हापूर, तासगाव मार्केटमध्ये व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

आडत्यांच्या संपामुळं शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी मार्केट बंद आहे तिथं शेतमाल लिलावासाठी घेऊन जाणं टाळलं आहे. यामुळं शेतकरी, आडतं व्यापारी, प्रशासनाचं नुकसान होत आहे.

दरम्यान, `बंद'चा आढावा घेण्यासाठी पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलविलेल्या बैठकीत शेतकरी-व्यापाऱ्यांचा समावेश असलेल्या अभ्यास गटाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यास गटाच्या शिफारशीसंदर्भात गुरुवारी (ता. 6) पणन संचालकांकडे पुन्हा बैठक होणार असल्याचं समजतं. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.