स्पेशल रिपोर्ट

...आणि दरेवाडी विजेच्या दिव्यांनी उजळली

अविनाश पवार
अविनाश पवार, दरेवाडी, पुणे -  स्वातंत्र्यानंतर तब्बल 65 वर्षांनी दरेवाडी विजेच्या दिव्यांनी उजळली. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटाजवळील अतिदुर्गम भागात दरेवाडी वसलीय.चाळीस उंबऱ्याच्या या वाडीत रस्ते नाहीत. वीज नसल्यानं रॉकेलचे दिवे, पाण्यासाठी पायपीट, या गोष्टी येथे नित्याच्याच. नव्या पिढीनं वीज आणायचीच हा निर्धार केला. जर्मनीच्या बॉश्च (Bosch) कंपनीनं त्यांना सहकार्याचा हात दिला आणि वाडी सौर विजेच्या दिव्यांनी उजळली.

सौरऊर्जेची किमया

पुण्यापासून ११० किलोमीटरवर असणारं दरेवाडी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य गाव. मात्र हे निसर्गाचं लेणंच जणू त्यांच्यासाठी शाप ठरलेलं. या गावात पोहोचायला रस्ताच नसल्यामुळं या वाहन पोहोचू शकत नाही. किमान वीज तरी आपल्या गावात असावी, ही इथल्या नवीन पिढीची इच्छा. बायका-मुलांना रात्री-अपरात्री वावरताना त्रास होणार नाही, विशेषतः मुलांना अभ्यास करता येईल, या इच्छेनं त्यांनी एमएसईबीकडे पाठपुरावा केला. जवळच्या ५ किलोमीटरवर असणाऱ्या गावात वीज होती. त्यामुळं आपल्या गावात वीज येईल असं त्यांना वाटत होतं. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.

बॉश्च (Bosch) नावाची जर्मन कंपनी अशाच एका भारतीय खेड्याच्या शोधात होती. ती कंपनी या खेड्याला मूलभूत सुविधा देऊ इच्छित होती. पुण्यातल्या काही एनजीओंकडून त्यांना या खेड्याची माहिती मिळाली. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देली. गावकऱ्यांना आवश्यक गोष्टींची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास गावातील विजेचा प्रश्न आला, आणि या कंपनीनं गावाला वीज देण्याचा निर्णय घेतला. ही वीज गावाला मिळाली तीदेखील सौरऊर्जेपासून. गावात सौर पॅनेल बसवलं गेलं. या पॅनेलवर पूर्ण क्षमतेची ही वीज तयार केली जाते. याकरिता सहा बॅटरींचा संच वापरला गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं साहित्य या दऱ्याखोऱ्यात आणणं हेसुद्धा एक आव्हान होतं. मात्र इथल्या गावकऱ्यांनी आपल्या कष्टानं अंगाखांद्यावर आणि बैलांच्या सहाय्यानं हे साहित्य इथपर्यंत पोहोचवलं. हे संपूर्ण सोलार युनिट उभारण्यासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च आला. शिवाय या जर्मन कंपनीनं कामाचा मोबदला म्हणून गावकऱ्यांना एक लाख रुपये दिले. कंपनीनं हे युनिट सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी गावावरच सोपविली आहे. त्यासाठी वनदेवी ग्रामोद्योग मंडळ स्थापन करण्यात आलंय. विजेचा खर्च या मंडळाच्या माध्यमातूनच गोळा केला जातो.

गावात वीज आल्यामुळं गावातले अबालवृद्ध आनंदून गेले आहेत. आज विजेमुळं बायकांना रात्रीचा स्वयंपाक करणं सोपं झालंय, तर विद्यार्थ्यांसाठी आता रॉकेलच्या दिव्याखाली डोळे फोडून अभ्यास करावा न लागता स्वच्छः उजेडात अभ्यास करण्याची सोय झालीय. शिवाय गावात विविध मनोरंजनाची साधनं आलीत... टीव्ही आल्यामुळं जगातील वित्तंबातमीचं ज्ञान गावकऱ्यांना घरबसल्या मिळू लागलंय. बाहेरील जगाशी या खेड्याची नाळ जोडली गेलीय. सौरऊर्जेमुळं आज हे दुर्गम खेडं स्वयंपूर्ण झालंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.