स्पेशल रिपोर्ट

पाचशे वर्षांपूर्वीचं कोकण

मुश्ताक खान

मुश्ताक खान, गणपतीपुळे- 

जगभरात महापुरूषांची म्युझियम आहेत पण सर्वसामान्य माणसाचं म्युझियम कुठंच पाहायला मिळत नाही. असं सामान्य माणसाचं म्युझियम पाहायला मिळतंय, कोकणात. कोकणातल्या गणपतीपुळे इथं. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना खऱ्या कोकणची ओळख व्हावी यासाठी, इथं पाचशे वर्षांपूर्वीचं कोकण अर्थात 'प्राचीन कोकण' साकारण्यात आलंय.

ज्या कारागिरांच्या जोरावर म्हणजे बारा बलुतेदारांच्या जोरावर भारतानं सुवर्णयुग अनुभवलं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 'प्राचीन कोकण'ची निर्मिती केल्याचं या म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांनी सांगितलं. पूर्वी कोकणात कुंभार, सोनार, चर्मकार, कासार, लोहार, सुतार, तेली, शेतकरी, खोत यांची घरं पाहायला मिळायची. तीच घरं जशीच्या तशी या 'प्राचीन कोकण'मध्ये पाहायला मिळतात.

घरातली मांडणीही त्या काळानुसारच आहे. प्रत्येकाचा व्यवसाय काय आणि ते कोणत्या वस्तू बनवत असत, या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. धनगर, मासे विक्रेते, दरवेश बाबा, कडकलक्ष्मी, माडीवाला आदीही इथं हुबेहुब साकारण्यात आलेत. यातून पूर्वी कोकणातील घरं कशी होती, बारा बलुतेदारी पद्धती कशी होती, याबद्दल आताच्या नव्या पिढीला चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध झाली आहे. पर्यटकांना कोकणाबद्दल सविस्तर माहिती पुरवण्यासाठी इथल्याच स्थानिक मुलींना प्रशिक्षण देण्यात आलंय.  

प्राचीन कोकण ज्या ठिकाणी उभारण्यात आलंय, तिथं निसर्गाची कुठलीही हानी करण्यात आलेली नाही. भौगोलिक परिस्थितीचा विचार करुनच म्युझियमच्या जागेची निवड करण्यात आली आहे, असं सरदेसाई सांगतात. कोकणात डोंगराच्या तळभागाला 'मळा' म्हणतात. इथली जमीन सुपीक असल्यानं याच ठिकाणी गावप्रमुखांची घरं असायची. त्यानंतर जो पहिली चढण येते त्याला 'डाग' म्हणतात. इथं बारा बलुतेदारांची आणि शेतकऱ्यांची घरं असत. त्यानंतर अगदी वरच्या भागात धनगर आणि वनवासी लोकं राहत असत. 'प्राचीन कोकण'साठी अशाच प्रकारची जागा निवडण्यात आल्याची महितीही वैभव सरदेसाईंनी दिली.

ही जागा घेण्यात आली तेव्हा इथं जंगल होतं. त्या जंगलाला कोणत्याची प्रकारची हानी न पोहचवता प्राचीन कोकणची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही ठिकाणी वाटा वेड्यावाकड्या आणि चिंचोळ्या दिसतात. याचा पर्यटकांना थोडा त्रासही होतो. पण प्राचीन कोकणची भूमिका सांगितल्यानंतर त्यांच्याकडून दादच मिळते, असंही सरदेसाई सांगतात.  

पूर्वी कोकणात देवाच्या नाववर जंगल राखलं जायचं. तिथली झाडं किंवा प्राण्यांना कोणताही त्रास दिला जात नसे. त्याला देवराई म्हटलं जातं. याबद्दलही इथं माहिती दिली जाते. आपल्याकडं २७ जन्म नक्षत्रं आहेत. प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आहे. ही २७ झाडं औषधी आहेत. ही झाडं लावली तर आरोग्य, ज्ञान आणि संपत्ती मिळते असं म्हटलं जातं. त्यावेळी जे माहिती असलेले आजार होते त्यावर या झाडांपासून तयार करण्यात आलेल्या औषधांपासून उपचार केले जात असत. म्हणजे त्या काळची ती प्राथमिक आरोग्य केंद्रं होती. त्यांची सविस्तर माहिती इथं मिळते. 

प्राचीन कोकणची आणखी एक खासियत म्हणजे कोकणातली खाद्य संस्कृती. तीही इथं जपण्यात आलीय. कोकणातले पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, भाजणीची थालीपीठं आणि १२ प्रकारची सरबतं. हे सर्व पदार्थ इथं मिळतात. त्यातील फणस, जांभूळ, करवंद, आंबा आणि रातांब्याच्या सरबताला विशेष मागणी असते. हस्तकला वस्तूही इथं विकत घेता येतात. इथं एकदा आलात तर ५०० वर्षांपूर्वींचं कोकण पाहिल्याचं समाधान मिळतं हे नक्की. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.