स्पेशल रिपोर्ट

अकोल्यात बाबासाहेबांच्या अस्थिंचं जतन

प्रवीण मनोहर
अमरावती- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासानं, त्यांच्या विचारांनी किती तरी दुर्लक्षित, उपेक्षित आयुष्यांचं सोनं झालं. त्यांचं अवघं जीवन उजळून निघालं. अशा अनेक भाग्यवंतांपैकी एक आहेत, अमरावतीतल्या नया अकोला गावातले पंजाबराव खोब्रागडे. पंजाबरावांना बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला नाही. पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण यात्रेचा साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं.

 बाबासाहेबांच्या अस्थी त्यांनी आपल्या सोबत आणल्या आणि आयुष्यभर बाबासाहेब त्यांच्यासोबत त्यांच्या गावात राहायला आले. तेव्हा पंजाबराव म्हणजे 20 वर्षांचा तरुण होता. 6 डिसेंबर 1956 रोजी संध्याकाळी शहरात फिरत असताना त्यांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी समजली. त्यासाठी कसंही करून त्यांनी दादरला जायचं ठरवंल. पण जवळ पैसे नव्हते. अखेर कसेबसे पैसे गोळा करून पंजाबराव आणि त्यांचा मित्र सखारामनं बडनेऱ्याहून मुंबईला जाणारी रात्री नऊची ट्रेन पकडली.  

बडनेरा स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. जो तो बाबासाहेबांचं शेवटचं दर्शन घ्यायला निघाला होता. बडनेरा स्टेशन ते दादरपर्यंत साऱ्या प्रवासात वातावरण शोकाकूल होतं. सकाळी अकराला गाडी दादरला आली तेव्हा माणसांनी मुंबई भरून वाहत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत बाबांच्या लेकरांचा ओघ सुरू झाला होता. बाबासाहेबांचं पार्थीव ठेवलं होतं, दादरच्या हिंदू कॉलनीतल्या राजगृहात.

आक्रंदणारा जनसागर

पंजाबराव राजगृहावर पोहचले तेव्हा प्रत्येक माणूस बाबासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आतूर झाला होता. हरवलेल्या आईच्या वासरांनी हंबरडा फोडावा तसा जनसागर आक्रंदत होता. बाबासाहेबांचं पार्थीव राजगृहातून बाहेर आणलं, सजवलेल्या रथावर ठेवलं. अंतिम दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली. त्या गर्दीत पंजाबरावही होते. त्यांना बाबासाहेबांच्या पावलांना थेट स्पर्श नाही करता आला. पण त्यांनी त्या सजवलेल्या रथाचं हात लावून दर्शन घेतलं. आजही ही  आठवण सांगताना पंजाबरावांना गहीवरुन येतं. त्या सजवलेल्या रथावर पुत्र यशवंत, माईताई, भिक्षुकगण आणि मान्यवर उभे होते. 

आणि अंत्ययात्रेच्या त्या जनसागरात देशभरातून आलेल्या मान्यवरांसोबत कमरेवर तान्हुली घेतलेल्या माऊल्या होत्या. वयोवृद्ध होते, तरुण होते. गरीब होते, श्रीमंत होते. गर्दीचा अंत लागत नव्हता. बाबासाहेबांच्या पार्थीवावर ठिकठिकाणी इमारतींवरून फुलांचा वर्षाव होत होता. संध्याकाळी समुद्राच्या किनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर बाबांचा देह ठेवण्यात आला. य़शवंतराव आंबेडकरांनी अग्नी दिला. त्यानंतर हेलावून टाकणारं भाषण झालं ते आचार्य अत्र्याचं. ते हृदयाला पाझर फोडणारं भाषण पंजाबरावांना अजूनही आठवतं.

पवित्र रक्षा 

अंतिम संस्कारानंतर लोक घरी निघायला वाट शोधू लागले. मिळेल ते वाहन पकडू लागले. पंजाबरावांना बाबासाहेबांना सोडून जाववत नव्हतं. रात्री वरळीच्या कोळीवाड्यातल्या बांधवांनी अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्या गर्दीत पंजाबरावांनीही पोटात दोन घास ढकलले. मन मात्र बाबासाहेंबांच्या आठवणींनी व्याकूळ झालं. लहानग्या पंजाबनं बाबासाहेबांना दीक्षा समारंभात बाबासाहेबांना डोळे भरुन पाहिलं होतं.

घरी परतताना पुन्हा एकदा बाबासाहेंबांच्या चितेचं दर्शन घ्यावं म्हणून पंजाबराव समुद्रावर गेले. बाबासाहेबांची चिता शांत झालेली होती. पंजाबराव त्या विझत असलेल्या चितेजवळ गेले. राख थंड होत होती. पंजाबरावांनी त्यातली मूठभर राख भक्तिभावानं उचलली अन् खिशात ठेवली.

9 डिसेंबरला पंजाबराव गावात पोहचले आणि गावकऱ्यांना घटनाक्रम सांगितलं. 

बाबासाहेबांच्या स्मृती

संपूर्ण बौद्धवस्ती त्या दिवशी शोकात बुडाली होती. पंजाबरावांनी आणलेल्या अस्थी गावकऱ्यांनी बौद्ध संस्कारात ठेवल्या. या ठिकाणी आज बौध्द विहार उभारण्यात आलंय. नया अकोला हे भारतातलं पहिलंच गाव असावं, जिथं बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आल्यात. बाबासाहेबांच्या अस्थींमुळं गावाचा उध्दार झाल्याची भावना पंजाबरावांची आहे. 1982 साली परिसरात मोठं वादळ आलं, पण गाव बचावलं, एवढं हे ठिकाण पवित्र बाबासाहेबांच्या असल्याची भावना पंजाबराव व्यक्त करतात. बाबासाहेबांची शिकवण पंजबरावांनी आयुष्यभर आचरणात आणली. आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिलं. आज त्यांचा एक मुलगा डॉक्टर तर एक नौदलात अधिकारी आहे. 


Comments (1)

  • Guest (Rani Ramteke)

    पंजाबरावाचं आयुष्याचं खरचं सोन झालं, महापुरुषांच्या राखेनं त्यांच आयुष्य घडलं, अतीशय भावस्पर्शी व उत्तम लेख आहे. बाबासाहेबाच्या आठवणी जाग्या करणारा..

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.