स्पेशल रिपोर्ट

शेतमालाला हवी, प्रक्रिया उद्योगाची जोड

अविनाश पवार

पुणे - शेतमाल उत्पादित करण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगही उभारल्यास तो कसा फायदेशीर ठरतो, हे पुणे जिल्ह्यातल्या बोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी दाखवून दिलंय. आवळ्याची शेती आणि त्यावर उभारलेल्या प्रक्रिया उद्योगातून ते आता वर्षाला दहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळवतायत. 

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावातल्या विठ्ठल शिंदे यांनी १९९९ मध्ये आपल्या काळ्याभोर शेतीत आवळ्याच्या २६० झाडांची लागवड केली. यातून मिळणारे आवळे बाजारात विकण्याऐवजी त्यांनी  प्रक्रिया उद्योग उभारला. सुरुवातीला त्यांनी  घरच्या घरी आवळ्याचं लोणचं बनवून ते प्रायोगिक तत्त्वावर विकल. याला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला. यासाठी त्यांनी आपल्या मुलालाही यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या मुलानं राहुरी कृषी विद्यापीठातून अन्न प्रक्रिया हा विषय घेऊन पदवी प्राप्त केली. हा आवळ्यावरचा प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी बँक ऑफ बडोदाकडून २००० मध्ये १० लाख रुपये कर्ज घेतलं. हे कर्ज त्यांनी केवळ साडेचार वर्षात फेडलं.

ते शेतीत सेंद्रीय खतांचा वापर करतात त्यासाठी शिंदे यांनी गावठी गाईंचं संगोपन केलं आहे. या गाईंच्या साठवलेल्या मलमूत्रापासून तयार झालेली जीवाणूनाशकं ते वापरतात. कीड आणि इतर रोगांसाठी अधूनमधून काही फवारण्या केल्या जातात. शिवाय खोडाच्या रक्षणासाठी बुंध्याला रंग दिला जातो. झाडांसाठी अन्नद्रव्य बनवण्यासाठी बागेत पडणाऱ्या पालापाचोळ्याचा ते वापर करतात. पुढं झाडाला फळं धरल्यावर फांद्या भारानं वाकतात. त्यासाठी फांद्या पट्ट्याने बांधाव्या लागतात. आवळ्याची काढणी करताना ही फळं डागाळली जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. 

कमी खर्च 

महत्त्वाचं म्हणजे आवळ्याच्या लागवडीसाठी कमी पाणी लागतं. वीज आणि मजुरीचा खर्चही कमी येतो. आज पाणीटंचाईमुळं उसासारखी पिकं जळत असताना आवळ्याला मात्र बहर आलेला दिसतो. यासाठी शिंदेंनी आवळ्याच्या चार प्रकारच्या जातींची लागवड केलीय.  यातील एन.एस.७ या जातीची १३० झाडं आहेत. चकाया, फ्रान्सिस, एन.ए.१० या जातींची १३० झाड आहेत. या विविध जातींची लागवड करण्यामागेही शिंदेंचं बाजाराचं गणित आहे. जर एकाच जातीची झाडं लावली आणि त्यांची फळं एकाच वेळी बाजारात आली तर यातून तोटा होऊ शकतो, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जातींपासून टप्प्याटप्प्यानं उत्पादन घेतल. एन.एस.७ या जातीचं फळ रसाळ असतं, तर चकाया या जातीचं फळ चकाकी असणार आहे. यापासून आवळा क्यांडी बनविली जाते. तिला खूप मागणी आहे.  

सात टन उत्पादन

एका हंगामात या बागेतून विठ्ठल शिंदे यांना आवळ्याची फळांची सरासरी सात टनाची आवक आहे. बाजारपेठेत आवळ्याला सरासरी १३ रुपये भावाप्रमाणं फार तर ९१ हजार रुपये मिळाले असते. परंतु त्याच्यावर प्रक्रिया केल्यामुळं यापासून निर्माण होणाऱ्या पाच प्रकारच्या उत्पादनांपासून त्यांना महिन्याला किमान दोन लाख रुपये मिळताहेत. या व्यवसायातून त्यांनी केवळ आपला फायदा न बघता महिला बचत गटाला देखील रोजगार दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मागासवर्गीय महिलांना आपल्या शेतात रोजगार देऊन त्यांच्या महिला बचत गटाला आधार दिला आहे.

त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर स्टॉल टाकला असून तिथं 'स्वानंद' या नावानं उत्पादनांची विक्री सुरू केलीय. प्रवाशांकडून त्याला प्रतिसाद मिळतोय. भविष्यात उत्पादन वाढवून राज्यभर विक्री केंद्रं काढण्याचा त्यांचा मनोदय आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.