स्पेशल रिपोर्ट

पांडुरंगाची `खिलार` पंढरी

यशवंत यादव

यशवंत यादव,

पंढरपूर - युगे अठ्ठावीस विटेवर उभ्या असणाऱ्या पांडुरंगामुळं पंढरीचा महिमा सर्वदूर आहेच. त्याला आता कार्तिकी वारीला भरणाऱ्या गुरांच्या बाजाराचीही जोड मिळालीय. राज्यभर कुठंही जा, खिलार जोडी दिसली की शेतकरी आपसूक विचारतात... पंढरपुरास्न आणली का? `पंढरपुरी म्हशी' हा तर आता ब्रॅण्डच झालाय. कोट्यावधींची उलाढाल होणाऱ्या या गुरांच्या बाजारानं पंढरीचा तळ सध्या गजबजून गेलाय.

 खिलार बाजार

देशभरातील शेतकऱ्यांनी बाजारात `खिलार` गुरं आणलीत. सध्या बाजार समितीची जागाही अपुरी पडत आहे. बाजार समितीच्या नियोजनावर सर्वच जण खूश आहेत. गैरसोय होत असल्याची कोणाचीच तक्रार नाही. `खिलार` ही गाईची देशी व स्थानिक जात आहे. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात `खिलार` गाई मोठ्या प्रमाणात आहेत. तिथूनच विक्रीसाठी खिलार गुरं मोठ्या प्रमाणात येतात, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान चौगुले यांनी दिली.

खोंडांना चांगली मागणी

खोंड व बैल हे या बाजाराचं खास आकर्षण आहेत. यंदा खोंडं मोठ्या संख्येनं पाहायला मिळतायत. अस्सल जातिवंत `खिलार` बैल शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कर्नाटकातील शेतकरी `खिलार` खोंड खरेदीला प्राधान्य देत आहेत. कोशा खोंडांनाही मागणी आहे.

म्हशींचा बाजार

म्हशींच्या बाजाराला 400 वर्षांची परंपरा आहे. `पंढरपुरी` म्हशी व रेडे मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. एक-एक म्हैस दहा हजारांपासून ते 1 लाखापर्यंत विकली जातेय. या आकारानं मध्यम व अतिशय काटक आहेत. यांचा चेहरा लांब व निमुळता असतो. खांद्यापर्यंत पोहोचणारी लांब व पिळवटलेली तलवारीसारखी शिंगं हे या म्हशीचं खास वैशिष्ट्य. साधारण या म्हशीचं वजन 400 किलोपर्यंत असतं. तिचं दूधही घट्ट, चवदार असतं. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या परिसरात या म्हशी मोठ्या प्रमाणात आढळतात.

दुधाला बेस्ट...

या म्हशींची प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता उत्तम आहे. दूध देण्यामध्ये सातत्य असतं. एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध हमखास मिळत असल्यानं पंढरपुरी म्हैस म्हणजे दुधाला बेस्ट, अशी शेतकऱ्यांची खात्री आहे. यामुळंच `पंढरपुरी म्हैस संशोधन केंद्र` होण्याची मागणी होत आहे.

बाजारावर सावट दुष्काळाचं

बाजारावर दुष्काळाचं सावट स्पष्टपणं दिसतंय. चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी `खिलार` गुरांना या बाजाराचा रस्ता दाखवलाय. चारा छावण्या बंद झाल्यामुळं आम्ही दुसरं काय करू शकतो, अशी प्रतिक्रिया तिसंगी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील भारत गोरख जाधव यांनी दिली. 


Comments (1)

  • Guest (शशि satara)

    गावा कडील भाषेत माहीती दिल्या बददल धन्यवाद.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.