स्पेशल रिपोर्ट

शेळीपालनातील 'सानेन' पॅटर्न

अविनाश पवार

अविनाश पवार,

पुणे - दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना पशुपालन शक्य होतंच असं नाही. याकरता शेळीपालन हा उत्तम पर्याय मानला जातो. विशेषतः शेतमजूर एखाद् दोन का होईना शेळ्या सांभाळून त्यावर आपला चरितार्थ चालवत असल्याचं चित्र सगळीकडंच पाहायला मिळतं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याकरता 'सानेन' जातीची शेळी वरदान ठरली आहे. तिचा प्रसार केलाय पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावातल्या रेन या संस्थेनं.

इंग्लंडमधील सानेन जात भारतात 

पुणे - नाशिक महामार्गावरील नारायणगावमध्ये (जि. जुन्नर) रुरल अॅग्रीकल्चर इन्स्टिट्यूट आहे. एम. बी. भिडे, के. एल. मेहेर, एस. आर. सबनीस, सी. एम. केतकर आणि बी. आर. वझे यांनी १९७३ मध्ये हिची स्थापना केली. या अशासकीय संस्थेनं दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्यास सुरुवात केली. राज्यात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. कमीत कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात होणारं शेळीपालन हे आजही अनेक शेतकरी कुटुंबांचा आधार बनलंय. गावठी शेळ्या अगदी कमी प्रमाणात दूध देत असल्यानं रेन संस्थेनं इंग्लंडमधल्या सानेन जातीच्या शेळ्या १९७५ साली आणल्या आणि दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांना दिल्या. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला.

रोममधील जागतिक अन्न आणि शेती संस्थेच्या अहवालानुसार जगातील ४९ टक्के लोक शेळीचं दूध पितात. शेळीचं दूध औषधी आहे. शिवाय ८० टक्के भारतीय शेतकऱ्यांचं उपन्न कमी असल्यानं त्यांच्या आहारातच दूध नसतं. अशा शेतकऱ्यांनी जर शेळीपालन केलं तर त्यांच्या मुलांना दूध मिळू शकतं. शेळीपासून पैदास होणाऱ्या बोकडविक्रीच्या हेतूनं शेळीपालन हे फायदेशीर ठरताना दिसतं. त्यातच सानेन या जातीची शेळी जर घेतली, तर गावठी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या अधिक दूध देतात. २६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे, अशी माहिती डॉ. वासुदेव सिधये यांनी दिली.

शेळीची चारा-पाण्याची गरज ही गाईच्या तुलनेत एक पंचमांश एवढी आहे. त्यामुळं जर तुमच्याकडं गाईंचा गोठा असेल, तर या गाईंच्या उरलेल्या चाऱ्यावरही शेळीपालन सहज शक्य आहे. त्यासाठी वेगळा पगारी माणूस ठेवण्याची गरज नाही. शिवाय अधिक जागा लागत नाही. शेळी प्रकृतीनं काटक असल्यानं कोणत्याही हवामानात राहू शकते. रोगराईचं प्रमाण कमी आहे. शिवाय शेळी ही खुराकाचं जास्तीत जास्त दुधात रूपांतर करते. शेळीचा गाभण काळ फक्त पाच महिन्यांचा असतो. त्यामुळं पाच ते सहा वेते सहज मिळू शकतात. शेळीपासून एका वेतात कधी दोन, तर कधी तीन पिलंही (करडू) मिळतात. तीन वेतात पाच करडे मिळू शकतात. इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचं या जातीचं प्रमाणही अधिक आहे. या जातीच्या बोकडाच्या मांसाची मागणीही अधिक आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणाचा या संस्थेला मागील काही वर्षांत फटका बसला आहे. याकरता शासनानं अशा प्रकारच्या संस्थेला हात देण्याचीही गरज आहे, असंही डॉ. सिधये म्हणाले. 

गेल्या काही वर्षांपासून या रेन संस्थेत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात येत आहे. दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा, याकरता नाबार्डनं मदतीचा हात दिला आहे. नुकतंच इथं आठ दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पार पडला. यात ३५ शेतकऱ्यांनी शेळीपालन आणि सानेन जातीच्या शेळीच्या व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतलं. त्यात युवकांचा सहभाग उल्लेखनीय होता, असं व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. एस. जी. विद्वांस यांनी सांगितलं.


Comments (3)

  • सर, कृपया आपला फोन नंबर द्या.

  • mala ya sheli palana badhal mahiti havi ahe

  • Guest (यशवंत)

    छान. म्हणूनच शेळीला गरीबांची गाय म्हणतात.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.