स्पेशल रिपोर्ट

एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था

विवेक राजूरकर

औरंगाबाद – राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीय.

'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' असं ब्रिद घेऊन काम करणाऱ्या एस.टी. महामंडळाला कर्मचाऱ्यांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न अजून सोडवता आलेला नाही. मुळात महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या तुलनेत उपलब्ध निवासस्थानांची संख्या खूपच कमी आहे. शिवाय काही अपवाद वगळता विभागीय कार्यालयांच्या शहरांमध्येच निवासस्थानं आहेत. त्यांचीही सध्या दुरवस्था झालीय. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या चालक-वाहकांसाठी असलेल्या मार्गस्थ निवासस्थानांचीही दुरवस्था झालीय.

औरंगाबाद येथील एसटीत काम करणाऱ्या कनिष्ठ वर्ग वसाहतीत सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे. इमारती मोडकळीस आल्यात. पाण्याची सोय नाही. तुटलेले दरवाजे आणि खिडक्या, असं दृष्य वसाहतीत पाहायला मिळतं. अनेक घरांना तर खिडक्याच नाहीत. पावसाळ्यात छतांमधून संततधार सुरू असते. बाथरूम आणि शौचालयाची स्थिती तर अतिशय वाईट आहे. एवढंच कशाला वीजपुरवठाही सुरतक्षितपणे होत नाही. अनेकांना त्यामुळं शॉक बसलाय. तरीही एसटीचे रहिवासी कर्मचारी कित्येक वर्षांपासून जीव मुठीत धरून इथं राहात आहेत.

अत्यल्प पगारामुळं कर्मचाऱ्यांना स्वखर्चानं डागडुजी करता येत नाही. महामंडळानंही तशी काही योजना आखलेली नाही. त्यामुळं नाईलाजानं आहे त्या परिस्थितीत कर्मचारी राहत आहेत.   

यासंदर्भात विभागीय व्यवस्थापक श्री. सुपेकर यांनी पूर्ण एसटी स्थानक आणि इमारतीचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं. मात्र, याला किती काळ लागेल, हे त्यांनाही सांगता आलं नाही.

राज्यातील विभागीय ठिकाणी असलेल्या निवासस्थानांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.