स्पेशल रिपोर्ट

एसटीची तब्येत सांभाळणारा कर्मचारी वेठबिगारीच

विवेक राजूरकर

औरंगाबाद - 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असं ब्रिदवाक्य मिरवणा-या एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांकडं मात्र साफ दुर्लक्ष झालयं. रस्त्यावर धावणाऱ्या बस गाड्यांची तब्येत व्यवस्थित ठेवण्याचं काम करणारे वर्कशॉपमधील कर्मचारीही त्याला अपवाद नाहीत. तुटपुंजा पगारात भरपूर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची अवस्था एकप्रकारे वेठबिगाऱ्यांसारखीच आहे.

राज्यात एसटी महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. याशिवाय 247 आगारांमधूनही गाड्यांच्या दुरुस्तीचं काम चालतं. येथील कर्मचाऱ्यांचा असंतोष सध्या धुमसतोय. हे औरंगाबादचं वर्कशॉपचं पाहा. येथे एकूण ७७३ कर्मचारी असले तरी उपलब्ध मनुष्यबळ संख्या ४३१ आहे. इथं दरवर्षी ६३० ते ७५० बस बांधण्याचं उद्दीष्ट असून ते पूर्णदेखील केलं जातं. अपु-या मनुष्यबळाचा ताण येथील कामगारांवर निश्चितच पडतो. अतिश्रम करूनही त्यांच्या पगारात तिळमात्र वाढ होत नाही. २०-२२ वर्ष नोकरी करणाऱ्यांचा पगारही २२ हजारांच्याच घरात आहे. त्यामुळं सहाव्या वेतन आयोगाला प्रमाण मानून वेतनवाढीचा करार करावा, अशी मागणी कर्मचारी करतायंत.

राज्य सरकारचा परिवहन व्यवस्थापन विभाग आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेत दर चार वर्षांनी वेतनवाढीचा करार होत असतो. मात्र, मागच्या कराराची मुदत संपून ८ महिने झाले तरी नवीन करार झालेला नाही. त्यामुळं आता सर्व कामगारांचे डोळे त्याकडं लागलेत. याशिवाय कपडे, हॅन्डग्लोज, संरक्षणविषयक साहित्य वेळेवर मिळावे, अशीही त्यांची मागणी आहे.

विशेष म्हणजे, या वर्कशॉपमध्ये तब्बल १४ कामगार संघटना आहेत. मात्र, एकही आपल्या उपयोगाची नसल्याचं कामगारांना वाटतयं. त्यामुळं आपल्याला कोणी वालीच नसल्याची त्यांची भावना आहे. तो एकटेपणा उराशी घेऊनच ते एसटीची तब्येत ठिकठाक ठेवण्यासाठी धडपडत असतात.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.