स्पेशल रिपोर्ट

शेतकऱ्यांना डावलून वैनगंगा वाहतेय अदानीकडं...

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात उभारण्यात येत असणारा बहुचर्चित अदानी विद्युत प्रकल्प पाण्यावरून पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. वैनगंगेवरील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी या प्रकल्पाकडं वळवण्यात आल्यानं हा प्रश्न आता चांगलाच पेटलाय.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती परिसरात वाहणाऱ्या वैनगंगेच्या काठावर धापेवाडा उपासा सिंचन टप्पा एक कार्यन्वित झाला आहे. खरं तर या उपसा सिंचन केंद्रामार्फत जिल्ह्याच्या सहा तलावांमध्ये पाणी सोडलं जाणार होतं.  पण, आता ते अदानी विद्युत प्रकल्पाकडं वळवण्यात आलंय. 

वैनगंगा अदानीकडं...

२००४-०५ मध्ये धापेवाडा उपसा योजनेच्या उद्घाटनादरम्यान तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रकल्प फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात येत असल्याचं जाहीरपणं सांगितलं होत.  मात्र २००८-०९ मध्ये अदानी पॉवर प्लाण्टचं काम सुरू झालं आणि त्याला २०११ मध्ये पाणीही देण्यास सुरुवात झाली.  धापेवाडा उपसिंचन टप्पा एकमध्ये १७ गावांना खरीपासाठी पाणी देण्यात येणार होतं. महत्त्वाचं म्हणजे, या गावांतील साधारणतः पाच हजार हेक्टर जमिनीला पाणी देणं, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ठ आहे.

पण पहिल्या टप्प्यात फक्त १००० ते १५०० हेक्टरला पाणी देण्यात येत आहे. भारनियमनामुळं पूर्ण पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात येतं. मात्र, अदानीसारख्या प्रकल्पाला ९० द.ल.घ.मी. पाणी देताना भारनियमनाचा प्रश्न निर्माण होत नाही का? नक्की हा प्रकल्प शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी करण्यात आलाय, का अदानीसारख्या उद्योगपतींचं? हे राजकीय नेते शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, की अदानीचे, असे प्रश्न सामान्य शेतकरी करीत आहेत.

प्रकल्प 1780 कोटींवर

या योजनेकरता शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 1999  अन्वये रुपये 762.38 कोटी (1997- 98)  मंजूर  झाले होते, पण या पाच वर्षांत आर्थिक तरतूद न झाल्यानं नूतन शासकीय तरतुदीनुसार 917.03 कोटी ( २००४- २००५) मंजूर झाले होते.  आज (२०११- २०१२) हा प्रकल्प 1780 कोटींवर पोहोचला आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण करण्याची योजना आहे. आजतागायत राज्याच्या मोठमोठ्या मंत्र्यांनी याला भेट दिलीय. तसंच धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचं काम माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निकटच्या सोमा एंटरप्राईज लि. या कंपनीला देण्यात आलंय.

अदानी पॉवर प्लाण्टला पाणी देण्यासाठी 19ऑक्टोबर 2011 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अणि जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार डिसेंबर 2012 पर्यंत बॅरलमध्ये पाच मीटर उंचीचा पाणीसाठा 14 व्हर्टिकल गेट व स्टॉपलॉगच्या तीन संचांद्वारे निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  पहिल्या टप्प्याचं काम 2013 पर्यंत कागदोपत्री पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, ही सगळी सर्कस फक्त अदानी पॉवर औष्णिक केंद्राकरता करण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांना वाटतय. त्यामुळंच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होणार का, याबाबत येथील शेतकरी साशंक आहे.

ज्याप्रमाणं गोसीखुर्द प्रकल्प आणि बावनथडी प्रकल्प रखडलेत तशीच स्थिती या प्रकल्पाची होईल, अशी भीती आमदार राजकुमार बडोले यांनीही बोलून दाखवली.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.