स्पेशल रिपोर्ट

तीन हजारांहून अधिक गावं तहानलेली

विवेक राजूरकर

औरंगाबादपुरेसा पाऊस न झाल्यानं मराठवाड्यासाठी वरदायीनी असलेल्या जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यातचं नगर, नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडीत यापुढं पाणी सोडणं शक्य नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सद्यस्थितीत मराठवाड्यातील तीन हजारांहून अधिक गावांत तीव्र पाणीटंचाई आहे.

तहानलेल्या या जनतेला टँकरचाच आधार आहे. पण ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उपलब्ध पाणीसाठा संपल्यानंतर टँकरमध्ये ओतायला पाणी कुठून आणायचं, याचाच प्रत्येक जण विचार करतंय.

नगर, नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीत यापुढं पाणी सोडणं शक्य नसल्याची भूमिका शपथपत्राद्वारे राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मांडलीय. मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे समन्यायी प्रमाणात पाणीवाटप करण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी नुकतीच औरंगाबाद खंडपीठात झाली. त्यावेळी शासनातर्फे, तसंच गोदावरी पाटबंधारे महामंडळातर्फे शपथपत्रं सादर करण्यात आलीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जनतेच्या घशाला पडलेली कोरड आणखी तीव्र झालीय.

व्यथा चौका गावकऱ्यांची...

औरंगाबादपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या चौका गावचीच परिस्थिती पाहा... हे प्राथमिक उदाहरण आहे. परंतु तीन हजारांहून अधिक गावांतील परिस्थिती याहून वेगळी नाही. 24 तास वाहनांची गजबज असलेल्या महामार्गाच्या अडथळ्याची शर्यत पार करत येथील ग्रामस्थ हंडा, दोन हंडा पाणी आणतायत.   

चौकातील ग्रामस्थांना सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून सध्या पाणी आणावं लागतंय. याच विहिरीत टॅंकरनं पाणी टाकलं जातं. विशेष म्हणजे, चौका हे गाव पर्यटनाचं मुख्य आकर्षण असलेल्या अंजिठा महामार्गावर आहे. त्यामुळं या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. पाणी आणण्यासाठी जाताना हा महामार्ग ओलांडण्याशिवाय पर्याय नसल्यानं ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागलेला असतो. आतापर्यंत अनेक जण पाणी आणण्यासाठी गेले ते परत आलेच नाहीत. काळ बनून राहिलेल्या या महामार्गानं त्यांच्यावर झडप घातली. तरीही त्यांना दुसरा पर्याय नाही. चौकात राहून तहान भागवायची त्यांना ही जीवघेणी कसरत करावीच लागते. 

मराठवाड्यातील तहानलेल्या इतर गावांतील अडथळे वेगवेगळे असले तरी ते पार करीत सर्व जण आता तहान भागवतायत. पण...उन्हाळा कसा जाणार, याचीच चिेंता सर्वांना भेडसावतेय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.