स्पेशल रिपोर्ट

'मोंढा मॉल' घेणार एफडीआयशी टक्कर

विवेक राजूरकर

औरंगाबाद – मॉल संस्कृतीमुळं मुख्यतः पारंपरिक किराणा व्यवसाय आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. आता तर एफडीआय आलंय. त्यामुळं किराणा दुकानदारांच्या एकूण व्यवसायावरच गदा येतेय. या मॉल आक्रमणाला सामोरं जाऊन तिच्याशी दोन हात करण्याची तयारी मात्र औरंगाबाद येथील व्यापाऱ्यांनी केलीय. 

भविष्यात शहरातील छोटे-मोठे किराणा दुकानदार आणि व्यापारी स्पर्धेत टिकावेत या दृष्टीनं मोंढय़ातील जनरल किराणा मर्चंट असोसिएशन आणि सेमी होलसेलर्स अॅण्ड जनरल किराणा मर्चंट असोसिएशनच्या १२० व्यापाऱ्यांनी मोंढा मॉल संस्कृती स्थापन केली. 

शहरात जुना आणि नवा मोंढा ही पारंपरिक बाजारपेठ म्हणून सर्वांना परिचित आहेच. त्यापेक्षा इथले खराब झालेले रस्ते, सर्वत्र पसरलेला केरकचरा, रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहनं, धान्याच्या पडलेल्या राशी, पोत्यांच्या थप्प्या, किराणा माल भरण्यासाठी होणारी ग्राहकांची गर्दी हे दृष्य नेहमीचंच होतं. पण शहरात नव्यानं येणाऱ्या मॉल्सनी ग्राहकांच्या खरेदीची पद्धतच बदलून टाकली. एकाच छताखाली विविध प्रकारच्या वस्तू, चकचकीत दालनं, आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवासुविधा यामुळं मोंढ्यातील ग्राहकराजा आता या मॉल्सकडं वळता झाला. यामुळं पारंपरिक व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर परिणाम होऊ लागला. 

शहरात येणाऱ्या काही मॉलमुळे जर पारंपरिक व्यवसायावर परिणाम होत असेल तर एफडीआयमुळे पिढीजात व पारंपरिक किराणा व्यावसायिकांचं काय होईल? येथील व्यापारी स्पर्धेत टिकून राहतील की नाही? अशी चर्चा देशभरात सुरू आहे. त्यात आता एफडीआयचा शिरकाव म्हणजेच मल्टिब्रॅंण्ड रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक होणार हे निश्चित झालंय. यामुळे मॉल संस्कृतीचं जाळं देशभर पसरणार यात शंका नाही. या मॉल संस्कृतीमुळं मुख्यतः पारंपरिक किराणा व्यावसायिकांचं, किरकोळ विक्रेत्यांचं, व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र या मॉल संस्कृतीला सामोरं जाण्याची तयारी औरंगाबाद येथील व्यापाऱ्यांनी केली आणि प्रत्युत्तर म्हणून येथील १२० व्यापाऱ्यांनी एकत्र येत 'मोंढा मॉल संस्कृती' स्थापन करून अमलात आणण्यासही सुरुवात केलीय.  

एकमेकांचे स्पर्धेक बनलेले व्यापारी या नव्या संकल्पनेमुळे आता एकमेकांचे सहकारी बनले आहेत. १० ते १५ एकर परिसरात पसरलेल्या नवा आणि जुना मोंढ्याचे चित्र आता पालटत असून त्यासाठी या परिसराला ग्राहकाभिमुख बनविण्याचा विडा या मोंढा मॉल संस्कृतीनं उचलला आहे. इथं ग्राहकांना कमी किमतीत योग्य गुणवत्तेचा माल मिळेल. एकाच छताखाली अनेक प्रकारच्या व्हरायटी पाहण्याची आणि निवडण्याची संधी मिळेल. तसंच रस्त्यावर वाहनांची शिस्त पाहायला मिळेल. परिसरात असलेली अस्वच्छता दूर करण्याबरोबरच, ग्राहकाला घरपोच सेवा पुरवण्याकडं कटाक्षानं लक्ष दिलं जाईल. या सर्व बाबींमुळे मॉलला पसंती देणारे ग्राहक पुन्हा मोंढ्याकडे आकर्षित होतील, असा विश्वास येथील सदस्यांनी व्यक्त केलाय.

नवीन ग्राहक इथं खरेदीसाठी आल्यास त्यानं गोंधळून जाऊ नये म्हणून कोणतं सामान कुठे मिळेल याची माहिती देण्यासाठी मोंढा मॉलच्या वतीनं मोंढा मॉल हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय इथल्या व्यापाऱ्यांनी घेतलाय. भविष्यात मोंढय़ाची स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्याचा निर्णयही असोसिएशननं घेतला असून येथील काम पेपरलेस करण्यावर भर असणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय कामगार आणि मजूर वर्गासाठी योग्य आणि ठराविक मजुरीसह त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.