स्पेशल रिपोर्ट

पंचरत्नांच्या खाणीला हवंय कॉरिडोरचं कोंदण

मुश्ताक खान

रत्नागिरी - निसर्गसंपन्न दापोली तालुक्यात अनेक महान नररत्नं होऊन गेली. यामुळंच हा तालुका नररत्नांची खाण म्हणून देशात ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, पां. वा. काणे, महर्षी कर्वे आणि लोकमान्य टिळक ही पाच नररत्नं या भूमीतलीच. या पंचरत्नांच्या गावांना जोडणाऱ्या कॉरिडोरची मागणी दापोलीतल्या शिवराज प्रतिष्ठाननं लावून धरलीय.

इथं येणाऱ्या लोकांना आणि पर्यटकांना या पंचरत्नांच्या कार्याचं, जीवनाचं दर्शन घडावं यासाठीची ही धडपड आहे. या कॉरिडोरसाठी सध्या स्वाक्षरी मोहीम सुरू आहे.

इथल्या अनेक थोर विचारवंतांनी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या सामाजिक-राजकीय पटलावर आपली छाप सोडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पां. वा. काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांना तर 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. एकाच तालुक्यातील ही भारतरत्न त्रिमूर्ती कोकणच्या नव्हे तर भारतवर्षाच्या इतिहासात दुर्मिळ घटना आहे. तर स्वातंत्र्य लढ्यात  'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', असं इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक आणि सर्वांची माऊली असणाऱ्या साने गुरुजींचं योगदानही देशासाठी तितकंच महत्त्वपूर्ण आहे.

देशाला समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेमधून राष्ट्रीयत्वाचा विचार रुजवणारी राज्यघटना देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या आंबडवे गावचे. बाबासाहेबांची मुळं ज्या मातीतली आहेत त्या ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक दरवर्षी येत असतात. पण त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ता आजही दुर्लक्षित आहे. शिवाय या रस्त्यावर योग्य दिशादर्शक पाट्याही नाहीत, ही शोकांतिका आहे. 

स्त्रीशक्ती ओळखून तिच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे आणि विधवा विवाहाचे पुरस्कर्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे दापोली तालुक्यातल्या मुरूड गावचे. या गावातला रस्ता अत्यंत वाईट स्थितीत आहे. त्यांचं घरही गेल्या 98 वर्षांपासून दुसऱ्याच्याच ताब्यात आहे. मुरूड या गावात महर्षींचं स्मारक व्हावं यासाठी पैसाही मंजूर झालाय, पण इथल्या दोन स्मारक समितींच्या वादात गेली सात वर्षं हे स्मारक अडकलंय.

दापोली शहरातच ज्यांचं घर आहे ते गणितज्ञ, तत्त्वज्ञानी आणि कायदे पंडित असलेले महामहोपाध्याय पां. वा. काणे. त्यांच्याही कार्याचा सरकारला विसर पडला आहे. काणे यांचं घर दापोलीत कुठं आहे, याची बहुसंख्य लोकांना माहितीच नाहीये.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पाया रचणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चिखलगावचे. ज्यांनी देशासाठी आयुष्य वाहिलं त्या टिळकांच्या गावात पायाभूत सुविधांची वाणवाच आहे. तसंच ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा संदेश देत भारतातील मानवी हक्कांच्या लढाईतील अग्रदूत पां. स. साने अर्थात साने गुरुजी हे दापोलीच्याच पालगडमधील. 

या पंचरत्नांच्या घरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची निगा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हायला हवी. पण ती निगा राखली जात नाही. यासाठी आम्ही दापोली-मंडणगड मतदारसंघाचे आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी संपर्क साधला. याबाबत आमदार दळवी यांना विचारलं असता त्यांनी, "सरकार निधीच उपलब्ध करून देत नाही म्हणून ही समस्या उद्भवली आहे,” असं 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढा दिला त्यांच्यावर स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती येईल अशी त्यांनी कल्पनाही केली नसेल. त्यामुळं लोकांच्या भावनाही या परिसरात तीव्र आहेत. सरकारनं लोकभावनेचा आदर करून या मागणीकडे गांभीर्यानं लक्ष पुरवणं आता गरजेचं झालं आहे, अशी प्रतिक्रिया या परिसरात उमटत आहेत.


Comments (3)

  • भारत 4 इंडियाचे आभार... राज्यभरातुन यासाठी आवाज उठायला हवा...

  • खुपच छान!!!

  • देवभूमि,स्वर्णभूमि तसेच शापितभूमि म्हणूनही ओळखल्या जाणार्या कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ते अफलातून अशा सौंदर्याची उधलन केलेली आहे. पश्चिम घाट व अथांग पसरलेल्या समुद्राच्या बाहूपाशात विसावलेला कोकण मान्सून मध्ये तर नजर लागेल एवढा सुन्दर दिसतो. या निसर्गसंपन्नेने नटलेल्या भूमित अनेक रत्ने देखिल जन्माला आली. या बाबतीत खरोखर कोकणवाशीय खुपच भाग्यवंत आहेत. कोकणातीलच दापोली तालुक्यात जन्मलेल्या महर्षि धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिलक, प़ा वा काणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच श्यामची आई अजरामर करणारे साने गुरूजी यांनी समाज घडविन्यासाठी,देशासाठी खुप मोठे योगदान दिलेले आहे. त्याची कशाशीही तुलना करता येणार नाही. या महान लोकांच्या स्मारकाचे तसेच त्यांच्या गावाकड़े जाणार्या रस्त्यांसंदर्भात ज्याकाही अडचणी असतील, त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. शासनाने जनभावनेचा तसेच या पंचरत्नांच्या कार्याची दखल घेउन त्यांचा उचित सन्मान राखावा. सर्वात महत्वाचे म्हणजे दापोलीमध्ये या पंचरत्नांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून एक विद्यापीठ उभारण्याची खरी गरज आहे. जेणेकरून देशातील व विदेशातील लोकांच्या अभ्यासकाचे ते केंद्र ठरेल.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.