स्पेशल रिपोर्ट

आज राष्ट्राध्यक्ष करणार अभिवादन!

मुश्ताक खान

रत्नागिरी - ब्रह्मदेशात म्हणजेच आताच्या म्यानमारमध्ये ब्रिटिशांना मनमानी न करू देणारा गरिबांचा कैवारी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आयुष्य झिजवलेल्या थिबा राजाला ब्रिटिशांनी नजरकैद केलं. ब्रह्मदेशाच्या या शेवटच्या राजाच्या  समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन आज (शनिवारी) रत्नागिरीत येत आहेत.

थिबा हा ब्रह्मदेशाचा अत्यंत ज्ञानी आणि जाणता राजा होता. पाली भाषेतील सर्वात उच्च पदवी त्यानं मिळवली होती. ब्रह्मदेशाच्या इतिहासात ही पदवी मिळवणारा तो एकमेव राजा होता. बौद्ध धर्मासाठी त्याच्या मनात नितांत प्रेम आणि आदर होता. लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यानं राज घराण्याचा अधिकांश पैसा खर्च केला. त्यामुळं तो ब्रह्मदेशात प्रचंड लोकप्रिय राजा होता. त्यानं ब्रिटिशांची मनमानी चालू दिली नाही. शेवटपर्यंत त्यांना कडवा विरोध केला. परंतु ब्रिटिशांच्या ताकदीपुढं त्याचा निभाव लागला नाही. २८ नोव्हेंबर १८८५ रोजी ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला आणि त्याला नजरकैद केलं. त्यावेळी त्याला ब्रह्मदेशातच ठेवलं असतं तर कदाचित तिथं उठाव झाला असता. त्यामुळं ब्रिटिशांनी त्याला मद्रासला (चेन्नई) स्थानबद्ध केलं. त्यानंतर त्याची रवानगी रत्नागिरीतल्या सध्याच्या डीएसपी बंगल्यात करण्यात आली. मग १९१० साली त्याला सन्मानाने राजवाड्यात ठेवलं. 

थिबा राजाला ज्या राजवाड्यात ठेवण्यात आलं होतं त्याची संकल्पना पूर्णपणे त्याचीच होती. या राजवाड्यात खोल्या किती असतील, स्वयंपाकघर, शयनकक्ष कोठे असेल आदी सर्व सूचना थिबा राजानंच केल्या होत्या. तो जरी नजरकैदेत असला तरी त्याच्या सन्मानात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नव्हती. अशा या ब्रह्मदेशाच्या लोकराजाला शेवटच्या दिवसांत आजारानं ग्रासलं. त्याला मधुमेह जडला. त्यामुळं किडन्याही कमकुवत झाल्या. १५ डिसेंबर १९१६ रोजी त्याची तब्येत खूपच खालावली आणि मध्यरात्रीनंतर त्याचं निधन झालं. इंग्रजी कॅलेंडरनुसार १६ डिसेंबर ही त्याची पुण्यतिथी असते. राजाच्या मृत्यूनंतर त्याची समाधी ब्रह्मदेशामध्ये व्हावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. परंतु, ब्रिटिश सरकारनं परवानगी दिली नाही.  रत्नागिरीतल्या आताच्या शिवाजीनगर इथं त्याची समाधी बांधण्यात आली. सुमारे दोन महिने त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी झाला नव्हता. त्यादरम्यान त्याचं पार्थिव जिंकच्या कॉफिनमध्ये ठेवण्यात आलं होतं.

थिबा राजाचं अर्धं कुटुंबीय ब्रह्मदेशात परत गेलं आणि उर्वरित इथं भारतातच राहिलं. या लोककल्याणकारी राजाला मानवंदना देण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन आज रत्नागिरीत येत आहेत. थिबाच्या आठवणींची शिदोरी घेऊन रत्नागिरीकर त्यांच्या स्वागतासाठी  सज्ज झालाय.


Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.