स्पेशल रिपोर्ट

म्यानमारच्या अध्यक्षांची 'थिबा'च्या समाधीस भेट

मुश्ताक खान

रत्नागिरी - भारलेलं वातावरण, भरून आलेला ऊर आणि आठवणींचा खजिना घेऊन पुन्हा एकदा रत्नागिरीत येईन, असं सांगून म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन यांनी थिबा राजाच्या वंशजांचा निरोप घेतला.

 ब्रह्मदेशाचा (आताचं म्यानमार) शेवटचा राजा थिबा याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी यू थेन सेन शनिवारी रत्नागिरीत आले होते. समाधी स्थळ आणि ज्या राजवाड्यात थिबा राजाचं वास्तव्य होतं तिथं, त्याचबरोबर त्यांनी थिबा राजाचं काही काळ वास्तव्य असलेल्या पोलीस अधीक्षक बंगल्यालाही भेट दिली.

थिबा राजा आणि राणी फाया यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी थिबाच्या पाच वंशजांची भेट घेतली. राजाच्या वंशातील चंद्रकांत पवार, प्रदीप भोसले, प्रवीण पवार, सुनीता पवार, सुनंदा पवार ऊर्फ मालती मधुकर मोरे या सदस्यांची आस्थेनं चौकशी केली. म्यानमारमधील राजाचे वंशज असलेले यु सो विनही रत्नागिरीतील वंशजांना भेटण्यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या सोबत आले होते.

थिबा राजाच्या वंशजांना पाहताच राष्ट्राध्यक्षांचा चेहरा खुलला. आपल्याच रक्तमांसाची माणसं भेटली म्हणून थिबा राजाचे वंशजही आनंदी झाले. 

यू थेन सेन यांनी आपणही थिबाचे वंशज आहोत, असं सांगत मी पुन्हा एकदा येईन आणि सर्व कुटुंबीयांना भेटेन असं सांगितलं. त्याचबरोबर इथल्या सर्व वंशजांना म्यानमारला येण्याचं आग्रहाचं निमंत्रणही दिलं. वंशजांसाठी पाच मिनिटांची भेट ठरलेली होती, पण राष्ट्रध्यक्षांनी 20-30 मिनिटं चर्चा केली.

राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या भेटीमुळे थिबा राजाच्या कुटुंबीयांना पहिल्यांदाच आपण राजाचे वंशज आहोत याचा प्रत्यय आला, असं चंद्रकांत पवार यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.