स्पेशल रिपोर्ट

आवाहन समाजोपयोगी कामाचं

ब्युरो रिपोर्ट

आपण प्रगती करत असताना साधं जगणंसुद्धा आव्हान बनलेली माणसं आपल्या अवतीभवती आहेत. आपल्याला माणूस म्हणून घ्यायचं असेल तर अशांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आता वेळ आहे, कृतीची. औचित्य आहे, समाज दिनाचं. बाबा आमटेंच्या जन्म दिवसाचं! काहीतरी समाजोपयोगी करु अन् बाबांच्याच शब्दांत म्हणू- 'माणूस माझे नाव, माणूस माझे नाव'...

 ''येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही                                                                        

येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही

येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही

येथे भविष्य जन्मत: आहे, या सीमांना मरण नाही!''

पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या 'या सीमांना मरण नाही' या कवितेतल्या या ओळी.

बाबांनी रंजल्या-गांजल्या, जगानं अव्हेरलेल्या कुष्ठरोग्यांना पोटाशी धरलं. त्यांना जगण्याची नवी दिशा दाखवली, नवा आत्मविश्वास मिळवून दिला... त्याची प्रचीती देणाऱ्या या ओळी. जगण्याचा अर्थ ज्याला समजून घ्यायचा आहे, त्या कोणत्याही धडधाकट माणसानं 'आनंदवनात' जावं. आणि तिथं नंदनवन फुलवणाऱ्या कुष्ठरुग्णांकडून उदंड ऊर्जा घेऊन यावं. बाबांनी त्या  'घेणाऱ्या' हातांना 'देणारे' हात बनवलंय. जगानं झिडकारलेल्या या लोकांना आत्मविश्वासानं उभं केलंय. अशा या महामानवाची स्मृती आपण नको का जागवायला? त्यांनी उभ्या केलेल्या श्रमप्रतिष्ठेच्या मूल्यांना आपण नको का जगवायला? जीवनातले काही क्षण तरी दुसऱ्यासाठी, नको का द्यायला? आनंदवनाचं दर्शन झाल्यानंतर तुमच्या-आमच्या मनात उभे राहणारे हे प्रश्न. त्यांची उत्तरं शोधण्यातूनच 'भारत4इंडिया'ची निर्मिती झाली.

'नव्या युगाचं माध्यम' असं बिरुद मिरवतानाच आपण समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना जपली. त्यातूनच आली 'समाज दिना'ची संकल्पना. औचित्य मिळालं, 26 डिसेंबरचं. बाबा आमटेंच्या जन्म दिवसाचं. योगायोग म्हणजे 2014 हे वर्ष आहे, बाबांचं जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्तानं आपण एक निश्चय करायचा. दुसऱ्याच्या उपयोगी पडणारं एखादं तरी छोटंसं काम करायचं. मग ते काहीही असेल. उदाहरणार्थ, कामवाल्या मावशींच्या मुलांची शाळेची फी भरणं असो, शेजारच्या झोपडपट्टीत जाऊन तिथल्या मुलांना लिहायला शिकवणं असो, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्या मुलांना वह्या-पुस्तकं देणं असो, किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या अनाथ आश्रमातल्या मुलांना खाऊ देणं असो, असं काहीही... तुम्हाला सुचेल ते. समाजाच्या उपयोगाचं! हीच 'समाज दिना'ची संकल्पना आहे. त्यामुळं 'देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्याने घेत जावे..' असं विं. दा. करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणं आपणही आता 'देणारे हात' होऊया. सगळे मिळून 'समाज दिन' साजरा करूया...

समाजसेवेचा हा रस्ता ज्यांनी आपल्याला दाखवलाय, त्या पद्मविभूषण बाबा आमटेंच्या सेवामय जीवनाचा हा ठळक आढावा...नाव – बाबासाहेब देवीदास आमटे

 • जन्म – २६ डिसेंबर १९१४, हिंगणघाट, जिल्हा वर्धाBaba
 • १४व्या वर्षापासून भटकंती सुरू
 • वडील सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर नागपूरमध्ये वास्तव्य
 • शिक्षण – हिस्लॉप कॉलेज, नागपूर
 • १९३८ – नागपुरात वकिलीची पदवी
 • छत्तीसगडमधील दुर्ग इथं वकिलीला सुरुवात
 • १९४० - वरोरा इथं परतले, वकिली सुरू
 • वकिलीची सनद फाडून समाजकार्यात उडी
 • वरोऱ्यात आल्यानंतर गांधी विचारांचं आकर्षण
 • भारत छोडो चळवळीत सहभाग
 • चंद्रपूरमध्ये २१ दिवसांचा तुरुंगवास
 • १९४२ ते १९४६ हिमालयात वास्तव्य
 • १८ डिसेंबर १९४६ - नागपूरच्या इंदू घुले अर्थात, साधनाताई यांच्याशी विवाह
 • १९४७ – विकास आमटेंचा जन्म
 • मित्रवस्ती साम्यकुलाचा प्रयोग – संकल्पना - सर्व जातीजमातीच्या लोकांनी एकत्र राहून आपापले व्यवसाय करावेत, यासाठी मध्य प्रदेशचे मंत्री रा. कृ. पाटील यांनी वरोडा इथं बाबांना सात एकर जमीन आणि घर दिलं. विनोबा भावेंनी १०० रुपये देणगी दिली.
 • वडिलोपार्जित जमिनीवरचा हक्क सोडला. चरितार्थासाठी गांधी, विनोबा साहित्य आणि ग्रामोद्योग वस्तूंची विक्री
 • गांधीजींपासून कुष्ठरोग सेवेची प्रेरणा
 • बाबा आणि साधनाताईंचं शेतीत राबणं सुरू 
 • कुष्ठरोगाबद्दल सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण घेऊन कुष्ठरोग्यांच्या सेवेस सुरुवात
 • दत्तपूरचं कुष्ठधाम, अमरावतीचे डॉ. पटवर्धनांचं तपोवन, फादर डेमियन यांची कुष्ठरोग सेवा यांच्या कार्याचा आदर्श 
 • कुष्ठरोग्यांच्या सेवेला विनोबांचे आशीर्वाद
 • १९५० – वरोऱ्याला महारोगी सेवा समिती स्थापन
 • १९५० - कोलकात्यातील स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसनचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण
 • या प्रशिक्षण काळातच शरीरात कुष्ठरोगाची प्रायोगिक प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली
 • पुरुलियातील कुष्ठवस्तींचं निरीक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण 
 • महारोग्यांसाठी 'स्नेहसदन'ची उभारणी 
 • १९५१ – वरोऱ्यात सहा कुष्ठरोगी, एक लंगडी गाय यांच्यासह साधनाताई, दोन मुलांसह कामाला प्रारंभ
 • महारोग्याना दिलं महारोग्यांची सेवा करण्याचं प्रशिक्षण
 • महारोग्यांच्या सोबतीनं त्यांच्याचप्रमाणं राहायला सुरुवात 
 • महारोग्यांच्या मदतीनं बैलाशिवाय पेरणी 
 • महारोग्यांना शेती कसायला शिकवलं
 • २१ जून १९५१ - विनोबा भावेंनी केलं आनंदवनाचं उद्घाटन
 • सेवेच्या काळात बाबांना समाजाकडून वाईट अनुभव
 • महारोग्यांच्या हातचं दूध नको म्हणून गावकऱ्यांचा बहिष्कार
 • १९५४ – या वर्षापासून आनंदवनात तेलघाणा, डेअरी फार्मिंगला सुरुवात
 • १९५७ - नागपूरपासून १५ किलोमीटरवर कुष्ठरोग्यांना राहण्यासाठी राज्य सरकारच्या देणगीतून १२० एकर जागा घेतली
 • १९५७ - आनंदवनात वीज, प्राथमिक शाळा, दवाखाना आला
 • १९६१ - आनंदवनात समाजसेवक, लेखक, देशभक्त, कृषितज्ज्ञ यांचा पहिला 'मित्र मेळावा' 
 • १९६२ - आनंदवनात पोस्ट ऑफिस, रोग्यांच्या श्रमातून मुक्तीसदन सुरू, त्याचं संत तुकडोजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन
 • १९६४ – आनंद निकेतन महाविद्यालय बांधून समाजाला अर्पण
 • आनंदवनात 'गोकुळ' नावानं अनाथ मुलांसाठी आश्रम सुरू 
 • १९६८ - विवाहित महारोग्यांसाठी 'स्नेहसदन' उघडलं
 • १९७० - आनंदवनात 'कृषिनिकेतन' उभं राहिलं 
 • स्वीडनच्या मदतीतून डबे, कंदील, चाळण्या, चिमण्या इत्यादी ग्रामोपयोगी वस्तू तयार करण्याचा टीन कॅन उपक्रम सुरू 
 • १९८४ - पर्यावरण समतोल राखण्यासाठी वनशेती संशोधन प्रकल्पास सुरुवात, ४६५ एकर जमिनीवर शेती 
 • अपंग, अंध, म्हाताऱ्या गाईंचा आनंदवनात स्वीकार
 • महारोगी सेवा समितीचा दीड हजारांवर खाटांचा दवाखाना 
 • प्राथमिक शाळा आणि अंध, मूक, बधिर विद्यालय सुरू
 • कला, विज्ञान, कृषी विद्यालयं उघडली
 • 'संधीनिकेतन' नावाचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू 
 • 'स्नेहसावली' नावाचा वृध्दाश्रम
 • सोमनाथ गावाजवळ वनखात्यानं 1600 एकर जमीन दिली 
 • 'सोमनाथ' नावाचं मानव शक्ती संवर्धन केंद्र सुरू  
 • अखिल भारतीय श्रम संस्कार छावण्यांची सुरुवात
 • सोमनाथच्या जंगलातील 600 एकर मशागत केलेली जमीन, विनोंबांच्या सांगण्यावरून पारध्यांना परत  
 • बाबांच्या कामाची पद्धत - जंगल साफ करायचं, शेती तयार करायची, पिकं काढायची, झोपड्या उभारायच्या, वस्ती करायची, त्यानंतर दवाखाना सुरू करायचा
 • 27 जानेवारी 1970 - दलाई लामा यांची आनंदवनला भेट
 • 23 डिसेंबर 1973 - गडचिरोली जिल्ह्यात हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना
 • आरोग्य, शेती आणि शिक्षण या त्रिसूत्रींवर लोकबिरादरी प्रकल्प उभा 
 • 1974 - लोकबिरादरी प्रकल्प डॉ. प्रकाश आणि मंदा आमटेंवर सोपवला 
 • 1976 - माडिया आदिवासींच्या मुलांसाठी शाळा सुरू
 • डॉ. प्रकाश आमटेंनी जंगली प्राण्यांसाठी अनाथालय सुरू केलं
 • 1986 – बाबांनी कन्याकुमारी ते काश्मीर, 1988-89मध्ये इटानगर ते ओखा अशी 'भारत जोडो' यात्रा काढली 
 • 1 जुलै 1986 - पंजाबमधील शीख-हिंदू वैमनस्य मिटवण्यासाठी शांतियात्रा काढली
 • निसर्गाच्या रक्षणासाठी 'हरित आघाडी'ची स्थापना 
 • 1983 पासून धरणविरोधी अभियानात उडी 
 • 1990 – मध्य प्रदेशच्या आदिवासी जंगलातील आदिवासीं प्रश्नांसाठी लढा
 • 1964 – बाबांना जडला पाठीच्या मणक्याचा विकार
 • 9 फेब्रुवारी 2008 – बाबा आमटेंचं निधन 

बाबांना मिळालेले पुरस्कार

आंतराष्ट्रीय पुरस्कार

 • 1983 - अमेरिकेच्या डेमियन डटन फाऊंडेशनचा कुष्ठसेवेचा पुरस्कार
 • 1985 – समाज सेवेसाठीचा मॅगसेसे पुरस्कार
 • 1988 – मानव सेवेसाठी जी. डी. बिर्ला इंटरनॅशनल अॅवॉर्ड 
 • 1988 - युनोचा ह्युमन राईट्स पुरस्कार 
 • 1990 – दी टेम्पल्टन जनसेवेचा पुरस्कार
 • 1971 - भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
 • 1986 -  भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार
 • 1986 – अपंग कल्याण पुरस्कार
 • 1980 – नागपूर विद्यापीठाकडून डी. लिट. पदवी
 • 1980 - अकोला पंजाबराव कृषी विद्यापीठातर्फे कृषिरत्न डी. लिट. पदवी
 • 1985-86 - पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी
 • 1988 - 'शांतिनिकेतन'ची डी. लिट. पदवी

इतर सन्मान

 • 1978 - फाय फाऊंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार
 • 1979 - जमनालाल बजाज अॅवॉर्ड
 • 1980 - नॅशनल सोसायटी फॉर इक्वल अपॉर्च्युनिस्ट फॉर दी हॅण्डीकॅपचा दिवाण पुरस्कार
 • 1983 - रामशास्त्री प्रभुणे फाऊंडेशनचा रामशास्त्री अॅवॉर्ड
 • 1985 – मध्य प्रदेश सरकारचा समाज सेवेबद्दलचा इंदिरा गांधी मेमोरियल पुरस्कार
 • 1986 – राजा राम मोहन रॉय पुरस्कार
 • 1987 - फ्रेंच मसचिओ प्लॅटिनम ज्युबिली अॅवॉर्ड
 • 1988 – राष्ट्रीय नागरिक पुरस्कार
 • 1989 – लोकश्री पुरस्कार 

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.